पद्मश्री पुरस्कार मिळवणाऱ्या महाराष्ट्रातील 5 मानकऱ्यांना तुम्ही ओळखता का
बुधवार, 27 जानेवारी 2021 (13:11 IST)
प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला सात जणांना पद्मविभूषण, 10 जणांना पद्मभूषण, तर 102 जणांना पद्मश्री पुरस्कार घोषित झाले आहेत.
महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातील पाच जण पद्मश्री पुरस्काराचे मानकरी ठरले आहेत. परशुराम आत्माराम गंगावणे (कला), नामदेव सी. कांबळे (साहित्य आणि शिक्षण), गिरीश प्रभुणे (सामाजिक कार्य), जसवंतीबेन जमनादास पोपट (उद्योग आणि व्यापार) आणि सिंधुताई सपकाळ (सामाजिक कार्य)
परशुराम आत्माराम गंगावणे
कला क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार महाराष्ट्रातील परशुराम गंगावणे यांना जाहीर झाला आहे. परशुराम गंगावणे गेल्या 45 वर्षांपासून आदिवासी पारंपरिक लोककला जतन आणि प्रसार करण्याचे काम करत आहेत. आव्हानात्मक परिस्थितीतही त्यांनी ही लोककला जोपासली असल्याने त्यांचे कार्य विशेष ठरले.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यात पिंगुळी गावात परशुराम गंगावणे यांनी कळसूत्री बाहुल्यांची कला जोपसली आहे. कळसूत्री बाहुल्यांच्या माध्यमातून आतापर्यंत त्यांनी अनेक लोककथा सादर केल्या आहेत.
आदिवासी कलेचा हा वारसा पुढे चालू ठेवण्यासाठी परशुराम गंगावणे यांनी गुरे आणि गोठा विकून त्याठिकाणी लोककलेचे संग्रहालय बनवले आहे. त्यांनी कलाआंगण चॅरिटेबल ट्रस्टही सुरू केले आहे या संग्रहालयात पपेट, चित्रकथा, कळसूत्री पहायला मिळतात.
सिंधुताई सपकाळ
सिंधुताई सपकाळ यांनी 1994 साली पुण्यातील पुरंदर तालुक्यात अनाथ मुलांसाठी 'ममता बाल सदन' नावाची संस्था स्थापन केली. अनाथ मुलांसाठी त्यांनी केलेल्या कामांमुळे महाराष्ट्रासह देशभरात त्या 'अनाथांची माय' म्हणून परिचित झाल्या.
सिंधुताई सपकाळ या गेली 40 वर्षे सामाजिक कार्य करत आहेत. त्यांना आजवर 750 हून अधिक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. अनाथ मुलांना आईसारखी माया देणाऱ्या सिंधुताई नेहमी अभिमानाने सांगतात की, मी हजारहून अधिक मुलांची आई आहे.
नामदेव कांबळे
गावकुसाबाहेरील स्त्रियांच्या वेदना मांडणारे विदर्भातील लेखक नामदेव कांबळे यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातला पद्मश्री पुरस्कार घोषित झाला आहे. 'राघववेळ' या कांदबरीसाठी 1995 साली साहित्य अकदमीच्या पुरस्काराने त्यांचा सन्मान करण्यात आला होता.
वाशीममधील शिरपूर गावात शेतमजूर कुटुंबात त्यांचा जन्म झाला. वाशीम येथील राणी लक्ष्मीबाई शाळेत ते शिक्षक होते. याच शाळेत त्यांनी सुरुवातीला सुरक्षारक्षकाचीही नोकरी केली.
अस्पर्श,राघववेळ, ऊनसावली, साजरंग अशा आठ कांदबऱ्या, चार कवितासंग्रह, दोन कथासंग्रह, चरित्र लेखन, भाषण संग्रह असे साहित्य त्यांच्या नावावर आहे.
डॉ.बाबसाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा जीवनगौरव पुरस्कार, अण्णाभाऊ साठे पुरस्कारानेही त्यांना गौरवण्यात आले आहे. बालभारतीच्या अध्यक्षपदीही त्यांनी काम केले आहे.
गिरीश प्रभुणे
सामाजिक कार्य क्षेत्रातील पद्मश्री पुरस्कार गिरीश प्रभुणे यांना जाहीर झाला आहे. उपेक्षित, वंचित घटकातील लोकांसाठी, भटक्या-विमुक्त समाजासाठी त्यांनी काम केले.
'भटके-विमुक्त समाज परिषदे'च्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून ते कार्यरत आहेत. तुळजापूरजवळील वैदू, कैकाडी, पारधी समाजातील मुलांसाठी त्यांनी काम केले. चिंचडवड येथील 'पुनरुत्थान समरसता गुरुकुलम'मधील भटक्या समाजातील मुला-मुलींच्या शिक्षण आणि कौशल्यविकासासाठी त्यांनी कार्य केले.
पारधी समाजासाठी, त्यांच्या प्रश्नांवर, त्यांच्या जीवनावर आधारित त्यांनी लेखन केले. 'पारधी' पुस्तकाचे ते लेखक आहेत.
जसवंतीबेन जमनादास पोपट
व्यापार आणि उद्योग क्षेत्रातील कार्यासाठीचा पद्मश्री पुरस्कार जसवंतीबेन जमनादास पोपट यांना जाहीर झाला. सुप्रसिद्ध लिज्जत पापड उद्योगाच्या त्या संस्थापिका आहेत.
80 रुपये उधारीवर जसवंतीबेन यांनी हा व्यवसाय सुरू केला होता. या व्यवसायाची उलाढाल शेकडो कोटींची असून 42 हजार महिला कर्मचारी येथे काम करतात.
मुंबईत गिरगाव परिसरात राहणाऱ्या जसवंतीबेन आणि त्यांच्या सात मैत्रीणींच्या पुढाकाराने हा उद्योग 1965 साली सुरू झाला. आपल्या घराला हातभार म्हणून महिलांनी हे काम सुरू केले आणि बघता बघता लिज्जत पापड घराघरात पोहचला.