लिंगबदल करून पुरुष बनलेल्या भारतातील डॉक्टरची गोष्ट

शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021 (19:12 IST)
भार्गव परिख
बीबीसी गुजराती
"या समाजात कुणाकडे प्रेम आणि सहानुभूतीचे दोन शब्द मागाल, तर तुम्हाला द्वेषच मिळेल. त्यामुळे मी महिला असूनही पुरुष बनण्याचा निर्णय घेतला. आता मी पुरुष बनले आहे. पण आता मला कुणीच स्वीकरत नाहीय."
 
भावेश भाई (नाव बदललं आहे) यांचे हे शब्द आहेत. एका सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर म्हणून कार्यरत असलेले हे भावेश भाई आधी महिला होते. आता पुरुष बनल्यानंतरही त्यांची सामाजिक लढाई संपली नाहीय.
 
भावेश भाई यांच्या म्हणण्यानुसार, लोक आता पुरुषाऐवजी तृतीयपंथी म्हणून स्वीकारत आहेत. या स्थितीत पुरुष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी भावेश भाई यांनी कोर्टाचे दार ठोठावले आहेत.
 
त्यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं की, "कोरोनानंतर स्थितीत सुधारणा दिसतेय. आता सरकारी नोकरी सोडून अभ्यासासाठी परदेशात शिकण्यासाठी जाणार आहे."
 
'लहानपणी माहिती नव्हतं'
भावेश भाई यांचा जन्म गुजरातमधील खेडा जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावात झाला. तीन भावांच्या या कुटुंबात एकूण नऊ मुलं होती. त्यात पाच मुलं आणि चार मुली होत्या. लहानपणापासूनच भावेश भाईंना मुलांसोबतची मैत्री अधिक जवळची वाटत असे. मात्र, त्यांना हे माहित नव्हतं की, त्यांचं शरीर मुलीचं आहे आणि मानसिक स्तरावर मुलांसारखा व्यवहार ते करतायेत.
 
भावेश भाई सांगतात, "छोट्याशा गावातल्या शाळेत मी शिकत होतो. दहावीपर्यंत तर मला माहितही नव्हतं की, मी मुलगा आहे की मुलगी आहे. माझे केस खूप मोठे होते. मात्र, मला लिंगाबाबत तेवढी समज नव्हती. मात्र, बदलत्या वेळेनुसार यात फरक पडत गेला."
 
"मुली आवडत असत. मात्र, त्यांच्यासोबत फिरणं किंवा फॅशनबाबत चर्चा करण्यात अजिबात रस नव्हता. माझं राहणीमान मुलींसारखं नव्हतं. त्यामुळे लोक माझ्यावर नाराज होत. माझी चुलत भावंडं आणि काका मला सांगू लागले होते की, मुलींसारखं राहायला शिक. मात्र, माझ्या डोक्यात फार गुंता होता की, हे सर्व ठीक नाहीय," असं भावेश भाई सांगतात.
 
ते पुढे सांगतात, "नेमकं काय चाललंय, हे मला तेव्हा नीट कळत नव्हतं. लोक माझ्यावर नाराज असत, माझ्यापासून अंतर राखून राहत. मीही सर्वकाही सोडून अभ्यासात मग्न होत गेलो आणि पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण होत गेलो. त्यानंतर मी कुटुंबाच्या इच्छेनुसार मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला."
 
'प्रवेशानंतर अडचणी आणखी वाढल्या'
मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशानंतर भावेश भाई यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या.
 
ते सांगतात, "तिथेच माझ्यासमोरील अडचणी सुरू झाल्या. सर्व कागदपत्रांमध्ये माझं लिंग स्त्री असंच लिहिलं गेलं होतं. सरकारी कॉलेजच्या नियमांनुसार, मला मुलींच्या हॉस्टेलमध्ये राहावं लागणार होतं. मी वैद्यकीय शिक्षण घेत असल्यानं मला माहित होतं की, माझ्या शरीरात कशा पद्धतीने बदल होत आहेत."
 
"हॉस्टेलमध्ये मला प्रचंड एकटेपणा जाणवू लागला. मी हार्मोन ट्रिटमेंट घेण्यास सुरुवात केली. माझ्या शरीरात हळूहळू बदल दिसू लागले. हॉस्टेलमध्ये राहणं मला कठीण होऊ लागलं होतं. हळूहळू मला दाढी आणि मिशा सुद्धा येऊ लागल्या होत्या. त्यानंतर मी मुलींच्या हॉस्टेलमध्ये राहण्यास विरोध केला. त्यामुळे मुलीही माझ्यापासून दूर होऊ लागल्या आणि माझा स्वीकार करणं बंद करू लागल्या," असं भावेश भाई सांगतात.
 
याच दरम्यान भावेश भाई यांनी दिल्लीतील एका सामाजिक संस्थेशी संपर्क केला आणि त्यानंतर त्यांना मुलांच्या हॉस्टेलमध्ये राहण्यास परवानगी देण्यात आली.
 
ते पुढे सांगतात, "मध्यमवर्गीय कुटुंबातून असल्यानं माझी आर्थिक स्थितीही तितकीशी चांगली नव्हती. मात्र, मला हे जाणवू लागलं होतं की, माझं शरीर मुलीचं आहे, पपण आत्मा पुरुषी आहे. मला पुरुषाचं शरीर आवश्यक आहे. कॉलेजमध्येच शिकणारी एक मुलगी मला समजून घेऊ लागली होती. तिने मला सांगितलं की, मुलींसारखं कपडे घातल्याने काहीच फरक पडत नाही. तिने माझी खूप मदत केली."
 
'लग्नामुळे काळजी'
भावेश भाई यांनी सांगतिलं की, "एक दिवस वडिलांसोबत मानसोपचारतज्ज्ञाकडे गेलो. वडील माझ्यावर खूप प्रेम करत असत. मात्र, त्यांना समाजाची भीती होतीच. माझ्या लग्नाबाबत ते अधिक काळजीत असत. पुरुष बनल्यानंतर माझ्याशी लग्न कोण करेल, याची चिंता त्यांना असे. म्हातारपणी माझी कोण सोबत देईल?"
 
"मी त्यांना हेच सांगत होतो की, माझ्या पतीचा मृत्यू माझ्याआधी होणार नाही, याची काय खात्री आहे? म्हातारपणी मुलं देखभाल करतील, याची काय खात्री? माझे वडील या तर्कांशी सहमत झाले."
 
भावेश भाई पुढे सांगतात, "माझ्या वडिलांना तेव्हा सांगितलं की, आमचा अभिमान वाढव. माझ्यासाठी हे खूप होतं. मी सर्जरी केली आणि मुलगा बनलो. जेव्हा माझी सर्जरी झाली तेव्हा नर्सने माझ्या चेहऱ्यावर काहीच भावना पाहिल्या नाहीत."
 
"नर्सने मला विचारलं की, लोक तर खूप उत्साहित, आनंदी होतात. मात्र, तुम्ही शांतच आहात. तेव्हा मी सांगितलं की, आता मला माझं खरं शरीर मिळालंय. आता मी शांतता अनुभवत आहे. मला जे हवं होत, ते मिळालं आहे. मी कुणा इतरांसाठी ही सर्जरी केली नाहीय. मी स्वत:वर प्रेम करतो, म्हणून मी हे केलंय."
 
न्यायासाठी हायकोर्टासमोर शरण
सर्जरीनंतर भावेश भाई यांची दुसरी लढाई सुरू झाली. ते पुढील शिक्षणासाठी परदेशात जाऊ इच्छित होते. त्यासाठी त्यांना जन्माचा दाखला, शाळा-महाविद्यालयाचे पदवी प्रमाणपत्र आणि पासपोर्टमध्ये बदल करणं आवश्यक बनलं. त्यात लिंग महिलेऐवजी पुरुष असा बदल आवश्यक होता.
 
मात्र, सरकारी कार्यालयात कुणी काहीच बदलायला तयार नव्हते. खूप प्रयत्नांनंतर भावेश भाई यांना ट्रान्सजेंडर प्रमाणपत्र मिळालं. त्यानंतर भावेश भाई यांनी गुजरात हायकोर्टाचे दार ठोठावले.
 
भावेश भाई यांचे वकील अमित चौधरी यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं की, "आम्ही राज्यघटनेच्या अनुच्छेद 226 आणि 227 च्या कलम 14,15 आणि 2012 नुसार हायकोर्टात अर्ज केला."
 
भावेश भाई यांनी लहानपणापासूनच जेंडर डायस्फोरिया होता. अशा प्रकरणात सरकारी हॉस्पिटलचं प्रमाणपत्र अत्यंत आवश्यक असतं.
 
अर्जात हेही म्हटलंय की, "भावेश भाई यांच्यावर कोणताही गुन्हा नाही. ते परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छित आहेत. त्यामुळे पासपोर्ट आणि शाळा-महाविद्यालयाच्या प्रमाणपत्रात लिंग स्त्रीऐवजी पुरुष असं बदलण्यास परवानगी द्यावी."
 
त्यानंतर न्या. ए. जे. देसाई यांनी तसे बदल करण्याचे आदेश दिले.
 
भावनगर विद्यापीठाचे व्हाईस चान्सेलर महिपत सिंह चावडा यांनी म्हटलं की, "जेव्हा आम्हाला भावेशच्या जेंडर डायस्फोरियाची माहिती मिळाली, तेव्हा आम्ही त्यांना मुलांच्या हॉस्टेलमध्ये प्रवेश दिला. आता आम्ही हायकोर्टाच्या आदेशानुसार इतर बदल करत आहोत."
 
मोठ्या लढाईनंतर विजय मिळाल्यानंतर भावेश भाई यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितले, "एक वेळ होती, जेव्हा मी आत्महत्या करण्याचा विचार करत होतो. मात्र, त्यानंतर मी लढाई देण्याचा निर्णय घेतला. हायकोर्टात जाण्याआधी मी परदेशात शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळवली. कोर्टाच्या आदेशानंतर थेट परदेशात जाऊ शकतो. मात्र, मी सरकारी ड्युटीवर आहे आणि रुग्णांची सेवा करतोय. कोरोना संपल्यानंतर मी परदेशात शिक्षणासाठी जाईन."
 
आता भावेश भाई स्वत:ला पूर्णपणे स्वतंत्र समजत आहेत. ते म्हणतात, आता मी सर्व सामाजिक बंधनांमधून मुक्त झालोय.
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती