दिनू रणदिवे : जवाहरलाल नेहरू ते नरेंद्र मोदींपर्यंतची राजकीय स्थित्यंतरं अनुभवणारा पत्रकार

मंगळवार, 16 जून 2020 (16:21 IST)
मराठी पत्रकारितेला नवा आयाम देणारे ज्येष्ठ पत्रकार, स्वातंत्र्यसैनिक, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील अग्रणी दिनू रणदिवे यांचं मंगळवारी (16 जून) दादर इथल्या निवासस्थानी सव्वा अकराच्या सुमारास निधन झालं. ते 95 वर्षांचे होते.
 
दिनू रणदिवे यांचा जन्म 1925 साली झाला होता. देशात पार पडलेल्या पहिल्या निवडणुकांपासून अगदी आताआतापर्यंतची सामाजिक-राजकीय स्थित्यंतरं त्यांनी अनुभवली होती.
 
गोवा मुक्ती संग्राम तसंच संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचं मोलाचं योगदान होतं. संयुक्त महाराष्ट्र समितीने 'संयुक्त महाराष्ट्र पत्रिका' या नावाचं अनियतकालिक सुरू केलं होतं. रणदिवे यांच्या पत्रकारितेची सुरुवात तिथून झाली.
 
महाराष्ट्र टाईम्समध्ये मुख्य वार्ताहर म्हणून अनेक वर्षे त्यांनी काम केलं. 15 सप्टेंबर 1985 रोजी ते महाराष्ट्र टाइम्समधून निवृत्त झाले. 1972 मध्ये त्यांनी केलेलं बांगलादेश मुक्तिलढ्याचं वृत्तांकन गाजलं होतं.
 
महिनाभरापूर्वी, 16 मे रोजी त्यांच्या पत्नी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील कार्यकर्त्या, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्त्या सविताताई रणदिवे यांचं निधन झालं होतं.
 
लॉकडाऊन काळात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रणदिवे दांपत्याची भेट घेतली होती. गेल्या वर्षी राज्य सरकारतर्फे त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
 
दिनू रणदिवेंच्या जाण्याने पत्रकारितेचं वैभव आपल्यातून गेले - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांना आदरांजली व्यक्त केली.
 
"पत्रकारितेच्या माध्यमातून गरीब, श्रमिक वर्गावरील अन्यायाला वाचा फोडणारे आणि त्यांच्यासाठी प्रत्यक्ष मैदानात येऊन भांडणारे ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे गेल्याचे कळले आणि खूप दुःख झाले. पत्रकारितेतील वैभवच गेले आहे," असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. 
 
"ठाकरे परिवाराशी त्यांचा स्नेह होता. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी त्यांची नेहमी अनेक विषयांवर चर्चा व्हायची," अशा आठवणींनाही उद्धव ठाकरेंनी उजाळा दिला.
 
"दिनू रणदिवेंच्या जाण्याने संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा एक मोठा दुवा निखळला आहे. तसेच पत्रकारितेचे वैभव आपल्यातून गेले आहे," अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक भावना व्यक्त केल्या आहेत.
 
दिनू रणदिवेंना श्रद्धांजली
ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचं निधन ही अत्यंत दु:खद बातमी आहे. त्यांची कारकीर्द युवा पत्रकारांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. गेल्या वर्षीच पत्रकारितेतील अतुलनीय योगदानासाठी रेडइंक जीवनगौरव पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं, असं मुंबई प्रेस क्लबने म्हटलं आहे.
 
"ज्येष्ठ पत्रकार दिनू रणदिवे यांचे निधन झाले. त्यांच्या रुपाने पत्रकारितेच्या एका सोनेरी पर्वाचा अस्त झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
"पत्रकारिता हे मिशन मानणाऱ्या पिढीचे ते प्रतिनिधी. संयुक्त महाराष्ट्र पत्रिकेने त्या लढ्याला आवाज दिला. त्यासाठी त्यांनी तुरुंगवासही भोगला. महाराष्ट्र टाईम्स, दिनांक आणि महानगरच्या जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता. आदरांजली," असं निखील वागळे यांनी म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती