अजित पवार यांनी शिवसेना-काँग्रेसला पाठिंब्याचं राष्ट्रवादीचं पत्र भाजपकडे वळवलं का?

शनिवार, 23 नोव्हेंबर 2019 (16:23 IST)
"ज्या पद्धतीनं शनिवारी सकाळी महाराष्ट्रात शपथविधीचा कार्यक्रमाचा कार्यक्रम झाला आणि ज्या पत्राच्या आधारे सत्तास्थापना करण्यात आली, त्या आमदारांच्या पत्राचा दुरुपयोग करण्यात आला आहे," असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
 
यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी म्हटलं, "राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना या तिन्ही पक्षांनी नवनर्वाचित सदस्यांची यादी तयार करून त्यांच्या सह्या घेऊन पक्षाकडे ठेवल्या आहे. माझ्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवनिर्वाचित आमदारांच्या सह्यांच्या याद्या आहेत. या याद्यांपैकी 2 याद्या विधिमंडळाचे राष्ट्रवादी पक्षाचे नेते म्हणून अजित पवार यांनी कार्यालयातून घेतल्या.
 
"आमचा अंदाज आहे की, या याद्या त्यांनी राज्यपालांना सादर केल्याची शक्यता आहे. आणि त्याच्याआधारे राज्यपालांनी शपथ दिली असावी. असं असेल, तर त्या सह्या पक्षाच्या अंतर्गत कार्यक्रमासाठी घेतलेल्या आणि त्या नवीन सरकार बनवण्यासाठी पाठिंबा देण्याकरता नव्हत्या. त्या 54 लोकांच्या सह्या होत्या. त्यापैकी 8 ते 10 लोकांच्या सह्या राज्यपालांना देऊन सगळ्या 54 जणांचा पाठिंबा असल्याचं भासवण्यात आल्याची शक्यता आहे. तसं असेल तर राज्यपालांची फसवणूक झाल्याची शक्यताही नाकारता येत नाही."
 
शनिवारी सकाळी 8 वाजून 10 मिनिटांनी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र अजित पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते म्हणून शपथ घेतली की स्वतंत्र आमदार म्हणून, हे लगेचच स्पष्ट होत नव्हतं.
 
मतदानापूर्वी आणि निकालांनंतरही अजित पवार नाराज असल्याचं अनेकदा दिसलं होतं. त्यामुळे अजित पवारांनी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला की फोडला, अशा प्रश्नांना ऊत आला आहे.
 
मात्र भाजपसोबत जाण्याच्या अजित पवार यांच्या निर्णयाची त्यांचे काका आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना कल्पना होती का?
 
"अजित पवार यांच्या राजकीय निर्णयाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पाठिंबा नाही. हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे," असं ट्वीट शरद पवार यांनी केलं.
 
मग अजित पवार यांच्याबरोबर आणखी किती आमदार भाजपला पाठिंबा देत आहेत, हाही प्रश्न उरतोच.
 
"अजित पवार यांनी पाठिंब्याचं पत्र दिलं आहे. ते राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते आहेत. भाजपला स्पष्ट बहुमत आहे. आमचा बहुमताचा आकडा 170च्या पुढे जाईल. वरिष्ठ पातळीवर चर्चा झाली. याबाबत अतिशय गुप्तता पाळण्यात आली. देवेंद्र फडणवीस पाच वर्षांकरता मुख्यमंत्री असतील," असं भाजपचे नेते गिरीश महाजन म्हणाले.
 
मात्र राष्ट्रवादीचे किती आणि कोणते नेते भाजपच्या संपर्कात आहेत, याबद्दल मात्र ते बोलले नाहीत.
 
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं, "कालच्या बैठकीत हजेरीसाठी आमदारांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या, ते पत्र राज्यपालांकडे नेण्यात आलं. त्याआधारे हा शपथविधी झाला आहे. आज दुपारी 12 वाजता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करतील."
 
अजित पवार यांची काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली. राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित 54 आमदारांच्या स्वाक्षरीचं पक्ष त्यांच्याकडे आहे आणि याच पत्राच्या आधारे त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्याचं म्हटलं जात आहे.
अजित पवार यांनी शुक्रवारी (22 नोव्हेंबर) मित्र पक्षांसोबतच्या बैठकीचा फोटो ट्वीट केले होते, म्हणजे शपथविधीच्या 17 तासांपूर्वी.
 
त्यांनी म्हटलं, "मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी सत्तास्थापनेबाबत चालू घडामोडींवर मित्र पक्षांशी सकारात्मक चर्चा केली. या महत्त्वपूर्ण बैठकीला मी उपस्थित होतो. यादरम्यान मित्र पक्षातल्या नेत्यांची सुद्धा मतं जाणून घेतली."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती