जायरा वसीमने सिनेसृष्टी सोडली, फेसबुक पोस्टने केला खुलासा
'दंगल' आणि 'सिक्रेट सुपरस्टार' या सिनेमांमुळे प्रकाशझोतात आलेली बालकलाकार जायरा वसीमने बॉलीवुडला राम-राम ठोकला आहे.
यासंदर्भात तिनं फेसबुकवर एक मोठं पत्र लिहिलं आहे. यात ती म्हणते की तिने तिचा धर्म आणि अल्लाहसाठी हा निर्णय घेतला आहे. सिनेमात काम करताना ती तिच्या धर्मापासून भरकटल्याचं ती सांगते.
जायराच्या फेसबुक पोस्टमधला महत्त्वाचा भाग
5 वर्षांपूर्वी मी एक निर्णय घेतला होता. त्या निर्णयानं माझं आयुष्य कायमचं बदललं. मी बॉलीवुडमध्ये पाय ठेवला आणि यामुळे अपार लोकप्रियतेचे दरवाजे माझ्यासाठी खुले झाले. लोकांचं माझ्याकडे लक्ष वेधलं गेलं. उत्तुंग यशाचं उदाहरण म्हणून माझ्याकडे बघितलं जाऊ लागलं आणि मला तरुणांसाठी रोल मॉडल म्हणण्यात आलं.
मात्र, मला हे कधीच करायचं नव्हतं आणि असं बनायचंही नव्हतं. विशेषतः यश आणि अपयशाच्या माझ्या संकल्पना या नव्हत्याच आणि याबाबत विचार करायला मी नुकतीच सुरुवात केली होती.
आज मी बॉलीवुडमध्ये पाच वर्षं पूर्ण केली आहेत. यानिमित्ताने मला कबूल करायचं आहे की या ओळखीवर म्हणजे माझ्या कामावर मी खूश नाही. मला वाटतंय की मी काहीतरी वेगळं करण्यासाठी संघर्ष केला होता.
आता मी त्या गोष्टी शोधायला आणि समजून घ्यायला सुरुवात केली आहे ज्या गोष्टींसाठी मी माझा वेळ, प्रयत्न आणि भावना समर्पित केल्या आहेत. या नव्या लाईफस्टाईलला जाणून घेतल्यानंतर मला जाणवलं की मी इथे फिट बसत असले तरी मी इथल्यासाठी बनलेले नाही.
या क्षेत्राने मला खूप प्रेम, सहकार्य आणि कौतुक दिलं आहे. मात्र, याच क्षेत्रामुळे माझी वाट चुकली. मी अनावधानाने माझ्या श्रद्धेपासून दूर गेले.
मी अशा वातावरणात काम करणं सुरू ठेवलं जिथं सातत्याने माझ्या आस्थेत ढवळाढवळ झाली. माझ्या धर्माशी असलेलं माझं नातं धोक्यात आलं. मी डोळेझाक करत पुढे जात राहिले आणि स्वतःला विश्वास देत राहिले की मी जे करतेय ते योग्य आहे आणि त्याचा माझ्यावर परिणाम होत नाहीय. मी माझ्या आयुष्यातली सगळी 'बरकत' गमावली.
'बरकत' असा शब्द आहे ज्याचा अर्थ केवळ आनंद किंवा आशीर्वाद एवढाच मर्यादित नाही. तर तो स्थिरतेच्या विचारावरही केंद्रित आहे आणि मी याबाबत संघर्ष करत आले आहे.
माझा सतत संघर्ष सुरू होता की माझ्या आत्म्याने माझे विचार आणि स्वाभाविक आकलन बुद्धीशी मेळ बसवावा आणि मी स्वतःच्या श्रद्धेचं स्थिर चित्र तयार करावं. मात्र, माझा त्यात दारुण पराभव झाला. एकदा नाही शेकडो वेळा.
स्वतःच्या निर्णयाला मजबूत करण्यासाठी मी जेवढे प्रयत्न केले ते केल्यानंतरही मी तिच होते जी मी आहे आणि कायम स्वतःला सांगत राहिले की लवकरच मी स्वतःला बदलेन.
मी सातत्याने टाळत राहिले आणि स्वतःच्या आत्म्याला या विचारात फसवून त्याचा छळ करत राहिले की मला माहितीय की जे मी करतेय ते योग्य नाही.
मात्र, एक दिवस जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी हे सर्व थांबवेल. असं करून मी सतत स्वतःला कमजोर ठेवलं जिथे माझी शांती, माझी श्रद्धा आणि अल्लाहसोबत माझ्या नात्याला हानी पोहोचवणाऱ्या वातावरणाचा बळी ठरणं अवघड नव्हतं.
मी गोष्टी बघत होते आणि स्वतःच्या विचारांना तशीच बदलत राहिले जसं मला हवं होतं. मी याचा विचारच केला नाही की मूळ मुद्दा हा आहे की त्या गोष्टीकडे तसंच बघितलं पाहिजे, जशा त्या आहेत.
मी पळून जाण्याचा प्रयत्न करायचे आणि शेवटी बंद रस्त्यापर्यंत पोचायचे. या अंतहीन मार्गावर असं काही होतं जे मी गमावत होते आणि ज्यामुळे मला सतत वेदना होत होत्या. जे मला कळत नव्हतं आणि मला समाधानही मिळत नव्हतं.
हे तोवर सुरू होतं जोवर मी माझ्या मनाला अल्लाहच्या शब्दांशी जोडून स्वतःच्या दोषांचा सामना करण्याचा आणि स्वतःच्या अज्ञानाला सुधारण्याचा निर्णय घेतला नाही.
कुराणच्या महान आणि अलौकिक ज्ञानात मला शांती आणि समाधान मिळालं. मनाला खऱ्या अर्थाने समाधान तेव्हाच लाभतं जेव्हा मनुष्य आपल्या ईश्वराविषयी, त्याचे गुण, त्याची दया आणि त्याच्या आदेशांविषयी जाणून घेतो.
मी स्वतःच्या आस्तिकतेला महत्त्व देण्याऐवजी स्वतःची मदत आणि मार्गदर्शनासाठी अल्लाच्या दयेवर अधिक विश्वास ठेवायला सुरुवात केली.
मला जाणवलं की माझ्या धर्माच्या मूळ सिद्धांतांचं मला असलेलं कमी ज्ञान आणि पूर्वी बदल घडवण्याची माझी असमर्थता खरंतर मनःशांती आणि आनंदाऐवजी आपल्या (ऐहिक आणि पोकळ) इच्छा वाढवणं आणि त्यांचं समाधान करण्याचा परिणाम होती.
माझं मन शंका घेणं आणि चूक करण्याच्या ज्या आजाराने ग्रासलं होतं ते मी ओळखलं होतं. आपल्या मनावर दोन आजार आक्रमण करतात. 'शंका आणि चुका' आणि दुसरा 'वासना आणि इच्छा'. या दोघांचा कुराणात उल्लेख आहे.
अल्लाह म्हणतो, "त्यांच्या मनात एक आजार आहे (शंका आणि ढोंग याचा) जो मी आणखी वाढवला आहे." मला जाणवलं की केवळ अल्लाहला शरण गेल्यानेच यावर उपचार होऊ शकतो आणि खरंतर जेव्हा मी माझ्या मार्गावरून भरकटले होते त्यावेळी अल्लाहनेच मला वाट दाखवली.
कुराण आणि पैगंबर यांचं मार्गदर्शन यामुळे मी निर्णय घेऊ शकले आणि याने आयुष्याविषयीचा माझा दृष्टिकोन आणि आयुष्याचा अर्थ बदलून टाकला.
आपल्या इच्छा आपल्या नैतिकतेचं प्रतिबिंब आहेत. आपली मूल्यं आपल्या अंतर्गत पवित्रतेचं बाह्य रूप आहे. त्याचप्रमाणे कुराण आणि सुन्नत यांच्याशी आपलं नातं, अल्ला आणि धर्मासोबत आपलं नातं आणि आपल्या इच्छा, उद्देश आणि आयुष्याचा अर्थ सांगतो.
मी यशाविषयीचे माझे विचार, माझ्या आयुष्याचा अर्थ आणि उद्देशांच्या गहन स्रोतांविषयी सावधगिरीने प्रश्न उपस्थित केले. माझ्या विचारांना प्रभावित करणारा सोर्स कोड वेगळ्या परिमाणांमध्ये विकसित झाला होता.
यशाचा आपल्या पक्षपाती, भ्रमित, पारंपरिक आणि पोकळ जीवन मूल्यांशी संबंध नाही. आपल्याला का बनवण्यात आलं याचा उद्देश जाणून घेणंच यश आहे. आपण आपल्या आत्म्याला दगा देऊन चुकलेल्या वाटेवर मार्गक्रमण करत असतो आणि हे विसरून जातो की आपला जन्म कशासाठी झाला आहे.
हा प्रवास खूप थकवणारा होता. बऱ्याच काळापासून मी माझ्या आत्म्याशी लढत होते. आयुष्य खूप छोटं आहे. मात्र, स्वतःशीच लढताना ते खूप मोठं असतं. त्यामुळे मी आज या निर्णयावर पोचले आणि मी अधिकृतपणे या क्षेत्रापासून वेगळं होत असल्याचं जाहीर करते.
प्रवासाचं यश तुमच्या पहिल्या पावलावर अवलंबून असतं. सार्वजनिकरित्या हे करण्याचं कारण स्वतःची पवित्र प्रतिमा निर्माण करणं, हे नाही. मला एक नवी सुरुवात करायची आहे आणि त्यासाठी मी कमीत कमी एवढं तर नक्की करू शकते. स्वतःच्या इच्छांना शरण जाऊ नका. कारण इच्छा अनंत आहेत. तुम्ही जे काही मिळवलं आहे, कायम त्यातून बाहेर पडा.