नारायण राणे भाजपमध्ये गेले तर शिवसेना-भाजप युती टिकेल?

शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019 (12:53 IST)
प्राजक्ता पोळ
राज्यसभेचे खासदार नारायण राणे हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलिन करण्यासंदर्भात बोलणी सुरू असल्याचं नारायण राणे यांनी काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत बोलताना सांगितलं होतं.
 
याबाबत राणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. पण नारायण राणे यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनुपस्थितीतीमुळे विविध चर्चांना उधाण आलं.
 
त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला. "नारायण राणेंच्या कार्यक्रमाचं आमंत्रण होतं, पण मला काही कारणांमुळे जाणं शक्य झालं नाही. नारायण राणे मला भेटले, ते जर भाजपमध्ये येण्यास उत्सुक असतील तर त्यांचं स्वागतच आहे," असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. तेव्हापासून नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली. पण या प्रवेशामागे अनेक राजकीय समिकरणं आहेत.
 
स्वाभिमान पक्षाच भाजपमध्ये विलिन कशासाठी?
१ ऑक्टोबर २०१७. नारायण राणे यांनी कॉंग्रेसमधून बाहेर पडून महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाची घोषणा केली.
 
यावेळीही त्यांनी शिवसेनेवर तोंडसुख घेण्याची संधी सोडली नाही. त्यानंतर काही दिवसांतच स्वाभिमान पक्ष एनडीएला पाठींबा देणार असल्याचं राणेंनी जाहीर केलं.
 
२३ मार्च २०१८ ला नारायण राणे यांना भाजपच्या चिन्हावर राज्यसभेत खासदारकी मिळाली. राणे हे खासदार असले तरी त्यांना राज्याच्या राजकारणातच रस असल्याचं त्यांनी अनेकदा बोलून दाखवलं आहे.
 
"सध्या केंद्रात आणि राज्यात भाजपची हवा आहे. लोकसभा निवडणुकीत नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे यांनी स्वाभिमान पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवली. पण त्यांचा दारूण पराभव झाला. त्यामुळे स्वाभिमान पक्ष हा एक कौटुंबिक पक्ष राहीलाय.
 
त्याचा फारसा प्रभाव कुठे दिसत नाही, येत्या निवडणुकीत भाजपच्या बाजूने असलेलं वातावरण पाहता नारायण राणेंकडे त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याशिवाय पर्याय नाही," असं लोकमतचे वरिष्ठ सहाय्यक संपादक संदीप प्रधान यांना वाटतं.
 
नारायण राणेंचा पक्षप्रवेश हा त्यांच्या मुलांचं राजकीय पुनर्वसनासाठी असल्याचं मिड-डे वृत्तपत्राचे शहर संपादक संजीव शिवडेकर यांना वाटतं.
 
नारायण राणे हे राज्यसभेवर खासदार आहेत. ते काही वर्षं असेच राहू शकले असते पण त्यांच्या मुलांचं राजकीय भवितव्य लक्षात घेऊन ते स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याच्या विचारात असल्याचं शिवडेकर सांगतात.
 
शिवसेनेच्या विरोधाच काय?
"शिवसेना आणि भाजप हे आता मनाने एकत्र आले आहेत. दुधात साखर घालावी इतकं सगळं गोड झालं आहे. आता यात मिठाचा खडा कशाला? जर नारायण राणे यांना भाजप प्रवेश दिला तर युतीत मिठाचा खडा पडेल," अशी टीका गृहराज्यमंत्री दीपक केसरकर यांनी राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत बोलताना केली.
मुख्यमंत्री असा निर्णय घेतील अस वाटत नाही असही ते म्हणाले.
 
"दीपक केसरकर यांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेचा नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाला विरोध कायम असल्याचं स्पष्ट झालं आहे. शिवसेना नारायण राणे यांच्या पक्षप्रवेशाला थोडाफार विरोध करेल, पण भाजपच्या हातात मजबूत झालेलं सत्ताकेंद्र बघता यावेळी शिवसेनेच्या विरोधाला भाजपकडून फार महत्त्व दिलं जाईल असं वाटत नाही," असं प्रधान सांगतात.
 
"सिंधुदुर्गचं राजकारण हे विधानसभा निवडणुकीच्या युतीच्या निर्णयावर अवलंबून आहे. जर शिवसेना भाजपची युती झाली तर राणेंचा पक्षप्रवेश थांबेल आणि जर युती नाही झाली तर राणे कुठल्याही क्षणी भाजपमध्ये प्रवेश करतील. त्यामुळे सगळेच युतीच्या निर्णयाची वाट बघतायेत," असं जेष्ठ पत्रकार अभय देशपांडे यांना वाटतं.
 
राणेंच्या भाजप प्रवेशानंतरचे परिणाम काय?
"नारायण राणे यांच्याकडे असलेला बेधडकपणाचा उपयोग भाजपला होऊ शकतो. सरकारमध्ये राहून मागची पाच वर्षं शिवसेनेनं भाजपविरोधी भूमिका घेतली ते बघता नारायण राणे यांचा भविष्यात शिवसेनेविरोधात काम करण्यासाठी भाजपला राणेंची गरज पडेल.
 
तसंच कोकणातल्या राजकारणात भाजपचा फारसा प्रभाव नाही अश्या ठिकाणी राजकीय संघर्षासाठी राणेंचा भाजपला फायदा होईल, असं प्रधान पुढे सांगतात.
"नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशामुळे शिवसेनेबरोबरच प्रमोद जठारांसारखे भाजपचे स्थानिक नेतेही नाराज होतील. राणेंना राज्याच्या राजकारणात रस आहे असं ते म्हणतात पण भविष्यात जर त्यांना राज्य मंत्रिमंडळात आणलं तर त्यांच्या अनुभवानुसार त्यांना मोठं खातं द्यावं लागेल. त्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेतेही नाराज होऊ शकतात. युती तुटण्याचं कारण राणे ठरू शकतात," असं शिवडेकर यांनी सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती