कोरोना व्हायरस: विषाणूंवरचे हे 3 सिनेमे आता आलेत चर्चेत

बुधवार, 15 एप्रिल 2020 (15:32 IST)
जान्हवी मुळे
कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जगभरातली शहरंच नाही तर देशच्या देश एकामागोमाग एक लॉकडाऊन होत आहेत. याचदरम्यान काही चित्रपट लोकप्रिय झाले आहेत, घरी बसल्या बसल्या, लोक ते पाहात आहेत.
 
आता तुम्ही म्हणाल, की इथे जगण्या-मरण्याची खात्री नाही, आणि आपण चित्रपटांविषयी का बोलतो आहोत? तर या अशा फिल्म्स आहेत, ज्या विषाणू आणि माणसामधल्या लढाईची कहाणी सांगतात.
 
खरंतर या विषयावर बरेचसे चित्रपट आले आहेत. विशेषतः हॉलिवूडमध्ये. पण त्यातल्या तीन चित्रपटांविषयी मी तुम्हाला सांगणार आहे, आणि हो यातली एक फिल्म भारतीय आहे. मी तीन चित्रपट निवडले आहेत, कारण या फिल्म्समध्ये वास्तववादी चित्रण आहे आणि जगात सध्या जे सुरू आहे, ते समजून घेण्यासाठी तुम्हाला मदत करू शकतील..
1.कॉन्टॅजियन
2011 सालचा हा चित्रपट गेले तीन महिने चर्चेत आहे. जगभरातल्या लाखो लोकांनी तो वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्सवर ऑनलाईन पाहिला आहे.
 
ही कहाणी सुरू होते बेथ एमहॉफपासून (ग्वेनेथ पॅल्ट्रॉ). ती हाँगकाँगवरून अमेरिकेच्या मिनियापोलिसमध्ये आपल्या घरी परतताना शिकागो एअरपोर्टवर आहे आणि खोकते आहे. काही काळातच तिचा आजार वाढत जातो, आणि दरम्यान टोक्यो, लंडन आणि हाँगकाँगमध्येही तिच्यासारखीच आजाराची लक्षणं असलेल्या लोकांचा मृत्यू होतो. आणि हळूहळू जगभरात साथ पसरू लागते. हा एक नवा विषाणू असल्याचं कसं सिद्ध होतं आणि त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी जगभरताल्या डॉक्टर्स, संशोधक, प्रशासनाची, जागतिक आरोग्य संघटनेची कशी धावपळ होते, सर्वसामान्यांचं आयुष्य त्यामुळे कसं ठप्प होतं, हे सगळं हा चित्रपट दाखवतो.
 
त्याचबरोबर साथीच्या रोगांचे तज्ज्ञ कसं काम करतात, ते कसा रोगाच्या मूळापाशी जाऊन शोध घेतात, लस कशी बनवतात, अशा गोष्टींचं चित्रणही या कहाणीत आहे.
 
विशेष म्हणजे ही कहाणी कोरोनाविषाणूसारख्याच काल्पनिक एमईव्ही वन या विषाणूभोवती फिरते. गेल्या दशकात आलेल्या सार्स आणि स्वाईन फ्लूच्या साथींवर ही कथा आधारीत आहे केट विन्स्लेट, ग्वेनेथ पॅल्ट्रॉ, मॅड डेमन, लॉरेन्स फिशबर्न, ज्यूड लॉ आणि मारियन कोटिलार्ड अशी तगडी स्टारकास्ट या फिल्ममध्ये आहे.
 
दिग्दर्शक स्टीव्ह सॉडरबर्गनं ही कहाणी बांधनाता वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्लाही घेतला होता., त्यामुळं काही छोट्या त्रुटी वगळता हा चित्रपट विज्ञानाच्या आणि वास्तव जगाच्या जवळ जाणारी आहे, अशी पोचपावती, अनेक संशोधकांनी दिली आहे. नेटफ्लिक्सवर हा चित्रपट पुन्हा रिलीज झाला आहे आणि यूट्यूबवरही तुम्ही तो पैसे देऊन पाहू शकता.
 
2011 साली मी हा चित्रपट पाहिला होता आणि त्यावर कॅरोलाईन पार्किन्सन यांचा बीबीसीसाठीचा लेखही वाचला होता. त्यांनी प्रश्न विचारला होता, असं खरंच होईल का? नऊच वर्षांत त्याचं उत्तर मिळालं आहे, असं अनेकांना वाटतं.
2. 93 डेज
93 डेज ही 2016 सालची नायजेरियन फिल्म आहे आणि ती इबोला विषाणूभोवती फिरते. काहीशी भावनाप्रधान असलेली ही कहाणी, वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांसाठी एक मानवंदना आहे.
 
2014 साली पश्चिम आफ्रिकेतील देशांमध्ये इबोलाची साथ पसरली. तेव्हा नायजेरियातील डॉक्टर्सच्या एका टीमनं ती त्यांच्या देशात पसरण्यापासून कशी रोखली, याची ही सत्यघटनेवर आधारीत कहाणी आहे.
 
लायबेरियाहून एक राजनैतिक अधिकारी, पॅट्रिक स्वायर, एका बैठकीसाठी विमानानं नायजेरियाच्या लागोस शहरात आला आणि ताप असल्यानं लगेच रुग्णालयात दाखल झाला. त्याची लक्षणं नेहमीपेक्षा वेगळी असल्याचं डॉ. अमेयो अदादेहो यांनी ओळखलं, आणि राजकीय दबाव असतानाही त्या अधिकाऱ्याला डिस्चार्ज दिला नाही. त्याला इबोला झाल्याचं टेस्टनंतर समजलं पण दरम्यान हॉस्पिटलमधल्या कर्मचाऱ्यांना त्याची लागण झाली होती. तेव्हा स्वतःचं आयुष्य पणाला लावून, आयसोलेशनिमध्ये राहून त्यांनी ही साथ पुढे पसरणार नाही, याची काळजी घेतली. तेही फारशा चांगल्या सुविधा उपलब्ध नसताना.
 
नायजेरियात त्याआधी कधीच कुणाला इबोलाची लागण झाली नव्हती. तरीही डॉ. अमेयो अदादोवोह यांनी समोरचा धोका वेळीच ओळखला. त्यामुळं गजबजलेलं लागोस शहर आणि पर्यायानं बाकीचं सगळं जग इबोलाच्या उद्रेकापासून वाचलं. नायजेरियन अभिनेत्री बिम्बो एटिकिनोलानं अदादोवोह यांची भूमिका बजावली आहे.
 
माणूस कठीण परिस्थितीत काय करू शकतो, हे दाखवणाऱ्या या चित्रपटाचं जाणकारांनी कौतुक केलं आहे. असाच एक चित्रपट भारतात काही महिन्यांपूर्वीच प्रदर्शित झाला होता.
3. व्हायरस
मल्याळम भाषेतला हा चित्रपटत केरळच्या कोळीकोडम आणि मल्लपुरममध्ये सापडलेल्या निपा व्हायरसवर आधारीत आहे. ही काल्पनिक कथा असली, तरी त्याला सत्यघटनांचा आधार आहे. विषाणूमागचं विज्ञान, डॉक्टर्स आणि नर्सेसचं योगदान, याचबरोबर रोगाचं मूळ शोधून काढणाऱ्या संशोधकांचं काम, नेतेमंडळींचं राजकारण हे सगळं या कहाणीमध्ये गुंफलं आहे.
 
वटवाघुळांमधून आलेला निपा व्हायरस अतिशय डेडली म्हणजे घातक मानला जातो. कारण त्याची लागण झालेल्या लोकांमध्ये मृत्यूचं प्रमाण 80-90 टक्के असतं. तो 21 दिवस शरीरात राहतो. अशा विषाणूला 2018 साली केरळमध्ये कसं रोखलं गेलं, ते या चित्रपटातून मांडलं आहे. एखाद्या डॉक्यमेंट्रीसारखी आणि रहस्यकथेसारखी ही कहाणी पुढे सरकते आणि नेमका हा विषाणू कुठून आला, ते सांगते.
 
या तीन फिल्म्सशिवाय 1995 साली आलेली आऊटब्रेक ही फिल्म आणि नेटफ्लिक्सची 'पँडेमिक - हाऊ टू प्रीव्हेंट आऊटब्रेक' अशा सीरीजहही विषाणूची कहाणी सांगतात. त्याशिवाय अँड्रोमेडा स्ट्रेन, आय एम लीजंड अशा काल्पनिक फिल्मसही सध्या चर्चेत आहेत. या बहुतेक चित्रपटांची कहाणी वेगळी असली, तरी माणसानं कसा विजय मिळवला यावरच त्या चित्रपटांची अखेर होते आणि नवी सुरुवात शक्य असल्याचा आशावाद जिंवत राहतो..

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती