उद्धव ठाकरेंविरोधात राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे गटाची महायुती?

बुधवार, 26 ऑक्टोबर 2022 (10:28 IST)
मयांक भागवत
मनसेच्या दीपोत्सवाच्या निमित्ताने राज ठाकरे, एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस एकत्र आले. त्याआधी अंधेरी पोटनिवडणुकीत उमेदवार मागे घ्या, असं आवाहान राज ठाकरे यांनी केलं होतं. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेकांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी असं आवाहन केलं होतं. या आवाहनानंतर भाजपने आपला उमेदवार मागे घेतला.
 
गेल्या काही दिवसांपासून तीनही पक्षातील नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या असताना, मनसे आमदार राजू पाटील यांनी 'आमची मनं जुळलेली आहेत. वरून तारा जुळल्या की सर्वकाही जुळून येईल,' असं सूचक वक्तव्य केलंय. त्यामुळे ही या नव्या राजकीय समीकरणाची नांदी आहे का? अशी चर्चा सुरू झालीये.
 
मुख्यमंत्री शिंदेंनी ही फक्त दिवाळी भेट होती असं म्हणत चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला, तर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी 'हिंदुत्वाच्या मुद्यावर कार्यकर्त्यांची मनं जुळली आहेत' अशी प्रतिक्रिया दिलीय.
 
उद्धव ठाकरे सध्या तीनही पक्षांच्या टार्गेटवर आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीविरोधात महायुती होणार, ही चर्चा सुरू होणं स्वाभाविक आहे. पण, ही महायुती होईल का? झाली तर त्याचा फायदा आणि तोटा कोणाला होईल याचाच आढावा आम्ही घेतला आहे.
 
'मनं जुळली आहेत, वरून तारा जुळल्या की सर्व जुळून येईल'
राज ठाकरे, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या महायुतीची चर्चा सुरू झाली वसुबारसच्या मुहूर्तावर. मनसेच्या दीपोत्सवात शिंदे आणि फडणवीसांनी हजेरी लावली. शिंदे-फडणवीसांनी राज यांच्यासोबत चर्चा केली. एवढंच नाही, तर राज ठाकरे यांच्या घरापासून शिवाजी पार्कपर्यंत हे तीनही नेते एकत्र चालत येताना दिसून आले.
 
राजकीय वर्तुळात राज, शिंदे आणि फडणवीस एकत्र येणार का? ही चर्चा सुरू असतानाच मनसे आमदार राजू पाटील यांनी एक सूचक वक्तव्य करून या चर्चेला अधिक खतपाणी दिलं.
 
सोमवारी (24 ऑक्टोबर) प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी म्हटलं, "एक निश्चित, आमची मनं जुळलेली आहेत. वरून तारा जुळल्या की सर्वकाही जुळून येईल. पण, यावर राज ठाकरे निर्णय घेतील."
 
राजू पाटील यांनी हे वक्तव्य केलं असलं तरी काही दिवसांपूर्वी मनसे नेत्यांच्या बैठकीत राज ठाकरेंनी राज्यात 'एकला चलो-रे'चा नारा दिला होता, हे लक्षात घ्यायला हवं
 
महायुतीची चर्चा सुरू होण्याची कारणं काय?
राज, शिंदे आणि भाजप महायुतीची चर्चा सुरू होण्यासाठी गेल्याकाही दिवसात घडलेल्या घटना आणि मोठ्या नेत्यांच्या भेटीगाठी याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. नेते या घटनांना दिवाळी, वैयक्तिक भेट किंवा सदिच्छा भेट अशी नावं देत असले तरी यामागे राजकीय कारण नक्कीच आहे.
 
पहिली घटना
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार मागे घ्यावा, असं पत्र फडणवीसांना लिहिलं. राज यांच्या पत्रानंतर भाजपने सहानुभूतीचा दाखला देत उमेदवारी अर्ज मागे घेतला.
 
हे पत्र लिहिण्याआधी राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रदिर्घ चर्चा केली होती. पुण्यातले काही प्रश्न मार्गी लावण्यासाठी एकनाथ शिंदे यांची भेट घेतली, असं राज यांच्याकडून सांगण्यात आलं.
 
दुसरी घटना
 
मनसेच्या दीपोत्सवात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंसोबत एकाच मंचावर दिसले. उद्घाटन प्रसंगी शिंदे यांनी इथे येण्याची अनेक वर्ष इच्छा होती, पण येऊ शकलो नाही, असं वक्तव्य केलं.
 
तिसरी घटना
 
दिवाळीनिमित्त एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांची राज ठाकरे यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली.
 
चौथी घटना
 
उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी तर, प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंनी राज ठाकरे यांची भेट घेतली होती. आशिष शेलारांसारखे मुंबई भाजपचे नेते सातत्याने राज यांच्याशी चर्चा करत असतात. त्यांच्या भेटीगाठी घेत असता.
 
त्यातूनच मग पुढे मनसे आणि भाजप युतीची चर्चा रंगू लागल्यानंतर पुण्यातील मनसे नेत्यांनी भाजपसोबत युती करण्याची मागणी केली होती. राज्यात काही ठिकाणी मनसे आणि भाजपने युती करून स्थानिक निवडणुका लढवल्या.
 
एकेकाळी मोदी-शहांना विरोध करणाऱ्या राज यांनी अचानक हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे हाती घेतला. मशिदीवरील भोंगे, हनुमानचालिसा यांसारखे मुद्दे उपस्थित करून राज भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपनेही राज यांचं समर्थन करत उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल केला होता.
 
राजकीय विश्लेषक सुधीर सूर्यवंशी सांगतात, "महाविकास आघाडीविरोधात दुसऱ्या बाजूने मजबूत आघाडी देणं गरजेचं आहे. फक्त भाजप आणि शिंदे हे महाविकास आघाडी किंवा मुंबईत शिवसेनेचा पराभव करू शकत नाहीत. त्यामुळे मनसेला सोबत घेणं ही काळाजी गरज आहे."
 
महायुतीच्या चर्चेबद्दल काय म्हणतात मुख्यमंत्री?
मनसेच्या दिपोत्सवाच्या उद्घाटनात एकनाथ शिंदे सहभागी झाले होते. "आम्हाला इथे येण्याची खूप इच्छा होती. पण येऊ शकलो नाही," असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.
 
मंगळवारी (25 ऑक्टोबर) मुख्यमंत्र्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी राज ठाकरेंची घरी भेट घेतली. त्याआधी त्यांनी कल्याण या त्यांच्या समदारसंघात मनसे शाखेला भेट देत स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केलीये.
 
राज्यात नव्या राजकीय समीकरणांची नांदी आहे? यावर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "दिवाळीच्या कार्यक्रमाला राज ठाकरेंनी बोलावलं होतं. यात राजकीय चर्चा नव्हती."
 
काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत पुणे आणि इतर मुद्यांवर चर्चा केली होती. याबाबत बोलताना मंत्री दीपक केसरकर म्हणाले, "युतीबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. आज असा कोणताही निर्णय झालेला नाही."
 
"एका चांगल्या विचाराच्या दिशेने जात असताना समविचारी युती होत नसली. तरी, जनतेच्या हिताच्या दृष्टीने जे सहकार्य करणार असतील त्यांचं सहकार्य घेण्यामागे कोणताही कमीपणा नाही," असं सूचक वक्तव्य मात्र त्यांनी त्यावेळी केलं होतं.
 
महायुतीच्या चर्चाबद्दल काय म्हणतात भाजप नेते?
शुक्रवारी (21 ऑक्टोबरला) देवेंद्र फडणवीसांनी मनसेच्या दीपोत्सव कार्यक्रमात राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंसोबत हजेरी लावली. राज ठाकरेंच्या घरापासून फडणवीस, राज आणि शिंदे चालत शिवाजीपार्कात आले होते.
 
प्रसारमाध्यमांनी देवेंद्र फडणवीसांना महायुतीबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनी उत्तर देणं टाळलं.
 
भाजपचे नेते प्रवीण दरेकर महायुतीच्या प्रश्नाबाबत पत्रकारांशी बोलताना म्हणाले, "महायुतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. पण, एक गोष्ट खरी तिन्ही पक्षांनी हिंदुत्वाचा मुद्दा अधोरेखित केलाय. त्यामुळे कार्यकर्त्यांची मनं जुळली आहेत."
 
कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील महायुतीच्या चर्चेबाबत म्हणाले, "असा कोणताही प्रस्ताव नाही. या विषयावर कोअर कमिटीत चर्चा होईल. पण अशी चर्चा झालेली नाही. ज्याची काही चर्चा नाही. त्याबाबत मी काही बोलणार नाही."
 
महायुतीचा फायदा आणि तोटा कोणाला?
महाविकास आघाडी स्थापन केल्यापासून उद्धव ठाकरे भाजपच्या रडावर आलेत. तर, बंडखोरी केल्यापासून एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीयेत. दुसरीकडे राज ठाकरेदेखील उद्धव यांच्यावर सातत्याने हल्लाबोल करताना पाहायला मिळत आहेत.
 
राजकीय विश्लेषक शैलेंद्र तनपुरे सांगतात, "सद्यस्थितीत महायुती फक्त मुंबई, ठाण्यापुरती मर्यादीत राहील असं दिसतंय. याचं कारण भाजपला मुंबई महापालिकेची सत्ता हवी आहे. त्यासाठी त्यांना राज ठाकरेंची गरज लागेल. अशात ही युती म्हणजे पहिला प्रयोग असू शकतो."
 
पण राजकीय जाणकार मृणालिनी नानिवडेकर यांच्यामते फडणवीस, राज आणि शिंदे यांची युती होणार नाही. त्या सांगतात, "उद्धव ठाकरेंना सतत टेन्शन देण्यासाठी हे तीनही नेते एकमेकांना सतत भेटत रहातील. उद्धव ठाकरेंशी भांडण करून बाहेर पडलेले राज ठाकरे माझ्याशी मैत्रीने वागतात असं शिंदेंना दाखवायचंय."
 
एकनाथ शिंदेंचा ठाण्यात चांगला दबदबा आहे. पण मुंबईत त्यांना मानणारा कार्यकर्ता नाही. मुंबईतील नेते आणि माजी नगरसेवक अजूनही शिंदे गटाला जाऊन सामील झालेले नाहीत.
 
शैलेंद्र तनपुरे पुढे म्हणाले, "भाजपच्या लक्षात आलंय की शिंदे मुंबईत फासरे उपयोगी ठरणार नाहीत. त्यामुळे मुंबईत राज ठाकरे जोडीला पाहिजेत. शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंची पक्षांतर्गत मजबूत झालेली तटबंदी तोडण्यासाठी राज ठाकरेंचा उपयोग होऊ शकेल असं गणित असावं."
 
भाजप आणि मनसे एकत्र येतील अशी चर्चा सुरू असतानाच भाजप नेत्यांकडून आम्ही युती करणार नाही, असं खासगीत सांगण्यात येत होतं.
 
युती केली तर मनसेला राजकीय जीवदान मिळेल, अशी भीती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना वाटत होती, असं काही राजकीय जाणकारांना सांगतात.
 
याबाबत सुधीर सूर्यवंशी म्हणाले, "मुंबईत काही ठिकाणी राज ठाकरेंचा होल्ड चांगला आहे. त्यामुळे युती होईल किंवा छुपी हातमिळवणी हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल. पण, फायदा-तोटा कोणाला होईल हे आता सांगता येणार नाही."
 
मुंबईत शिवसेना आणि मनसेने मराठीच्या मुद्यावर राजकारण केलं. त्यामुळे मनसेने महायुतीच्या बाहेर राहून शिवसेनेची मतं ओढली तर याचा थेट फायदा भाजप आणि फडणवीसांना होईल, अशीही शक्यता वर्तवली जात आहे.
 
राज ठाकरेंनी 2019 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये लाव रे तो व्हीडिओ असं म्हणत मोदी-शहांवर टीकेची झोड उठवली होती. तर देवेंद्र फडणवीसांनी प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत मनसे म्हणजे उमेदवार नसलेला पक्ष असं विधान केलं होतं.
 
मृणालिनी नानिवडेकर सांगतात, "भाजप राज ठाकरेंसोबत जाणार नाही. शत प्रतिशत भाजप असं भाजपचं धोरण आहे. त्यामुळे आणखी एका ठाकरेला भाजप जागा देणार नाही."
Published By -Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती