राजू शेट्टी यांनी आमदारकीची ऑफर नाकारली

गुरूवार, 18 जून 2020 (21:56 IST)
दोन दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीत भेट घेवून राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधान परिषदेची उमेदवारी स्वीकारणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी आमदारकीची ऑफर नाकारली आहे. शेट्टी यांच्या संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी शेट्टी यांच्या हेतूबद्दलच शंका उपस्थित केल्याने माजी खासदार राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीच्या कोट्यातून विधानपरिषदेवर जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
 
विधान परिषदेत राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची मुदत संपली आहे. या १२ जागांवर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून नावांची शिफारस करण्यात येणार आहे. आघाडीचा घटक पक्ष असणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांची भेट घेवून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्यांना राष्ट्रवादीच्या कोट्यातून आमदारकीची ऑफर दिली होती. त्यानुसार शेट्टी यांनी दोनच दिवसापूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची बारामतीत भेट घेवून ही ऑफर स्वीकारली होती.मात्र शेट्टी यांच्या या निर्णयानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत उलटसुलट चर्चांना सुरूवात झाल्याने अखेर राजू शेट्टी यांनी राष्ट्रवादीकडून देण्यात आलेली आमदारकीची ऑफर नाकारली आहे. खुद्द राजू शेट्टी यांनी फेसबुकवर एक पोस्ट करून ही माहिती दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती