चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पक्षात उभी फूट

मंगळवार, 15 जून 2021 (18:49 IST)
माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनानंतर लोक जनशक्ती पार्टीत उभी फूट पडल्याचं चित्र आहे. चिराग पासवान आणि पशुपती कुमार पारस यांच्यातील वादाच्या ठिणगीचं पक्षात फूट पडण्यात पर्यावसन झालंय.
 
चिराग पासवान यांना लोक जनशक्ती पार्टीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून हटवण्यात आल्याचं वृत्त एएनआय वृत्तसेवा संस्थेनं दिलं आहे.
 
तसंच, सुरजभान सिंग यांना लोजपाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदी नियुक्त करण्यात आलंय. पक्षाच्या पुढील अध्यक्षपदासाठी निवडणूक आयोजित करण्याचे अधिकारही सुरजभान सिंग यांच्याकडे देण्यात आले आहेत. असंही एएनआयनं वृत्तात म्हटलंय.
 
मात्र, दुसरीकडे चिराग पासवान यांच्या गटानं पक्षाच्या लेटरहेडखाली आदेश जारी केलाय की, "चिराग पासवान यांच्याविरोधात बंड करणाऱ्या पाचही खासदारांना पक्षातून काढण्यात येत आहे." विशेष म्हणजे, या पाच खासदारांमध्ये चिराग पासवान यांचे काका पशुपती कुमार पारस यांचाही समावेश आहे.
लोक जनशक्ती पक्षाचे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार चिराग पासवान यांच्याकडे असल्याचंही चिराग पासवान गटानं म्हटलंय.
सोमवारी (14 जून) लोक जनशक्ती पार्टीच्या 6 पैकी 5 खासदारांनी चिराग पासवान यांच्याविरोधात बंड केलं होतं आणि चिराग पासवान यांच्या जागी त्यांचे काका पशुपती कुमार पारस यांना लोकसभेतील पक्षाचा नेता घोषित केला.
 
चिराग पासवान यांचे समर्थक आक्रमक
दिल्लीत या घडामोडी घडत असताना, तिकडे बिहारमध्ये चिराग पासवान यांचे समर्थक आक्रमक झालेत.
चिराग पासवानांविरोधात बंड करणाऱ्या 5 खासदारांच्या फोटोंना कार्यकर्त्यांनी काळा रंग फासला आहे. पशुपती कुमार पारस यांच्या फोटोलाही काळा रंग फासण्यात आला आहे.
 
लोक जनशक्ती पार्टीच्या पाटण्यातील कार्यालयाबाहेर समर्थक गोळा झाले आहेत.
 
'पप्पांचा पक्ष आणि कुटुंब सोबत ठेवण्यात अपयशी ठरलो'
दुसरीकडे, लोक जनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान यांनी पक्षातील दुफळीबाबत खंत व्यक्त केलीय. पप्पांचा पक्ष आणि कुटुंब सोबत ठेवण्यात आपण अपयशी ठरल्याचं ट्वीट चिराग पासवान यांनी केलंय.
 
चिराग पासवान यांनी म्हटलंय की, "पप्पांनी तयार केलला पक्ष आणि कुटुंब यांना सोबत ठेवण्याचे माझे प्रयत्न होते. मात्र, मी अयशस्वी ठरलोय. पक्ष आईसमान असतो आणि आईसोबत कधीच धोका करू नये. लोकशाहीत जनता सर्वोच्च असते. पक्षावर निष्ठा ठेवणाऱ्यांना मी धन्यवाद देतो. एक जुनं पत्र इथं शेअर करतोय."
 
चिराग पासवान यांनी या ट्वीटसोबत जुनं पत्र शेअर केलं आहे. काका पशुपती पारस यांना चिराग यांनी हे पत्र 29 मार्च 2021 रोजी लिहिलं होतं.या पत्रात त्यांनी पशुपत पारस यांच्यासोबत झालेल्या वादांचाही उल्लेख केलाय.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती