हे वादळ 26 मेच्या संध्याकाळपर्यंत किनाऱ्याला भारताच्या मुख्य भूमीच्या पूर्व किनाऱ्याला धडकेल. बंगाल आणि उत्तर ओडिशासोबतच शेजारच्या बांगलादेशाला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या आठवड्यात तौक्ते चक्रीवादळ गुजरातच्या किनाऱ्याला धडकलं होतं आणि वाटेत त्यानं केरळपासून अगदी उत्तर कोकणापर्यंत ठिकठिकाणी किनारी प्रदेशांत मोठं नुकसान केलं. किनाऱ्याला धडकल्यावरही तौक्तेचा प्रभाव राजस्थान, मध्यप्रदेशपर्यंत जाणवला होता.
त्यानंतर आठ दिवसांतच भारताला दुसऱ्या चक्रीवादळाचा सामना करावा लागणार आहे. गेल्या वर्षी बंगालमध्ये अंफन चक्रीवादळानं मोठं नुकसान केलं होतं. त्या पार्श्वभूमीवर या वादळाचा सामना करण्यासाठी तयारी केली जाते आहे. दरम्यान, नैऋत्य मोसमी वारे अंदमान आणि निकोबारमध्ये दाखल झाले असल्याचं भारतीय हवामान खात्यानं जाहीर केलं आहे. 31 मे पर्यंत मान्सून केरळमध्ये पोहोचणं अपेक्षित आहे. पाच जून पर्यंत तो गोव्यात दाखल होईल आणि पंधरा जूनपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचेल असा अंदाज आहे.