सुमित्रा नायक : रग्बीसाठी मैदानात आणि मैदानाबाहेरचा अविरत संघर्ष
सोमवार, 18 जानेवारी 2021 (11:06 IST)
2008 ची गोष्ट आहे. 8 वर्षांची एक मुलगी ओडिशातील एका क्रीडांगणाबाहेर उभी होती. खेळाडूंचा एक गट अंड्याच्या आकाराच्या चेंडूच्या मागे पळापळी करत होता.
ती मुलगी पहिल्यांदाच हा खेळ पाहत होती. हीच मुलगी म्हणजे सुमित्रा नायक.
सुमित्रा आज भारताच्या राष्ट्रीय रग्बी संघातील महत्त्वाची खेळाडू आहे.
सुमित्राने भुवनेश्वरच्या कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सच्या मैदानात रग्बी खेळायला सुरुवात केली. त्यावेळी तिचं वय खूप कमी होतं. तिने आपल्या आयुष्याच्या सुरुवातीलाच अतिशय बिकट दिवस पाहिले.
सुरुवातीची आव्हानं
सुमित्राचा जन्म 8 मार्च 2000 ला ओडिशाच्या जजपूर जिल्ह्यातील डुबरी गावात झाला.
पण सुमित्राचे वडील तिच्या आईला खूप मारहाण करायचे. त्यामुळे तिने आपल्या तिन्ही मुलांना घेऊन गाव सोडण्याचा निर्णय घेतला.
एकदा तर सुमित्राच्या आईला जिवंत जाळण्याचा प्रयत्नही वडिलांनी केला होता. पण त्यातून त्या वाचल्या.
या परिस्थितीतून जात असलेल्या सुमित्राच्या आईने आपल्या मुलांना या वातावरणापासून दूर ठेवण्याचा निर्णय घेतला.
सुमित्राला चांगल्या पद्धतीने वाढवण्यासाठी तिने प्रयत्न सुरू केले.
आईने सुमित्राला कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स शाळेत चौथ्या इयत्तेत प्रवेश मिळवून दिला.
या संस्थेत आदिवासी समुदायातील मुलांना शिक्षण आणि क्रीडा प्रशिक्षण मोफत देण्यात येतं.
सुमित्राची आई एक ब्युटी पार्लर चालवते. तिला रग्बी या खेळाविषयी काहीच माहिती नव्हती. खेळाडूंना एकमेकांच्या अंगावर पडणं, चेंडू हिसकावत धावणं आदी गोष्टी पाहून त्यांना पहिल्यांदा भीती वाटली.
पण सुमित्राने आपल्या आईची समजूत घातली. या खेळाचं प्रशिक्षण योग्य प्रकारे दिलं जातं, आपली काळजी घेण्यासाठी तंत्र शिकवलं जातं, हे तिने आईला समजावून सांगितलं.
पुढे आईने पाठिंबा दिल्यामुळेच आपण खेळ चालू ठेवून हा पल्ला गाठू शकल्याचं सुमित्रा सांगते.
रग्बीमध्ये असं कमावलं नाव
सुमित्राने मैदानावर उतरताच रग्बीमध्ये नाव कमावण्यास सुरुवात केली. तिने एकामागून एक पदकांची रांगच लावली.
आपल्या कारकिर्दीत सुरुवातीच्या टप्प्यात सुमित्राने कठोर सराव केला. आपल्या तंत्रातील चुका सुधारण्यासाठी तिने प्रचंड मेहनत घेतली.
2016 मध्ये सुमित्राची निवड राष्ट्रीय संघात झाली. त्यावेळी भारताने एशियन चँपियनशिप (16 वर्षांखालील) स्पर्धेत कांस्यपदक पटकावलं.
सुमित्राला परदेशातील मैदानावर खेळायला जास्त आवडतं. तिथं अनेकांना भेटण्याची आणि त्यांच्याकडून खेळातील बारकावे समजून घेण्याची संधी मिळते, असं तिला वाटतं.
2019 मध्ये झालेली एशियन वुमन्स रग्बी चँपियनशीप स्पर्धा सुमित्रा नायक हिच्यासाठी विशेष ठरली. यावेळी भारतीय संघात सातऐवजी 15 खेळाडूंना निवडण्यात आलं होतं.
या स्पर्धेत भारताने अत्यंत देखणी कामगिरी केली. भल्या भल्या संघांना मागे टाकून भारतीय संघाने कांस्य पदक पटकावण्यात यश मिळवलं.
ऑलिंपिक स्पर्धेवर नजर
भारतीय संघाने आशियात आपली रँकिंग सुधारून नवव्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर झेप घ्यावी, अशी सुमित्राची अपेक्षा आहे. या कामगिरीनंतर भारताला ऑलिंपिक स्पर्धेत प्रवेश मिळू शकेल.
सुमित्राच्या मते, मुलींना आपले निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य असलं पाहिजे. आजही मुलींचे नातेवाईकच तिच्याबाबत निर्णय घेत असतात.
मुलींना कमी लेखता कामा नये. समाज बदलण्यासाठी नातेवाईकांची विचारसरणी बदलणं गरजेचं आहे, असं सुमित्राला वाटतं
सुमित्रासाठी शिक्षण सांभाळून क्रीडा प्रशिक्षण घेताना कोणत्याही समस्या आल्या नाहीत. पण करिअरच्या दृष्टीने रग्बी हा दुर्लक्षित खेळ असल्याचं ती सांगते. या खेळामुळे तुम्हाला नोकरी मिळत नाही. तसंच या क्रीडा प्रकारात कोणताही मोठा पुरस्कार दिला जात नाही, भारत सरकारने अद्याप या खेळाला मान्यताही दिलेली नाही, असं ती सांगते.