गोपीचंद पडळकर बारामतीतून भाजपचे उमेदवार, अजित पवार यांच्याविरोधात लढवणार विधानसभा निवडणूक

सोमवार, 30 सप्टेंबर 2019 (16:08 IST)
धनगर समाजातले नेते गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट संकेत दिले की पडळकर हे बारामतीत भाजपचे उमेदवार असतील.
 
फडणवीस म्हणाले, "गोपीचंद पडळकर हा ढाण्या वाघ आहे. ढाण्या वाघाने जंगलाच्या राजासारखं राहायचं असतं. मी त्यांच्यावर सोडतो, पण माझी इच्छा अशी आहे की गोपीचंद पडळकर यांनी बारामतीची सीट लढली पाहिजे. तुमची जर मान्यता असेल तर मी पक्षाशी बोलतो. गोपीचंदजींना बारामतीत उतरवून बारामीत आपण जिंकून दाखवू."
 
बारामती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार अजित पवारच असतील, असं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शनिवारी जाहीर केलं होतं. त्यामुळे बारामतीत यावेळी अजित पवार विरुद्ध पडळकर असा सामना रंगेल.
 
'पडळकर बळीचा बकरा'
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं, "भाजपकडे उमेदवार नसल्यामुळेच गोपीचंद पडळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांचा बळीचा बकरा करण्यात आला आहे. चंद्रकांत पाटील हे गेल्या अनेक महिन्यांपासून बारामतीमध्ये तळ ठोकून होते. त्यांच्या बोलण्यावरून असं वाटत होतं की ते बारामतीतून लढतील पण ते उभे राहिले नाही आणि पडळकरांचं नाव पुढे केलं. पडळकर यांच्या उमेदवारीला आम्ही आव्हान पण समजत नाहीत. भाजपकडे प्रबळ उमेदवार नसल्यामुळेच वंचितचा उमेदवार त्यांना घ्यावा लागला आहे."
 
लोकसभा निवडणुकीवेळी सुप्रिया सुळे यांची मतं धनगर समाजाच्या नाराजीमुळे कमी झाली होती, असं जाणकार सांगतात. आता त्याच समाजातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यामुळे अजित पवारांसमोर आव्हान उभं राहू शकतं. यावर मलिक म्हणतात, "भाजपने गेल्या पाच वर्षांत या समाजाची फसवणूक केली आहे. त्यामुळे हा समाज त्यांच्या उमेदवाराला मतदान करेल की नाही याबाबत शंका आहे."
 
भाजप प्रवक्ते माधव भांडारी म्हणतात, "ही तुल्यबळ लढत होईल. पडळकर चांगली फाइट देतील."
 
गोपीचंद पडळकर यांना बळीचा बकरा केल्याचा आरोप राष्ट्रवादी करत आहे. याबद्दल तुम्हाला काय वाटतं असं विचारल्यावर भंडारी म्हणाले, "ते लवकरच कळेल कोण बळीचा बकरा आहे."
 
धनगर आरक्षण
भाजप सरकारने धनगरांना ST आरक्षण दिलं नाही, म्हणून याआधी पडळकरांनी भाजपवर टीका केली होती. आंदोलनंही केली होती. त्यावेळी पडळकर म्हणाले होते, "सरकार आम्हाला आरक्षण देण्यास टाळाटाळ करत आहेत. पण जर आता धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमाती प्रवर्गात करून आरक्षण लागू झालं नाही तर महाडमधून अंदाजे 20-25 लाख धनगर लोक आपल्या शेळ्या, मेंढ्या, गुराढोरांसह मोर्चा काढतील आणि विधानभवनावर धडकतील," असं पडळकर यांनी सांगितलं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती