राष्ट्रवादी काँग्रेसकडे सत्तेच्या चाव्या, सर्वात मोठा पक्ष ठरूनही भाजपला धक्का

मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019 (10:33 IST)
सुजाता आनंदन
निवडणुकांमध्ये सर्वाधिक जागा मिळवूनही भाजपला सत्ता गमवावी लागेल, असा विचार कुणीही केला नव्हता.
 
मित्रपक्ष शिवसेनेला कायम कमी लेखत तुच्छतेची दिलेली वागणूक, अन्य राजकीय पक्षांना दिलेली हिणकस वागणूक तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांना विनाकारण लक्ष्य करण्याची घोडचूक भाजपने केली. निवडणुकांआधी, प्रचारादरम्यान आणि नंतरही पवारांना लक्ष्य करणं चुकल्याचं भाजपच्या चिंतनात स्पष्ट होईल.
 
या सगळ्याचा परिणाम म्हणजे राजकीय समीकरणं नेत्यांच्या अहंकाराच्या पल्याड गेली आणि हा पक्षांच्या आणि नेत्यांच्या अस्तित्वाचा मुद्दा बनला. भाजपने शिवसेनेच्या नेत्यांना फोडू नये यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आटोकाट प्रयत्न केला. सत्ता संघर्षात शरद पवार हे निर्णायक ठरले.
 
राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या प्रतिमेला असलेला डाग पुसण्यासाठी पवार प्रयत्नशील आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी सहकार क्षेत्र हा बालेकिल्ला आहे. भाजपने सातत्याने त्यांना लक्ष्य केलं आहे.
 
शिवसेनेला गृहीत धरणं महागात?
काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याप्रतीचा दृष्टिकोन आणि तुच्छतेची वागणूक नजरेआड करून चालणार नाही. निवडणूक प्रचारादरम्यान देवेंद्र यांनी तळागाळापर्यंत नेटवर्क असलेल्या पवारांसारख्या अनुभवी राजकारण्याला लक्ष्य केलं.
पवारांची राजकीय कारकीर्द संपली अशा थाटात देवेंद्र यांनी प्रचार केला. मित्रपक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना गृहीत धरण्याची चूक देवेंद्र यांनी केली. सत्तेत आल्यास पद आणि जबाबदाऱ्यांचं समान वाटप होईल हा दिलेला शब्दही त्यांनी फिरवला.
 
पण केवळ फडणवीस नाही, भाजपच्या केंद्रातील आणि राज्यातील प्रमुख नेत्यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शोभेचं बाहुलं समजण्याची चूक केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव यांचा उल्लेख 'छोटा भाऊ' असा केला.
 
शिवसेनेची कोंडी करून भारतीय जनता पक्ष तळागाळामधील पोकळी भरून काढण्याची इच्छा बाळगून होता. म्हणूनच 2014 मध्ये भाजप-शिवसेना वेगळे लढले. मात्र निवडणुकांच्या निकालानंतर दोन्ही पक्षांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला. एकट्याने निवडणूक लढवूनही शिवसेनेने सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली.
 
यंदा युती असूनही शिवसेनेला थोपवण्याचा भाजपचा डाव होता. याचाच भाग म्हणून केंद्रात नेहमीप्रमाणे अवजड उद्योग खातं देऊन बोळवण करण्यात आली. महत्वाचं खातं मिळावं यासाठी उद्धव प्रयत्नशील होते. मात्र त्यांना यश मिळू शकलं नाही.
 
भाजपनं शब्द फिरवला?
शिवसेनेला मुख्यमंत्रीपद नाकारून भाजप केंद्राप्रमाणे राज्यातही सगळी सूत्रं आपल्याकडेच राहतील यासाठी आखणी केली. मुख्यमंत्री पद सोडाच, शिवसेनेला गृह आणि शहरविकाससारखी मुख्य खाती देण्यासही भाजपने नकार दिला. सत्ता आल्यास पदं आणि जबाबदाऱ्यांचं समान वाटप या शब्दाशी प्रतारणा होती.
आपली वागणूक उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला कधीही पटणार नाही, हे भाजपच्या लक्षातच आलं नाही. शेतकरी आणि सहकार क्षेत्रात पाय रोवण्यासाठी उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचा प्रयत्न सुरू आहे.
 
फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदासंदर्भातील मागणीबद्दल बोलताना उद्धव ठाकरे खोटं बोलत आहेत, असं म्हटलं. शरद पवारांच्या छुप्या सहकार्याशिवाय उद्धव ठाकरे यांना आगेकूच करता आली नसती. शिवसेनेच्या सत्ता स्थापनेच्या दाव्यापासून शरद पवार यांनी सुरक्षित अंतर राखलं. आम्हाला (राष्ट्रवादी काँग्रेस) आणि काँग्रेसला जनतेने विरोधकांच्या बाकावर बसण्याचा कौल दिला आहे, असं शरद पवार सांगत होते.
 
सत्ता बळकावून घेण्यापेक्षा चांगले विरोधक म्हणून काम करू, असंही त्यांनी म्हटलं होतं. सेना नेत्यांशी संपर्कात असल्याचा त्यांनी कधी इन्कार केला नाही. या खुल्या चर्चांचा परिणाम म्हणजे पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यात सोमवारी (11 नोव्हेंबर) बैठक झाली. यामुळे केवळ राज्यात नव्हे केंद्रातही राजकीय समीकरणांमध्ये प्रचंड स्थित्यंतर पाहायला मिळालं. काँग्रेसशी सल्ल्याविना शरद पवार यांनी शिवसेनेला पाठिंबा देऊ केला कारण त्यांची समाजातल्या तळागाळाशी असलेली त्यांची नाळ जोडलेली आहे.
 
शरद पवारांची भूमिका महत्त्वाची
शरद पवार यांनी ही निवडणूक अस्तित्वाची लढाई मानली आणि प्रचाराच्या निमित्ताने त्यांनी राज्य पिंजून काढलं. राष्ट्रवादी काँग्रेस हा काँग्रेसचा राज्यातील सहकारी पक्ष आहे. जनतेने काँग्रेस-राष्ट्रवादीला अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणावर मतं देत पवारांच्या संघर्षाला कौल दिला.
पक्षाचं तळागाळातील नेटवर्क पक्कं झाल्याने आपण सत्तेत परतू शकतो, असा विश्वास काँग्रेस-राष्ट्रवादीला मिळाला. म्हणूनच शिवसेनेच्या सत्तास्थापनेच्या दाव्याला त्यांनी पाठिंबा दिला.
 
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला एनडीतून म्हणजे राष्ट्रीय आघाडीतून बाहेर पडण्यास सांगितलं. हा त्यांच्यासाठी मोठा विजय होता. दुसरीकडे हा भाजपसाठी मोठा धक्का आहे. सत्ता स्थापनेच्या दाव्यासाठी भाजप अन्य पक्षाच्या आमदारांना फोडू शकलं नाही. त्यांच्या साम-दाम-दंड-भेदाच्या भाजपच्या राजकारणाचा हा मोठा पराभव आहे.
 
मराठी माणसांसाठीचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे आणि राजकारणातील मराठा समाजाचं प्रबळ नेतृत्व शरद पवार यांचं एकत्र येणं हा भाजपसाठी दणका आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती