कोरोना व्हायरस: फैलाव वाढल्यास आरोग्य यंत्रणा सज्ज आहे का?
सोमवार, 23 मार्च 2020 (14:18 IST)
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तर त्याला नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज आहे का?
कोरोनाव्हायरसच्या भीतीमुळे संपूर्ण देश अनिश्चित कालासाठी लॉकडाऊनच्या दिशेने चालला असतांना प्रश्न सर्वांसमोर हा आहे की या विषाणूचा संसर्ग तिस-या टप्प्यात जाईल का? तो समाजाच्या सर्व थरांमध्ये संक्रमित होईल का? जे चीनमध्ये झालं, इटलीत झालं, स्पेनमध्ये झालं ते भारतात होईल का? प्रश्न हेही विचारले जाताहेत की आता टेस्ट झाल्यानंतरचे आकडे भारतात अद्याप कमी असले तरीही हा तिसरा टप्पा याअगोदरच सुरु झाला आहे का?
या प्रश्नांची नेमकी उत्तरं जरी केंद्र वा राज्य सरकार आता देऊ शकत नसलं तरीही एका प्रश्नाचं उत्तर द्यायलाच हवं की जर तिस-या टप्प्यात जर स्थिती गेली तर त्यासाठी यंत्रणा सज्ज आहे का? विशेषत: हॉस्पिटल्स, आयसोलेशन वॉर्ड्स, वैद्यकीय उपकरणं, डॉक्टर्स आणि त्यांचे सहाय्यक या सर्व व्यवस्था, काही शेकडा लोकांसाठी नव्हे तर काही हजार आणि गरज पडल्यास काही लाख रुग्णांसाठी तयार आहे का? भारताची लोकसंख्या, अतिप्रचंड भूभाग, अनेक शहरांमधली लोकसंख्येची घनता आणि त्याच्या प्रमाणात वैद्यकीय सुविधांचा असलेला अभाव हा सामान्य काळातही चिंतेचा विषय आहे. अशा असामान्य आणि आणीबाणीच्या काळात विशेषत: मुंबई, पुणे या शहरांसोबत महाराष्ट्राची तयारी कशी आहे? सर्वात प्रतिकूल स्थितीला आपण तयार आहोत का?
'सेंटर फॉर डिसिज डायनामिक्स, इकॉनॉमिक्स एंड पॉलिसी' चे संचालक डॉ रमणन लक्ष्मीनारायण यांनी 'बीबीसी'शी बोलतांना असं म्हटलं होतं की भारतामध्ये या विषाणूचा संसर्ग होण्यासाठी दोन ते तीन आठवडे उशीर झाला असला तरी भारतासमोर मोठा धोका आहे.भारताच्या बहुतांश लोकसंख्येपर्यंत हा विषाणू तिसऱ्या टप्प्यामध्ये पोहोचू शकतो आणि त्याच्या परिणामांसाठी भारतानं तयार रहायला हवं. "भारताकडे या संकटासाठी आवश्यक हॉस्पिटलची व्यवस्था नाही. देशभरात ७० हजार ते १ लाख आयसीयू बेड्स आहेत. हीच माझ्यासाठी चिंतेची बाब आहे. आपल्याकडे वेळ कमी आहे आणि जे चीन करू शकलं नाही ते आपल्याला करावं लागेल. तात्पुरती हॉस्पिटल्स उभारावी लागतील. त्यासाठी जी स्टेडियम्स आपल्याकडे आहेत ती ताब्यात घ्यावीत, तिथे बेड्स लावावेत. जेवढी व्हेंटिलेटर्स जमा करता येतील तेवढी करावीत. समोरून सुनामी येते आहे आणि आपण केवळ तिच्याकडे बघत उभे राहणार असू तर तुम्ही संपून जाल यात शंका नाही," डॉ लक्ष्मीनारायण त्यांचं मत व्यक्त करतांना म्हणाले.
ज्या तयारीची अपेक्षा तज्ञ करताहेत ती तयारी आपण करतो आहोत का? मुंबई आणि महाराष्ट्राबद्दल सध्याच्या स्थितीत मुंबईचं कस्तुरबा गांधी रुग्णालय आणि पुण्याचं नायडू रुग्णालय इथे सध्या आयसोलेशन वॉर्ड्स आहेत. त्यासोबतच मुंबईतले नायर रूग्णालय आणि अन्य एका रूग्णालयात क्वारंटाईन वॉर्ड्स केले गेले आहेत. तिथे रुग्णांवर उपचार होत आहेत. पण या दोन शहरांसोबत महाराष्ट्रातली स्थिती नियंत्रणाबाहेर गेली इतर रुग्णालयांची मोठ्या प्रमाणात आवश्यकता निर्माण होईल.
"आम्ही सगळी शासकीय रुग्णालयं कोरोनाचे जर पेशंट्स आले तर त्यांच्यासाठी तयार करतो आहोत. सगळी जिल्हा आणि ग्रामीण रुग्णालयं सुद्धा जिल्हाधिका-यांना ताब्यात घेऊन त्यांना कोणत्याही स्थितीसाठी तयार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि ते काम जवळपास पूर्ण झालं आहे. सोबतच परिस्थिती उद्भवली तर राज्य सरकार कायद्यानं खाजगी रुग्णालयं पण ताब्यात घेऊ शकतो," उपमुख्यमंत्री आणि अर्थमत्री अजित पवार 'बीबीसी मराठी'शी बोलतांना म्हणाले.
पण ही व्यवस्था पुरेशी आहे का? आकडा वाढत राहिला तर खाजगी रुग्णालयांची संख्याही आणि वैद्यकीय तज्ञांची संख्याही पुरेल का हाही प्रश्न आहे. वानगीदाखल, सरकारी आकड्यानुसार पुणे शहरातल्या खाजगी रुग्णालयांमध्ये सध्या एकूण ४९ आयसोलेशन बेड्स आणि आयसीयूची व्यवस्था केल्याचं समजतं आहे. जर आपण युरोप वा चीनमधले आकडे पाहिले तर ही व्यवस्था पुरेशी आहे का? पण सरकारचं म्हणणं आहे की ते तयारी करताहेत.
"आम्ही परदेशातून आवश्यक वैद्यकीय उपकरणं मागवली आहेत. भारतातल्या उत्पादकांना त्यांची मोठ्या प्रमाणावर निर्मिती करण्यास सांगितलं आहे. आम्ही सगळ्या परिस्थितीसाठी तयार आहोत,"अजित पवार म्हणाले.
राज्य सरकार खाजगी आणि सरकारी रुग्णालयांसोबतच इतर व्यवस्था आयसोलेशन बेड्स तयार करण्यासाठी करतं आहे. सरकारी सूत्रांनुसार मुंबईसह इतर शहरांतले सरकारी संस्थांचे फ्लॅट्स, खाजगी हॉटेल्स इथे सुद्धा आणीबाणीच्या स्थिती व्यवस्था उभी करण्याची तयारी सुरु आहे. महानगरपालिकांना तसे आदेश दिले आहेत. पण मैदानं, स्टेडियम्स, पार्किंग स्पेसेस इथं तात्पुरती हॉस्पिटल्स उभारण्याची तयारी अद्याप सरकार करत नाही आहे.
"सध्या तरी स्टेडियम्स किंवा मोकळी मैदानं ताब्यात घेऊन तिथे हॉस्पिटल्स उभारण्याचा विचार सरकार करत नाही आहे. जर उघड्या जागेत पेशंट्सना ठेवलं तर काय परिणाम होतील हे नेमकं माहीत नाही आहे," असं अजित पवार म्हणाले.
लोकसंख्या आणि वैद्यकीय व्यवस्थेचं व्यस्त प्रमाण ही महाराष्ट्र आणि भारतासमोरचं मुख्य आव्हान आहे. वेळेशीही स्पर्धा आहे. सरकारी व्यवस्थेच्या हालचाली युद्धपातळीवर होत आहेत. त्या पुरेशा आहेत किंवा नाहीत हे परीक्षा झाल्यावरच समजेल. तूर्तास घरी थांबण्याच्या आणि इतरांच्या संपर्कात न येण्याच्या नागरिकांच्या संयमावरच सरकारी व्यवस्थेचीही मदार आहे.