कोरोना व्हायरचा संसर्ग शाकाहारी लोकांना होत नाही? - रिअॅलिटी चेक
मंगळवार, 9 जून 2020 (14:14 IST)
जगभरात कोरोना व्हायरसचा प्रसार वेगाने होत आहे, यासोबतच कोरोनावरचे अनेक उपचारही सोशल मीडियावरून सांगितले जात आहेत.
सोशल मीडियावर सांगितल्या जाणाऱ्या या उपायांपैकी काहींच मूळ आम्ही शोधलं.
भारतातल्या दोन प्रमुख वैद्यकीय संस्था आणि देशातल्या डॉक्टर्सनी व्हॉट्स अॅपवर मोठ्या प्रमाणावर शेयर केलेल्या एका खोट्या मेसेजवर टीका केली आहे. या मेसेजमध्ये या डॉक्टरांचं नाव घेऊन उपाय सुचवले आहेत.
या मेसेजमध्ये कोरोनापासून बचाव करण्यासाठी एक मोठी यादी सुचवण्यात आली आहे. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचं पालन करणं, गर्दी टाळणं आणि स्वच्छतेसारख्या महत्त्वाच्या बाबींचा समावेश आहे.
यामध्येच 'शाकाहारी व्हा', अशीही सूचना करण्यात आली आहे. तसंच बेल्ट, अंगठी अथवा घड्याळ घालू नका असंही म्हटलं आहे. पण यापैकी कोणत्याही उपायातून कोरोना व्हायरसला रोखण्यास मदत होते, याचा काहीएक पुरावा मिळालेला नाहीये.
कोरोनासंबंधी जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) आहारात फळं आणि पालेभाज्यांचा वापर करण्यास सांगितलं आहे.
फ्लूच्या लसीमुळे कोरोनाची शक्यता बळावत नाही
फेसबुकवर एक पोस्ट मोठ्या प्रमाणावर शेअर केली जात आहे. त्यात दावा केला जातोय की, जर तुम्ही कधी इन्फ्लूएन्झाची लस घेतली असेल, तर तुम्हाला कोरोनाची लागण व्हायची शक्यता जास्त आहे.
एका पोस्टमध्ये तर याचा पुरावा म्हणून US लष्कराच्या संशोधनाचा दाखला दिला जातोय.
पण, हा अभ्यास ऑक्टोबर 2019 मध्ये प्रसिद्ध झाला होता. तोपर्यंत कोरोनाची सुरुवातही झाली नव्हती. तसंच या अभ्यासासाठी वापरण्यात आलेले आकडे 2017-18च्या फ्लूशी संबंधित आहेत.
या बाबीचा कोणताही पुरावा नाही की, फ्लूच्या लशीमुळे तुम्हाला कोरोना व्हायची अधिक शक्यता असते.
यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोलने स्पष्ट म्हटलंय की, इन्फ्लूएन्झाच्या लसीरकरणामुळे इतर साथीच्या रोगांना बळी पडण्याची शक्यता वाढते, याची काहीएक पुरावा नाहीये.
नियमितपणे फेस मास्क वापरल्यामुळे नुकसान नाही
अनेक दिवस फेस मास्क वापरल्यास ते आरोग्यासाठी धोकादायक असतं, असा एक लेख सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
स्पॅनिश भाषेत सर्वांत अगोदर हा दावा करण्यात आला होता. अमेरिकेतही हा लेख मोठ्या प्रमाणावर शेअर करण्यात आला.
त्यानंतर इंग्रजीत या लेखाचा अनुवाद आला. नायजेरियाच्या एका न्यूज साईटवर तर हा लेख 55 हजारांहून अधिक जणांनी शेअर केला.
या लेखात दावा केला होता की, खूप वेळासाठी मास्क घालून श्वास घेतल्यास कार्बन डायऑक्साईड श्वसनातून आत जातो. यामुळे चक्कर येतात आणि शरीरात ऑक्सिजनची कमतरता जाणवते. त्यामुळे मग दर दहा मिनिटाला मास्क हटवण्याची शिफारस केली जाते.
जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. रिचर्ड मिहिगो यांनी बीबीसीला सांगितलं, "हे दावे चुकीचे आहेत आणि त्यांचं पालन केल्यास आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो."
त्यांनी म्हटलं, "नॉन-मेडिकल आणि मेडिकल मास्क हे विणलेल्या धाग्यांनी तयार केले जातात. त्यात श्वास घेण्याची क्षमता असते. त्यातून तुम्ही आरामात श्वास घेऊ शकता."
मास्क काढून श्वास घेणं म्हणजे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखं आहे, असंही ते सांगतात.
अशा काही परिस्थितींमध्ये मास्क न वापरण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो.
1. दोन वर्षांपेक्षा कमी वयाची मुलं, ज्यांच्या फुफ्फुसांचा विकास पूर्णपणे झालेला नसतो.
2. श्वसनासंबंधीचे आजार असलेल्या व्यक्ती ज्यांना श्वास घेताना त्रास होतो.
धूम्रपान केल्यामुळे कोरोनापासून बचाव होत नाही
यापद्धतीचा दावा अनेक वेळा समोर येत आहे. या दाव्यात तथ्य असावं, असं धूम्रपान करणाऱ्यांना वाटत असेल, पण तसं नाहीये.
धूम्रमान केल्यामुळे कोरोनाची लागण व्हायची शक्यता कमी असते, या बाबीचा काहीएक पुरावा नाही. पण, अशापद्धतीचा दावा करणारे अनेक लेख आहेत.
उदाहरणार्थ- युके मेल ऑनलाईनचा हा लेख बघा. दहा हजारपेक्षा अधिक वेळा तो शेअर केला गेला आहे. धूम्रपान केल्यामुळे कोरोनाची लागण व्हायची शक्यता कमी होते, असं त्यात म्हटलंय.
अनेक देशांमध्ये कोरोनाचे जे रुग्ण दवाखान्यात भरती झाले, त्यामध्ये धूम्रपान करणाऱ्यांची संख्या कमी प्रमाणात होती, असंही म्हटलं होतं. तसंच तज्ज्ञ यासंबंधीची माहिती शोधण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही त्यात म्हटलं.
एका प्रमुख फ्रेंच हॉस्पिटलच्या संशोधनानुसार निकोटिन कोरोनाच्या संसर्गचा प्रसार रोखण्याचं कारण असू शकतं, असं म्हटलं गेलं.
निकोटिन पॅच आणि निकोटिन रिप्लेसमेंट थेरेपीचा कोरोना व्हायरसवर नेमका काय परिणाम होतो, याविषयीचं अध्ययन सध्या सुरू आहे.
पण WHOचं म्हणणं आहे की, कोरोनावरील उपाय किंवा कोरोना रोखण्यासाठी तंबाखू अथवा निकोटिन परिणामकारक ठरतं, याविषयी आतापर्यंत पुरेशी माहिती समोर आलेली नाही. यात म्हटलंय की, धूम्रपान करणारे लोक कोरोना व्हायरसमुळे गंभीररित्या आजारी पडण्याची शक्यता आहे.
तसंच जी माणसं स्मोकिंग करतात, त्यांनी कोरोनाच्या साथीचा विचार करता स्मोकिंग सोडायला हवं, कारण त्यामुळे फुफ्फुसाची गंभीर आजार उद्भवू शकतो, अशीही वैद्यकीय सूचना देण्यात आली आहे.
(दिल्लीत श्रुती मेनन आणि नैरोबीत पीटर म्वाई यांनी केलेल्या संशोधनावर आधारित लेख)