"शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मातोश्रीवर जाणं बरोबर नाही. या वयात खरंतर मुख्यमंत्र्यांनी पवारांना भेटायला जायला हवं," असं म्हणत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. त्यांच्या याच वक्तव्याला शरद पवार यांनी प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्र टाइम्सनं ही बातमी दिलीये.
चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याबद्दल विचारले असता शरद पवार यांनी म्हटलं, की चंद्रकांत पाटलांना काही वाटत असेल तर त्यावर मला काही बोलायचे नाही. ज्या मुलाखतीची चर्चा आहे ती मुलाखत देण्यासाठी मी त्याच भागात गेले होतो. तिथून फर्लांगभर अंतरावर मातोश्री निवासस्थान होतं. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी 14 किलोमीटर लांब माझ्या घरी येण्यापेक्षा मीच त्याच्याकडे गेलो. त्यात मला कमीपणा वगैरे काही वाटत नाही.
'महाविकास आघाडी सरकारमध्ये अस्वस्थता, नाराजी वगैरे काहीही नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे चांगलं काम करताहेत. तिन्ही पक्षांमध्ये उत्तम समन्वय आहे', असंही शरद पवार यांनी नमूद केलं.