जेव्हा तिनं ते बाळ पुरलं तेव्हा पिंग पाँग या कुत्र्यानं पाहिलं. ती मुलगी तिथून गेल्यानंतर तो कुत्रा भुंकू लागला आणि त्याने जमीन उकरायला सुरुवात केली. कुत्रा काहीतरी वेगळं करतोय याची जाणीव त्याच्या मालकाला झाली आणि तो तिथं पोहोचला. त्या व्यक्तीच्या लक्षात आलं की जमिनीत काहीतर पुरलंय. तितक्यात त्या मालकाला त्या बाळाचे पाय दिसले.
पिंग पाँग एका पायाने अधू आहे. एका अपघातात त्याने पाय गमावला. निसायका सांगतात की "पिंग पाँगचा पाय जाऊनही मी त्याला माझ्याजवळ ठेवलं कारण तो प्रामाणिक, आज्ञाधारक आणि प्रेमळ आहे. मी जेव्हा गुरं चारायला जातो तेव्हा माझी मदत करण्यासाठी तो नेहमी तत्पर असतो. त्याच्यावर पूर्ण गाव प्रेम करतं."
चुम फुआंग या पोलीस स्टेशनचे अधिकारी पानुवत पुत्तकम यांनी बॅंकॉक पोस्टला सांगितलं की त्या बाळाची आई सध्या मनोविकारतज्ज्ञांच्या निगराणीत आहे. तिला तिच्या कृत्याचा पश्चाताप होत आहे. त्या बाळाचं संगोपन करण्याची तयारी त्या बाळाच्या आजी-आजोबांनी म्हणजेच किशोरवयीन मातेच्या पालकांनी दर्शवल्याचं पोलिसांनी सांगितलं.