कोरोनाः एकनाथ खडसे यांना पुन्हा कोरोनाची लागण

शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (19:34 IST)
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलवर एकनाथ खडसे यांच्यावर उपचार सुरू आहेत.
 
एकनाथ खडसे यांची काही वर्षांपूर्वी किडनी ट्रान्सप्लान्ट झाल्यानं त्यांची विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती बीबीसी मराठीला मिळाली आहे.
 
कोरोनाची लागण झाल्याची माहिती देताना खडसे यांनी म्हटलं, "माझी कोरोना चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली असून माझी तब्येत चांगली आहे. काळजीचे कारण नाही."
 
तसंच, "गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी मी विनंती करतो," असं आवाहनही खडसेंनी केलं आहे.
 
दुसरीकडे, एकनाथ खडसे यांच्या सून आणि रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षा खडसे यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.
 
रक्षा खडसे यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली. त्या म्हणाल्या, "रात्री अचानक प्रकृती बिघडल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोविड टेस्ट केली असता, माझा टेस्ट रिपोर्ट पोझिटिव्ह आला. तरी गेल्या आठ दिवसात माझ्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्यानीं स्वतःची कोविड चाचणी करुन घ्यावी. माझी प्रकृती स्थिर असून आपण सर्वांनी स्वत:च्या प्रकृतीची काळजी घ्यावी."
 
दरम्यान, याआधी 19 नोव्हेंबर 2020 रोजीही एकनाथ खडसे यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे आता खडसेंना दुसऱ्यांना कोरोनानं गाठलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती