इम्रान खानः सर्बियाच्या पाकिस्तानी दुतावासाच्या ट्विटर हँडलवरून इम्रान खान सरकारलाच केलं ट्रोल
शुक्रवार, 3 डिसेंबर 2021 (15:02 IST)
सर्बियातील पाकिस्तानी दुतावासाने इम्रान खान यांना टॅग करून एक व्हीडिओ बनवल्यानंतर सोशल मीडियावर धुराळा उडाला आहे. पाकिस्तानच्याच दुतावासातील अधिकाऱ्यांनी पाकिस्तानच्या सरकारलाच थेट निशाणा बनवल्यामुळे अनेकांनी भुवया उंचावल्या होत्या.
मात्र, हे ट्वीट आता डिलिट करण्यात आलं असून, इम्रान खान यांचे प्रवक्ते डॉ. अर्सलान खालिद यांनी ट्वीट करून सांगितलं की, "पाकिस्तानच्या परराष्ट्र खात्याच्या माहितीनुसार, सर्बियामधील पाकिस्तानच्या दुतावासाचं ट्विटर अकाऊंट हॅक झालंय. परराष्ट्र मंत्रालय या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करत आहे."
ट्वीटमध्ये नेमकं काय होतं?
सर्बियातील पाकिस्तानी दुतावासाने साद अलवी या गायक, कंपोझरचा व्हीडिओ आपल्या अधिकृत अकाउंटहून ट्वीट केला होता. हा व्हीडिओ आठ महिने जुना आहे, पण पाकिस्तान एंबसी सर्बिया या ट्विटर हॅंडलने तो नुकताच पोस्ट केला होता.
या व्हीडिओमध्ये पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या भाषणातील क्लिप जोडली होती आणि एक उपहासात्मक गाणे म्हणण्यात आले होते.
पाकिस्तानमध्ये महागाई गगनाला भिडल्याचे चित्र आहे. तेव्हा व्हीडिओतील गाणे हे थेट महागाईवरच आहे. पाकिस्तानातील महागाईने उच्चांक गाठला आहे.
इम्रान खान यांना काय वाटतं की किती दिवस सरकारी अधिकारी शांत बसतील. गेल्या तीन महिन्यांपासून आमचे पगार थकले आहेत आणि शाळेची फी न भरल्यामुळे आमच्या मुलांना शाळेतून काढण्यात आले आहे, असे म्हणत हा व्हीडिओ ट्वीट करण्यात आला होता.
इम्रान खान त्यांच्या भाषणात 'आपने घबराना नहीं' असं म्हटलं होते. त्याच भाषणाची क्लिप या गाण्यात जोडण्यात आली आहे. 'जर साबण महाग झाला तर लावू नका, कणिक महाग झाली तर खाऊ नका. काही झालं तर घाबरू नका' असं उपहासात्मक गाणं पुढे जोडण्यात आलं आहे.
हा व्हीडिओ पोस्ट करून खाली दुतावासातील कर्मचाऱ्याने म्हटले होते की, माझ्याजवळ पर्यायच शिल्लक नव्हता त्यामुळे मी हे केले आहे.