शेतकरी आंदोलन : प्रियांका गांधी ट्रॅक्टर रॅलीत प्राण गेलेल्या शेतकऱ्याच्या घरी पोहोचल्या

गुरूवार, 4 फेब्रुवारी 2021 (18:30 IST)
कृषि कायद्यांच्या विरोधात प्रजासत्ताक दिनी दिल्लीमध्ये आयोजित ट्रॅक्टर रॅलीमध्ये नवरित सिंह नामक तरूणाचा मृत्यू झाला होता. नवरित सिंह याच्या शोकसभेस उपस्थित राहण्यासाठी काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी या रामपूरला गेल्या होत्या.
 
आज सकाळी दिल्ली येथून निघाल्यानंतर प्रियांका गांधी दुपारी 12 च्या सुमारास रामपूर येथील नवरित सिंह यांच्या निवासस्थानी पोहोचल्या.
 
नवरित हे उत्तर प्रदेशातील रामपूर जिल्ह्यातील बिलासपूर तालुक्यात डिबडिबा गावातील रहिवासी होते.
 
दिल्लीच्या ITO परिसरात ट्रॅक्टर पलटी होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. नवरित नुकतेच ऑस्ट्रेलियातून परतले होते. शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी ते दिल्लीला आले होते.
 
दरम्यान, रस्त्यातच प्रियांका गांधी यांच्या ताफ्याला छोटासा अपघात झाला आहे. या ताफ्यातील 4 वाहने एकमेकांना धडकल्याची घटना घडली. पण यामध्ये कुणीही जखमी झालं नाही, अशी माहिती मिळाली आहे. हापूर गावाजवळ ही घटना घडली.
 
दिल्लीच्या सीमेवर काय घडलं?

दिल्लीच्या सीमांवर ठोकण्यात आलेले खिळे काढले जात असल्याचे व्हीडिओ व्हायरल होत आहेत. पण ते काढले नसल्याचं दिल्ली पोलिसांचं म्हणणं आहे.
 
हे खिळे काढले जात नसून ते वेगळ्या पद्धतीने पुन्हा बसवले जात आहेत, त्याची पुर्नरचना केली जात आहे, असं दिल्ली पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
 
विरोधीपक्षाच्या खासदारांना पोलिसांनी आडवलं

विरोधी पक्षाच्या खासदारांचं एक शिष्टमंडळ आज दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेण्यासाठी गेलं होतं. पण पोलिसांनी त्यांना आंदोलनाच्या ठिकाणी जाण्यापासून मज्जाव केलाय
 
या शिष्टमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, द्रमुक खासदार कनिमोळी, शिरोमणी अकाली दलाच्या खासदार हरसिम्रतकौर बादल आणि तृणमूल काँग्रेस खासदार सौगाता रॉय यांचा समावेश होता.
 
यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, "हा संतापजनक प्रकार आहे. अशी स्थिती कुठल्या सीमेवरसुद्धा करण्यात आलेली नाही. याचा मी जाहीर निषध करते. धिक्कार करते. सरकारनं त्यांना इगो बाजूला ठेऊन यावर तोडगा काढाला पाहिजे."
 
शेतकरी आंदोलनावर अमेरिकेची प्रतिक्रिया

अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रातलयातील प्रवक्त्यांनी एक वक्तव्य प्रसिद्ध करत भारतातील कृषी कायद्यांचं समर्थन केलं आणि 'शांततेच्या मार्गाने होणाऱ्या आंदोलनाला लोकशाहीची परीक्षा' म्हटलं आहे.
 
बऱ्याच आंतरराष्ट्रीय व्यक्तींनी शेतकरी आंदोलनावर ट्वीट केल्यानंतर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यानंतर अमेरिकेने ही प्रतिक्रिया दिली आहे.
 
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्यांनी सांगितलं, "अमेरिका सामान्यपणे भारतीय बाजाराची स्थिती सुधारण्यासाठी आणि खाजगी क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी उचललेल्या पावलांचं स्वागत करते."
 
मात्र, शेतकरी आंदोलनासंबंधीच्या प्रश्नांवर आणि समस्यांवर दोन्ही पक्षांनी चर्चा करून समाधान काढावं, असं अमेरिकेचं मत असल्याचं ते म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले, "शांततेच्या मार्गाने होणारी निदर्शनं कुठल्याही समृद्ध लोकशाहीसाठी परीक्षा असतात आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयानेही हेच म्हटलं आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे."
 
सुप्रीम कोर्टाचा सुनावणीस नकार
 
शेतकरी आंदोलनादरम्यान प्रजासत्ताकदिनी दिल्लीत आयोजित ट्रॅक्टर रॅलीमध्ये हिंसाचाराची घटना घडली होती. या प्रकरणाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी सुप्रीम कोर्टात विविध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. पण या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.
 
या प्रकरणाची चौकशी सरकारमार्फत सुरू असून ते दोषींवर कठोर कारवाई करतील, असं सरन्यायाधीश शरद बोबडे यावेळी म्हणालेत. पण याचिकाकर्त्यांना सरकारसमोर त्याचं म्हणणं मांडण्याची परवानगी सुप्रीम कोर्टाने दिली आहे.
 
याप्रकरणी सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आलेल्या विविध याचिकांची एकत्रितरित्या सुनावणी घेण्यात आली.
 
एका याचिकेत या घटनेची चौकशी निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वाखालील समितीकडून करण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली होती. पण ही मागणीसुद्धा सुप्रीम कोर्टाने फेटाळून लावली.
 
याचिकाकर्त्यांनी सर्वप्रथम संबंधित अधिकाऱ्यांकडे जाऊन तक्रार दाखल करावी, असं कोर्टाने म्हटलं आहे.
 
याप्रकरणी याचिका दाखल करणारे वकील विशाल तिवारी यांनी आपलं म्हणणं यावेळी कोर्टासमोर मांडलं.
 
25 जानेवारीपर्यंत आंदोलन शांततापूर्वक सुरू होतं. पण 26 जानेवारीला जे घडलं ते दुर्दैवी होतं, असं तिवारी म्हणाले.
 
याची चौकशी सरकार करत असल्याने तिवारी ही याचिका मागे घेऊ शकतात, असं सरन्यायाधीश बोबडे यांनी म्हटलं. तसंच यावेळी सुप्रीम कोर्टाने मनोहरलाल शर्मा यांची दाखल केलेली याचिकाही रद्द केली आहे.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती