एकत्र बसून सिनेमा पहायला किंवा टीव्ही पहायला सगळ्यांनाच आवडतं. त्यातला आनंद वेगळाच असतो. पण आपल्याला जे वाटतं तेच चिंपांझींनाही वाटतं, हे तुम्हाला माहितीये का?
काही चिंपांझींनाही एक व्हीडिओ एकत्र दाखवण्यात आला. त्यांनाही तशाच भावना आणि जवळीक जाणवली.
हा व्हीडिओ पाहणाऱ्या चिंपांझींच्या जोडप्यांवर लक्ष ठेवण्यात आलं. चित्रपट पाहताना त्यांच्यामधली जवळीक वाढल्याचं मानसशास्त्रज्ञांना आढळलं. हे फक्त माणसांबाबतच घडतं, असा समज याआधी होता.
एखादी गोष्ट कोणाबरोबर तरी एकत्र पाहण्याचा भावनिक परिणाम होण्यामध्येच 'मानवी उत्क्रांतीची पाळमुळं' असल्याचं अभ्यासकांचं म्हणणं आहे.
जर आपण असे अनुभव एकत्र घेणं थांबवलं तर काय होतं? म्हणजे समजा कुटुंबाने एकत्र टीव्ही पाहणं थांबवून आपापल्या सोशल मीडियावर लॉग-इन केलं किंवा सगळेजण स्वतःच्या फोनवर गोष्टी पाहू लागले तर?
चिंपांझींनाकोणते व्हिडिओ आवडतात?
रॉयल सोसायटीने यासंबंधीचा अभ्यास प्रसिद्ध केला आहे. यामध्ये व्हीडिओ सुरू असलेल्या एका स्क्रीनसमोर चिंपांझी आणि बोनोबोंना सोडण्यात आलं.
या अहवालाचे सह-लेखक वुटर वुल्फ सांगतात, की काही गोष्टी एकत्र पाहिल्यास त्याचा अनुभव जास्त परिणामकारक ठरतो. ते अमेरिकेतल्या ड्यूक युनिव्हर्सिटीमध्ये सायकॉलॉजी आणि न्यूरोसायन्स विभागात काम करतात.
हे प्राणी फिल्म पाहताहेत की नाही याची खात्री करण्यासाठी आय-ट्रॅकर वापरून त्यांच्या नजरेकडे लक्ष ठेवण्यात आलं. त्यांनी ही फिल्म एका जागी थांबून स्थिरपणे पहावी म्हणून त्यांना फळांचा रस देऊन प्रोत्साहन देण्यात आलं.
या प्राण्यांना नेमकं दाखवायचं काय हा कळीचा प्रश्न होता. त्यासाठी आधीच्या अभ्यास आणि पाहण्यांचा आधार घेण्यात आला. मग त्यानुसार माकडांना त्यांच्या आवडीचे व्हीडिओ दाखवण्यात आले.
एकूण 45 माकडांवर हा प्रयोग करण्यात आला. चिंपांझींचं कुटुंब एका पिलासोबत खेळतानाचा व्हीडिओ त्यांना दाखवला आणि त्यांच्या वागण्यात होणाऱ्या बदलांचा अभ्यास करण्यात आला. हा व्हीडिओ पाहिल्यानंतर त्यांच्यातलं नातं सुधारलेलं दिसलं. आता ही माकडं एकमेकांच्या अधिक जवळ रहायची, एकमेकांना स्पर्श करायची आणि त्यांच्या भाषेत संवादही साधायची.
गोष्टी एकत्र अनुभवणं
एखादी गोष्ट घडत असताना ती सर्वांसोबत अनुभवणं हा 'अगदी मानवी स्वभाव' असल्याचं आतापर्यंत समजलं जात होतं. पण या अभ्यासातून समोर आलेल्या निष्कर्षांमुळे या भावना फक्त माणसांपुरत्या मर्यादित नसल्याचं मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात.
या प्रयोगानंतर असा निष्कर्ष काढण्यात आला, की एखादी गोष्ट कोणाबरोबर तरी पाहिल्यानंतर त्या व्यक्तीसोबतची जवळीक वाढणं हा अनुभव 'माणूस आणि ग्रेट एप्स' (ग्रेट एप्स - गोरिला, बोनोबो, ओरांगउटान आणि चिंपांझी) या दोघांनाही येतो. प्रेक्षकांमध्ये बसून सिनेमा पाहताना किंवा एखादा खेळ पाहणाऱ्या लोकांना सोबतच्या इतर लोकांविषयी ते अनोळखी असूनही जे वाटतं, समूहाची जी एक भावना तयार होते त्याविषयी या अभ्यासातून समजू शकतं असं मानसशास्त्रज्ञांना वाटतंय.
वुटर वुल्फ म्हणतात, "एकत्र बसून काहीतरी पाहणं हा एक वेगळाच अनुभव असतो. इतका की मध्येच व्यत्यय आला तर वैतागायला होतं."
"गोष्टी एकत्र अनुभवल्याने किंवा वाटून घेतल्याने दोन व्यक्तींमध्ये एक समान धागा निर्माण होतो. तुम्ही सिनेमाला एकत्र गेला आणि एकमेकांच्या बाजूला बसलात तर ती एक अपूर्व गोष्ट असते."
"पण जर दुसऱ्या व्यक्तीने तिच्या फोनवर काही करायला सुरुवात केली तर त्याचा त्रास होतो. कारण मग त्यावेळी तुम्ही एकत्र सिनेमा पाहत नसता," ते सांगतात.
सोशल मीडिया हा आपल्या भावना किंवा अनुभव दुसऱ्यांना सांगण्याची मानवी भूक भागवतो. कदाचित म्हणूनच लोक त्याकडे आकर्षित होत असल्याचं मानसशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे. हे म्हणजे एखादी गोष्ट एकत्र पाहण्यासारखंच असतं.
माणसांना गोष्टी "एकत्र अनुभवण्याचं व्यसन" असल्याचं वुल्फ म्हणतात.
"पण सोशल मीडियाचा असा खोलवर परिणाम करणारा अनुभव तुम्हाला देतो का? ऑनलाईन सोशल नेटवर्कमधून मिळणारा अनुभव असा नसतो," ते म्हणतात.