कोरोना: कळभोंडे गावाने दीड वर्ष कोरोनाला कसं ठेवलं दूर?

सोमवार, 7 जून 2021 (19:05 IST)
मयांक भागवत
पहिली लाट येऊन गेली. दुसरी लाट त्सुनामीसारखी पसरली. कोरोना संसर्ग शहरांची सीमा ओलांडून गावा-खेड्यात, ग्रामीण आदिवासी पाड्यापर्यंत पोहोचला. महाराष्ट्रात एकच हाहा:कार उडाला.
 
पण, ठाणे जिल्ह्यातील, 'कळभोंडे' गावाची वेस कोरोना व्हायरस तब्बल 430 दिवस ओलांडू शकलेला नाही. गावकऱ्यांची इच्छाशक्ती आणि कडक नियमांपुढे कोरोनाचं काहीच चाललं नाही.
 
22 मार्च 2020 ला देशात जनता कर्फ्यू घोषित झाला. तेव्हापासून, कळभोंडे गावात एकही कोरोना रुग्ण आढळून आला नाहीये.
 
हे कसं शक्य झालं? कोरोनासंसर्ग झपाट्याने पसरत असताना या गावाने काय केलं? कोरोना नसलेल्या गावाची गोष्ट.....आपण वाचणार आहोत...
कुठे आहे कळभोंडे गाव?
अहमदनगर जिल्ह्यातील कुलंग गडाच्या पायथ्याशी, डोंगररांगांच्या कुशीत वसलेलं कळभोंडे, मुंबईपासून शंभर ते सव्वाशे किलोमीटर दूर आहे. तिन्ही बाजूंनी डोंगर असल्याने, या गावात पोहोचण्यासाठी फक्त एकच मुख्य मार्ग आहे.
 
आदिवासी बहुल या गावात 200 च्या आसपास घरं असून, लोकसंख्या 1000 च्या घरात आहे.
या गावातील 98 टक्के लोक शेतमजुरी करतात. काही शेतीच्या कामासाठी नाशिक आणि नगरला जातात. भात या गावातील लोकांचं प्रमुख पीक. पण, लॉकडाऊनमध्ये हातचं काम गेलं आणि गावाबाहेर कामासाठी गेलेले युवक घराकडे परत येऊ लागले.
 
गावाबाहेरून येणाऱ्यांना वेशीवर थांबवलं
ग्रामसेवक प्रशांत मार्के सांगतात, "गावकऱ्यांमध्ये या आजाराची भीती होती. त्यामुळे गावकऱ्यांनी बाहेरून येणाऱ्यांना गावच्या वेशीवरच थांबवण्याचा निर्णय घेतला."
 
गावात परतणाऱ्यांसाठी जणू गावाने गावबंदी केली होती. पण, हा निर्णय सोपा नव्हता. उपसरपंच, बारकू मंगावीर म्हणतात, "सर्व गावकरी एकत्र आले. महिलांना याचं महत्त्व समजावून सांगण्यात आलं. आम्हाला गावात रहाणाऱ्या लोकांच्या आरोग्याची काळजी होती."
 
अत्यावश्यक असल्याशिवाय लोकांना गावात घ्यायचं नाही, असं ठरवण्यात आलं. पण, मग गावात परतणाऱ्यांच काय? त्यांना कुठे ठेवायचं? यावर गावकऱ्यांनी एक शक्कल लढवली.
 
वेशीवर बांधल्या झोपड्या
ऐव्हाना, हातचं काम सुटलेले युवक गावी परतण्याची चाहूल गावकऱ्यांना लागली. काहींना गावकऱ्यांनी फोन करून आता गावात येऊ नका, असंही सांगतिलं.
 
पण, गावात परतणाऱ्यांचा प्रश्न अजूनही सुटलेला नव्हता. गावाबाहेर थांबवायचं पण कुठे? दुर्गम आदिवासी भाग असल्याने गावात क्वॉरेन्टाईन सेंटर किंवा विलगीकरण कक्ष असणं शक्यच नव्हतं.
उपसरपंच बारकू मंगवीर म्हणतात, "बाहेरून आलेल्यांमुळे गावात संसर्ग वाढू नये या हेतूने, गावाच्या वेशीवर, गावापासून दूर, नदी-नाल्याच्या काठावर झोपड्या बांधण्यात आल्या. या झोपडीत बाहेरून आलेल्या प्रत्येकाला 14 दिवस ठेवण्यात आलं."
 
गावातील लोकांना क्वॉरेन्टाई हा शब्द फारसा कळत नसावा. पण, बाहेरून आलेल्यांना वेगळं ठेवा या सूचना त्यांना एका झटक्यात समजल्या. "ज्यांना लक्षणं नव्हती त्यांना 14 दिवसानंतर गावात घेण्यात आलं," बारकू मंगवीर पुढे म्हणतात.
 
"मी 14 दिवस झोपडीत राहीलो"
गावकऱ्यांनी गावाच्या वेशीवर, गावापासून एक-दोन किलोमीटर लांब चार ते पाच ठिकाणी, बाहेरून आलेल्या लोकांना रहाण्यासाठी झोपड्या बांधल्या.
 
शेतमजूरीचं काम करणाऱ्या प्रकाश भगत यांनाही गावात परतल्यानंतर 14 दिवस झोपडीत काढावे लागले. ते म्हणतात, "सर्व गावकऱ्यांनी नियम केला होता. बाहेरगावी असलेल्यांनी 14 दिवस गावाबाहेर झोपडीत रहायचं. मी देखील 14 दिवस राहिलो."
 
"गावाने घेतलेला निर्णय गावकऱ्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाचा होता. 14 दिवस बाहेर राहिल्यानंतर काहीच लक्षणं दिसली नाहीत. त्यामुळे गावात येण्याची परवानगी मिळाली."
 
"गावाबाहेर रहावं लागलं याचा राग नाही. लोकांना हा आजार माहिती नव्हता. आपल्यापासून दुसऱ्यांना संसर्ग होऊ नये, या काळजीपोटी बाहेरून आलेल्यांना थोडे दिवस गावाबाहेर ठेवण्यात आलं."
कशी आहे क्वॉरेन्टाईन झोपडी?
गावाच्या वेशीवरील ही झोपडी गावकऱ्यांचं क्वॉरेन्टाईन सेंटर आहे. याचं बांधकाम विटा किंवा सिमेंटचं नाही.
 
ही क्वॉरेन्टाईन झोपडी लाकडं आणि रानात मिळणाऱ्या गवतापासून बनवण्यात आलीये. रात्री झोपता यावं म्हणून जमीन शेणाने सारवण्यात आली आहे. तर, बाहेरूनही शेणाने झोपडी सारवलेली पहायला मिळाली.
 
प्रकाश पुढे सांगतात, "बाहेरून आलेले चार-पाच लोक एकत्र होतो. रानभाज्या आणि कंदमुळं खाल्ली." 'ही झोपडी झाडाच्या सावलीला आणि पाण्याजवळ बांधण्यात आलीये. जेणेकरून लोकांना त्रास होणार नाही," असं बारकू मंगवीर म्हणतात.
गावात शेतीची कामं सुरू झाली आहेत. पेरणीच्या कामाची लगबग दिसत होती. हातात फावडं, आर घेऊन महिला आणि पुरुष शेतात राबत होते.
 
उपसरपंच बारकू मंगवीर सांगतात, "मजुरीसाठी लोक बाहेर गेले तर अजूनही काळजी घेतो. शेतात काम संपल्यानंतर त्यांना थेट गावात आणून सोडा असं मालकाला सांगतो. जेणेकरून लोकांच्या संपर्कात ते जास्त येणार नाहीत."
 
शेतीची कामं सुरू असल्यामुळे 100 टक्के लोक सद्यस्थितीत गावातच आहेत. त्यामुळे या क्वॉरेन्टाईन झोपडीचा वापर शेतात राबून झाल्यानंतर काही वेळ आराम करण्यासाठी करण्यात येतोय. ,
 
"गावकऱ्यांना मलाही गावात येऊ दिलं नाही"
कोरोना संसर्गाच्या पहिल्यात लाटेत संक्रमण होण्याच्या भीतीने कळभोंडेच्या गावकऱ्यांनी गावात येणारा एकमेव मुख्य रस्ता बंद केला. बारकू मंगवीर म्हणतात, "बाहेरून येणाऱ्या गाड्या पूर्ण बंद केल्या. रस्त्यावर लाकडं टाकून रस्ता बंद केला होता."
 
याचा फटका ग्रामसेवक प्रशांक मार्के यांनादेखील बसला. ते सांगतात, मलाही गावाच्या रस्त्यावरून परत जावं लागलं होतं. "सरपंच म्हणाले, तुम्ही बाहेरून येत असल्याने गावातील लोकांच्या मनात भीती आहे. आजार पसरण्याची भीती लोकांमध्ये आहे. तुम्ही गावात येऊ नका."
 
त्यानंतर गावातील लोकांची समजूत काढण्यात आली. "गावबंदीकरून चालणार नाही. गावातून बाहेर येणाऱ्यांवर निर्बंध घातले. त्यांच्यावर लक्ष ठेवलं तर गावात संसर्ग पसरणार नाही."
"चटणी-भाकर खाऊ, पण, बाहेर जाऊ नका"
देवकी गिरा कळभोंडे गावच्या सरपंच आहेत. गावातील प्रत्येकाना नियमांचं पालन करावं यासाठी त्यांनी सर्व महिलांना विश्वासात घेतलं होतं.
 
"मी लोकांना सांगितलं कुठे जाऊ नका. अत्यावश्यक कामांशिवाय गावाबाहेर जाऊ नका. बाजारात भाजी न घेता रानातून मिळणाऱ्या भाज्या खाऊ. काही मिळालं नाही तर चटणी-भाकर खाऊ."
 
तर, बाजारात अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी घेण्यासाठी फक्त एक-दोन लोकांनी जायचं असा गावचा नियम आहे. सकाळी 9 ते 11 फक्त दोन तास, अत्यावश्यक गोष्टींसाठी गावातून बाहेर जाण्याची परवानगी आहे, असं बारकू मंगवीर म्हणतात.
दवंडी पिटवून जनजागृती
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत शहरी आणि ग्रामीम भागाला कोरोनाचा फटका बसूनही कळभोंडे गावात एकही रुग्ण आढळून आलेला नाही.
 
प्रशांत मार्के पुढे सांगतात, लोकांमध्ये जनजागृती करण्यात येते. घरोघरी जाऊन तपासणी होते. लोकांना सॅनिटाझर, मास्कचं महत्त्व समजावून देण्यात आलं.
 
प्रकाश भगत यांच्या सारख्यांना सॅनिटाझर म्हणजे काय, हे दवंडी पिटवल्यानंतर कळलं, असं ते सांगतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती