महाविकास आघाडीचा 162 आमदारांसह सत्तास्थापनेचा दावा, सुप्रीम कोर्ट उद्या निर्णय देणार

सोमवार, 25 नोव्हेंबर 2019 (16:56 IST)
सुप्रीम कोर्टाने आज महाराष्ट्र सत्तासंघर्षावर सरकार आणि शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसची बाजू ऐकून अंतिम निर्णय राखीव ठेवला आहे.
 
सर्वोच्च न्यायालय उद्या मंगळवारी यावर अंतिम निर्णय देणार आहे.
 
दुसरीकडे, महाविकास आघाडीने 162 आमदारांच्या सह्या असलेले पत्र राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडे दिले आहे आणि सत्तास्थापनेचा दावा केला आहे.
 
शिवाय, शरद पवार हे आज माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिदिनानिमित्त सातारा जिल्ह्यातील कराड येथील प्रीतिसंगमावर आहेत.
 
(काही तांत्रिक अडचणीमुळे बातम्या अपडेट होण्यास जरा वेळ लागतोय. मात्र तुम्ही सर्व ताजे अपडेट्स आमच्या फेसबुक आणि ट्विटरवर पाहू शकता.)
 
पाहू या आज दिवसभरात काय काय होतंय ते-
 
सकाळी 11.05: कर्नाटकच्या उदाहरणाद्वारे यासंदर्भात निर्णय देऊ नये- तुषार मेहता
 
कर्नाटक आणि महाराष्ट्र या राज्यांमधली परिस्थिती वेगळी आहे. राज्यपालांनी सद्सदविवेक बुद्धीने निर्णय घेतला आहे. विरोधकांना आमदार फुटून जाण्याची भीती. म्हणून विश्वासदर्शक ठरावाची घाई करू नये असं तुषार मेहता आणि मुकुल रोहतगी यांनी सांगितलं.
 
सकाळी 11.00: कागदोपत्री राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा भाजपला
 
भाजपनेयाआधी अजित पवारांना सत्तास्थापनेसाठी साथ देण्याचं आवाहन केलं होतं परंतु पुरसे संख्याबळ नसल्याने त्यांनी पाठिंबा देणं नाकारलं होतं. राष्ट्रवादीच्या आमदारांचा आताचा निर्णय काय हे समजू शकत नाही. राज्यपालांच्या निर्णयाला आव्हान देता येत नाही. याप्रकरणी विस्तृत सुनावणीची आवश्यकता असं मुकुल रोहतगी यांनी केली. कागदोपत्री राष्ट्रवादीच्या 54 आमदारांचा पाठिंबा भाजपला.
 
सकाळी 10.45: मी अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता, मला 54 आमदारांचा पाठिंबा
 
अजित पवारांनी दिलेल्या पत्राचा अनुवाद न्यायालयाला करून देण्यात येत आहे. 'मी अजित पवार गटनेता आहे, मला 54 आमदारांचा पाठिंबा आहे. राष्ट्रपती शासन जास्त दिवस लागू राहायला नको', अशा आशयाचं पत्र अजित पवारांनी राज्यपालांन सादर केलं.
 
अजित पवारांचं पत्र आणि देवेंद्र फडणवीसांचं भाजपचं पत्र हे मिळाल्यानंतर राज्यपालांनी त्यांना सत्तास्थापनेसाठी आमंत्रित केलं. यानंतर राज्यपालांनी निर्णय घेण्यासाठी समिती नियुक्त करायला हवी होती का? असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता म्हणाले.
 
सकाळी 10.15 वाजता: बहुमत आहे मग चंबळच्या डाकूंसारखे का वागता-संजय राऊत
 
'गुडगावच्या हॉटेलात राष्ट्रवादीच्या आमदारांना डांबून ठेवण्यात आलं. चंबळच्या डाकूंसारखी गुंडागर्दी का? बहुमत होतं म्हणूनच शपथ घेतलीत. जनतेची, राज्यपालांची फसवणूक करण्यात आली', अशी टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
 
यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्रात अजित पवारांसारखं वागणं मारक. बहुमत नसताना शपथ घेतलीत. आमचा आकडा तुमच्यापेक्षा दहाने जास्त असेल असा दावा संजय राऊत यांनी केला.
 
'पोलिसांच्या वेशातील गुंड असू शकतात. मती फिरलेली आहे. सत्ता नसेल तर वेडे होतील. वेड्यांची इस्पितळं उभारा. पराभवाचा धक्का पचणार नाही', असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
 
'ऑपरेशन कमळ झालं आधीच. सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स आणि पोलीस हे ऑपरेशन कमळ करतात. बहुमत असतं तर हे सगळं करण्याची गरज पडली नसती', असं राऊत म्हणाले.
 
कुटुंबात फूट पडू नये असं वाटतं. बाळासाहेब ठाकरेंनी मला राज ठाकरेंशी चर्चा करायला पाठवलं त्यामुळे अजित पवारांना कोण भेटायला जातंय यात आश्चर्यकारक काहीच नाही असं राऊत म्हणाले. बहुमताचा आकडा प्रतिज्ञापत्र असलेलं पत्र दिलं आहे असं त्यांनी स्पष्ट दिलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती