गुजरातच्या निवडणुकांचे निकाल; राहुल गांधीसाठी धोक्याची घंटा?

सोमवार, 12 डिसेंबर 2022 (08:38 IST)
Author,इकबाल अहमद,
गुजरात विधानसभा निवडणुका पार पडल्या आणि त्याचे निकालही आले. या 2022 च्या निवडणुकीत भाजपने एकूण 182 जागांपैकी विक्रमी 156 जागा मिळवल्या. भाजपने आजवरचा रचलेला हा विक्रम म्हणता येईल.
 
आता एकीकडे भाजपने  ऐतिहासिक विजय मिळवलाय तर दुसरीकडे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी केलीय.
 
काँग्रेसने 2017 च्या निवडणुकीत 77 जागा मिळवल्या होत्या, 2022 मध्ये मात्र काँग्रेसला 17 जागांवर समाधान मानावं लागलंय.
 
आता गुजरातमध्ये काँग्रेसला निदान विरोधी पक्षनेतेपद मिळणार का? असा प्रश्न पुढे आलाय. कारण विरोधी पक्षनेते पदासाठी किमान 10 टक्के जागा जिंकाव्या लागतात. त्यामुळे आता हे पद मिळवणं एकतर विधानसभा अध्यक्ष किंवा भाजपवर अवलंबून आहे.
 
काँग्रेसने हिमाचल प्रदेशमध्ये विजय मिळवलाय, मात्र त्या विजयाला म्हणावं तितकं महत्त्व दिलं जात नाहीये.
 
यामागे एक महत्त्वाचं कारण म्हणजे, या राज्यात दर पाच वर्षांनी सत्ता पालट होताना दिसते आणि हा या राज्याचा मागच्या काही दशकांपासूनचा इतिहास आहे.
 
आता दुसरं कारण सांगायचं झालं तर, बरेचसे राजकीय विश्लेषक याकडे काँग्रेसच्या विजयापेक्षा भाजपचा पराभव म्हणून जास्त बघातायत.
 
काँग्रेसने 68 पैकी 40 जागा जिंकल्या तर भाजपला 25 जागांवर समाधान मानावं लागलंय. पण मतांची टक्केवारी बघता दोन्ही पक्षांमध्ये केवळ एक टक्क्याचा फरक आहे.
 
या दोन्ही राज्यांच्या निकालाआधी दिल्ली महानगरपालिकेचे निकाल लागले. इथं पण काँग्रेसची कामगिरी निराशाजनकच म्हणावी लागेल.
त्यामुळे या निकालांमधून काँग्रेस नेते राहुल गांधींना लोक कोणता मॅसेज देऊ इच्छितात का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत.
 
दिल्लीस्थित थिंक टँक सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचे फेलो राहुल वर्मा सांगतात की, दिल्ली, गुजरात आणि हिमाचल प्रदेश अशा तिन्ही ठिकाणांच्या निकालांच्या माध्यमातून काही ना काही संदेश देण्यात आलाय.
 
राहुल वर्मा यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "काँग्रेस गुजरातमध्ये भले ही सलग 27 वर्षांपासून हरत आली असेल पण तिथला त्यांचा मतांच्या हिश्शाचा टक्का 35 ते 40 टक्क्यांपर्यंत असायचा. पण यावेळेस पक्षाने भाजपच्या हाती सरळ विजय दिला असं चित्र आहे. आणि विशेष म्हणजे इथं आम आदमी पक्षाने काँग्रेसचं सर्वाधिक नुकसान केलंय."
 
त्यांच्या मते, गुजरातच्या निवडणुकांचे वार्तांकन करण्यासाठी गेलेला प्रत्येक पत्रकार म्हणत होता की, काँग्रेस गुजरातमध्ये निवडणूक लढताना दिसत नसल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते आणि मतदार नाराज होते.
 
राहुल वर्मा पुढे सांगतात की, ज्यापद्धतीने गुजरातमध्ये काँग्रेसची कामगिरी खालावलीय अगदी त्याचपद्धतीने बिहार आणि यूपीमध्ये पक्षाची कामगिरी खालावली होती आणि आजअखेर तिथं पक्षाची सत्ता आलेली नाही.
 
दिल्ली महानगरपालिकेच्या निवडणुकांनंतर तर काँग्रेस तिथं तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनलाय. त्यात आणि पहिल्या दोन पक्षांमध्ये आणि काँग्रेसमध्ये मोठं अंतर आहे. काँग्रेसचे जे नऊ नगरसेवक निवडून आले ते त्यांच्या स्वतःच्या वलयामुळे जिंकले.
 
राहुल गांधींची रणनिती समजण्यापलीकडे
राहुल वर्मांच्या मते, हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसने जो विजय मिळवलाय त्याचं श्रेय काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला मिळता कामा नये. पण तरीही पक्ष ते श्रेय केंद्रीय नेतृत्वालाच देईल कारण पक्षाचं वैशिष्ट्यच आहे ते.
 
ज्येष्ठ पत्रकार स्मिता गुप्ता सांगतात त्याप्रमाणे, प्रत्येक निवडणूक पार पडली की, काँग्रेस आणि खास करून राहुल गांधीसाठी वारंवार एकच संदेश दिला जातोय. पण मुद्दा असाय की, ऐकून घ्यायला कोणी तयारच नाहीये.
 
गुजरातचा संदर्भ देताना स्मिता गुप्ता सांगतात की, 2017 च्या निवडणुकीत हार्दिक पटेल, अल्पेश ठाकोर आणि जिग्नेश मेवाणी काँग्रेससोबत होते आणि पक्षाला त्यांचा फायदाही झाला.
 
पण यातल्या दोघांनी तर पक्षाला रामराम केला. राहता राहिले जिग्नेश मेवाणी, त्यांनी कसाबसा आपला मतदारसंघ वाचवला. पक्षाला यावेळी त्यांचा काहीच फायदा झाला नाही.
 
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वी हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केला.
 
स्मिता गुप्ता आता राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर येतात. त्या सांगतात की, या यात्रेत गुजरातचा समावेश का नव्हता याचा उलगडाच होत नाही.
 
राहुल गांधी मोजून एक दिवसासाठी गुजरात निवडणुकीच्या प्रचारासाठी आले होते.
 
'निवडणूक लढवण्याची इच्छा आहे की नाही ते स्पष्ट करावं लागेल'
राहुल गांधी सांगत होते की, त्यांच्या यात्रेचा आणि निवडणुकांचा काहीच संबंध नाहीये.
 
यावर स्मिता गुप्ता प्रश्न उपस्थित करतात की, "जर तुम्हाला निवडणुका जिंकायच्या नाहीयेत, तुम्हाला तसे प्रयत्नही करायचे नाहीयेत तर तुम्ही (काँग्रेस किंवा राहुल गांधी) राजकीय पक्ष का चालवताय?"
 
स्मिता गुप्ता म्हणतात की, निवडणूक जिंकल्यानंतर भाजप भलेही काही म्हणो, पण खरी मेख ही आहे की, त्यांना तिथं विरोध करण्यासाठी प्रबळ असा विरोधक नाहीये.
 
काँग्रेसचं राजकारण जवळून पाहणारे ज्येष्ठ पत्रकार रशीद किडवई सांगतात की, यावेळच्या गुजरात निवडणुकांमध्ये काँग्रेसने स्थानिक नेतृत्वाच्या बळावर लढायचा प्रयत्न केला होता. त्यामुळे केंद्रीय नेतृत्वाऐवजी राज्याचे नेते निवडणूकीचा प्रचार करत होते.
 
रशीद किडवईंच्या मते, या सगळ्यांत मुद्दा हाच होता की, काँग्रेसचं नेतृत्व करेल असा राज्यस्तरावर मान्यता असलेला नेता गुजरातमध्ये नव्हता.
 
राहुल वर्मांनी सांगितलेला मुद्दा पुढे करत रशीद किडवई म्हणाले की, गुजरातमध्ये पराभव होणं काँग्रेससाठी मोठी नामुष्की आहे. कारण ज्या राज्यांमध्ये टू पार्टी सिस्टीम होती, तिथं तिसऱ्या पक्षाच्या एंट्रीने काँग्रेस पिछाडीवर गेला, आणि पुन्हा सत्तेजवळ येणंही त्यांना शक्य झालं नाही.
 
बिहार, उत्तरप्रदेश, ओडिशा, तेलंगणा, आंध्रप्रदेश, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र आणि दिल्ली अशी बरीच उदाहरणं देता येतील.
 
गुजरातच्या निवडणुकीत आम आदमी पक्षाने चांगली कामगिरी केलीय. त्यांनी 5 जागा जिंकल्या आणि सोबतच 13 टक्के वोट शेअर मिळवला. काँग्रेससाठी ही खरं तर चिंतेची बाब आहे.
 
रशीद किडवई यांच्या म्हणण्यानुसार, निवडणुकीच्या राजकारणात रस आहे किंवा नाही हे आता राहुल गांधींना स्पष्ट करावं लागेल.
 
यामागची समीकरणं सांगताना रशीद किडवई म्हणतात की, फक्त एआयसीसीच्या सचिवालयातच नाही तर काँग्रेसच्या राज्य युनिटमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर बसलेल्या व्यक्ती या 'टीम राहुल'च्या सदस्य आहेत.
 
भारत जोडो यात्रेचा उद्देश?
बरेच राजकीय विश्लेषक राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर जोरदार टीका करताना दिसतात. पण रशीद किडवई मात्र त्याचं राजकीय महत्त्व नाकारत नाहीत.
 
त्यांच्या मते,  संविधान धोक्यात आहे, भारतीय समाजात तेढ निर्माण होते आहे, माध्यमांचा आवाज दाबला जातोय, अशा गोष्टी नागरिकांना पटवून देण्यात राहुल गांधी यशस्वी झाले तर मात्र याचा फायदा केवळ आणि केवळ काँग्रेसलाच होईल.
 
त्यांच्या मते, लोकांचं मत परिवर्तन करण्याची गरज असल्याच्या मुद्द्यावर राहुल गांधी ठाम आहेत. पण हे सगळं राजकीय व्यासपीठावरून करणं शक्य नाही, असं राहुल गांधींना वाटतं.
 
रशीद किडवई यांच्या मते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सुद्धा अशाच पद्धतीने समाजात जाऊन शांततेत काम करतो.
 
राहुल गांधींची ही यात्रा फेब्रुवारीमध्ये संपेल. पण रशीद किडवई सांगतात त्याप्रमाणे, ही यात्रा आटोपल्यावर थोड्याच दिवसांत राहुल गांधी दुसऱ्या यात्रेसाठी निघतील. ही यात्रा गुजरात ते आसाम अशी असेल.
 
लोकसभेच्या निवडणुका अंदाजे 2024 च्या मार्च-एप्रिल महिन्यात पार पडतील. त्याआधी जवळपास 13 राज्यांमध्ये निवडणुका येऊ घातल्यात.
 
गुजरात निवडणुकीच्या निकालावर प्रतिक्रिया देताना राहुल गांधी यांनी ट्विट केलं होतं की, "गुजरात राज्याच्या जनतेने दिलेला जनादेश आम्ही विनम्रतापूर्वक स्वीकारतो. आम्ही पुनर्बांधणी करू, कठोर मेहनत घेऊ आणि देशाच्या आदर्शांसाठी आणि राज्यातील लोकांच्या हक्कांसाठी लढत राहू."
 
त्यामुळे गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या या निकालानंतर काँग्रेस खास करून राहुल गांधी यांच्या कार्यपद्धतीत काही बदल होण्याची शक्यता आहे का?
 
काँग्रेसचा गोंधळ उडालाय का?
लोकसभेच्या 208 जागांवर भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होते. यातल्या 90 टक्के जागा भाजपच्या ताब्यात आहेत.
 
रशीद किडवई यांच्या म्हणण्यानुसार, विरोधकांच्या एकजुटीसाठी पहिली अट ही आहे की काँग्रेस स्वतः मजबूत असायला हवी. लोकसभेच्या या 208 जागांवर भाजपचा स्ट्राइक रेट 50 टक्क्यांच्या आसपास आणावा लागेल.
 
नितीशकुमार यांनी भाजपचा हात सोडून लालूप्रसाद यांच्याशी यांच्याशी हातमिळवणी केलीय. आता त्यांनी आपली राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा जाहीरपणे व्यक्त करायला सुरूवात तर केलीच आहे, शिवाय विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार असल्याचं देखील सांगितलंय.
 
अगदी अशाच पद्धतीचे प्रयत्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर करताना दिसतात.
 
पण या सर्व नेत्यांची एकच ओरड आहे ती म्हणजे, प्रमुख विरोधी पक्ष म्हणून विरोधकांना एकत्र करणं ही काँग्रेसची जबाबदारी आहे. पण काँग्रेस तसं करताना दिसत नाही.
 
रशीद किडवई म्हणतात की, भारताच्या राजकारणाचा आजवरचा इतिहास पाहता, युती तेव्हाच होते जेव्हा त्यात सामील होणारा पक्ष स्वतः मजबूत स्थितीत असतो.
 
ते पुढे सांगतात, "सध्या सगळेच विरोधक विखुरलेत आणि हे सगळेच काँग्रेसकडे संशयाच्या नजरेने पाहतायत. काँग्रेसमध्ये जो राजकीय अहंभाव आहे तो आजही तसाच आहे."
 
राहुल गांधींसाठी दोन धडे
स्मिता गुप्ता सांगतात की, या निकालातून काँग्रेसने दोन धडे घ्यायला हवेत.
 
त्या सांगतात की, "ना तुम्ही मेहनत करणार, ना तुम्ही प्रयत्न करणार, ना तुम्ही नव्या पिढीला पक्षात स्थान देणार. आणि एवढं करून तुम्ही थोडीफार मेहनत केली पण त्याचा आणि निवडणुकीचा संबंध तुम्हाला जोडता आला नाही, तर तुम्ही लोकांपासून दुरावत जाल."
 
स्मिता गुप्तांच्या मते, गुजरातच्या निकालावरून स्पष्ट झालंय की, भाजप आणि नरेंद्र मोदींचा पराभव करायचा असेल, तर विरोधकांना एकत्र येऊन काम करण्याशिवाय पर्याय नाही.
 
स्मिता सांगतात, "2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या प्रत्येक एका उमेदवाराच्या विरोधात सगळ्या विरोधकांनी एकत्र येऊन एकच उमेदवार उभा केला पाहिजे."
 
स्मिता गुप्ता जेव्हा काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी संवाद साधतात तेव्हा तेही या गोष्टीशी सहमत असल्याचं सांगतात.
 
पण यात अडचण अशी आहे की, विरोधकांच्या आघाडीचं नेतृत्व इतर कोणत्या नेत्याने करावं यासाठी काँग्रेस अजून तयार नाहीये. ना राहुल गांधी स्वतः यासाठी तयार आहेत.
 
स्मिता गुप्ता यांना वाटतं की, नितीश कुमार जुन्या समाजवादी लोकांना, नाहीतर मग जुन्या जनता परिवाराला एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहेत.
 
त्यांच्या म्हणण्यानुसार देवेगौडा, सपा, आरएलडी, चौटाला आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्याशीही चर्चा झालीय.
 
स्मिता गुप्ता सांगतात की, "आपल्यासाठी ओडिशा सोडावं अशी नवीन पटनायकांची इच्छा आहे तर तेजस्वी यादव यांना बिहारचे मुख्यमंत्री करावं अशी लालू प्रसाद यादवांची इच्छा आहे. त्यामुळे नितीश कुमार या संभाव्य आघाडीचे नेते होण्याची शक्यता जास्त आहे."
 
काँग्रेसमध्ये अस्वस्थता आणि उत्साहाचा अभाव
सध्या संपूर्ण विरोधी पक्षाला एक प्रकारची अस्वस्थता वाटत आहे. अगदी अशीच अस्वस्थता काँग्रेसमध्ये का दिसत नाही?
 
स्मिता गुप्ता म्हणतात, "याचं उत्तर देणं खूप अवघड आहे, आणि उदाहरण म्हणून बघायचंच झालं तर राजस्थानकडे बघता येईल. अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील मतभेद दूर करण्यात काँग्रेस पक्षाला अपयश आलंय."
 
स्मिता गुप्ता विचारतात की, "राहुल गांधींची भारत जोडो यात्रा ज्या राज्यांमधून पुढं सरकते आहे त्या राज्यांमध्ये पक्ष संघटनेत कोणता बदल झालाय का? 2024 च्या लोकसभा निवडणुका किंवा मग 13 राज्यांमध्ये येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस कोणते प्रयत्न करताना दिसते का?"
 
त्या पुढे असंही म्हणतात की, राहुल गांधींचा मागचा रेकॉर्ड पाहता, गुजरात आणि हिमाचलच्या निकालांमधून काहीतरी धडा घेऊन काँग्रेस किंवा राहुल गांधी काही बदल करतील असं वाटत नाही.
 
राहुल वर्मा यांच्या मते, काँग्रेस हा जुना आणि मोठा पक्ष आहे. त्यामुळे त्यात बदल करणं सोपं नाहीये. आणि यासाठी केवळ राहुल गांधींना जबाबदार धरून चालणार नाही.
 
ते सांगतात, "मागच्या 8 वर्षांपासून काँग्रेस बदल करणार असल्याचं म्हणतंय. त्यांनी उदयपूरमध्येही बदल घडवू असं म्हटलं होतं, पण मोठा बदल करायचा असेल तर अनेकांना नाराज करावं लागेल. आणि  काँग्रेस किंवा राहुल गांधी त्यासाठी तयार आहेत की नाहीत याविषयी मला माहित नाही."
 
मग काँग्रेसची रणनिती काय असेल?
विरोधकांच्या आघाडीविषयी राहुल वर्मा सांगतात की, "आम आदमी पक्ष सातत्याने चांगली कामगिरी करतोय, मग ते या आघाडीत का सामील होतील. किंवा मग काँग्रेसला आपली सीट देऊन आपलंच नुकसान करून घेण्यात कोणत्याही प्रादेशिक पक्षाला का रस असेल?"
 
त्यामुळे गुजरात आणि हिमाचलच्या निकालानंतर 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसची रणनीती काय असू शकते?
 
यावर राहुल वर्मा सांगतात की, "मागच्या 5 वर्षांत काँग्रेस स्वतःच्या संरचनात्मक बदलासाठी गंभीर आहे हे काही दिसलेलं नाही. भविष्यातही काही बदल घडेल असं पूर्वेतिहास बघून वाटत नाही. पण मग काँग्रेस किंवा राहुल गांधी यांची मानसिकता बदलेल असं सांगावं तर ते ही अवघड आहे."
 
2024 च्या निवडणुकांबद्दल आत्ताच काही सांगणं संयुक्तिक ठरेल का? यावर राहुल वर्मा म्हणतात, "भारताच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये प्रत्येकाला वाव असतो. भाजप भलेही खूप पुढं आहे मात्र तरीही त्यांना बऱ्याच राज्यांमध्ये संघर्ष करावा लागतो."
 
राहुल वर्मा यांच्या म्हणण्यानुसार, पुढच्या 18 महिन्यात राजकारणात काय घडतंय यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत.
 
ते म्हणतात, "भाजपला राष्ट्रीय स्तरावर आव्हान देण्यासाठी वेगळ्या पद्धतीचं राजकारण करण्याची गरज आहे. पण प्रमुख विरोधी पक्ष (काँग्रेस) सध्या त्यासाठी तयार नाहीये."
Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती