काँग्रेसच्या 10 आमदारांचा भाजपप्रवेश, प्रमोद सावंत यांचं सरकार मजबूत स्थितीत
गुरूवार, 11 जुलै 2019 (11:34 IST)
कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएसचं आघाडीचं सरकार आधीच ऑक्सिजनवर आहे. त्यातच आता शेजारच्या गोव्यातही काँग्रेस संकटात सापडलं आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेत्यासह 10 आमदारांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या बरोबर जाऊन विधानसभेचे उपाध्यक्ष मायकल लोबो यांची भेट घेतली आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये सामील झाल्याचं स्पष्ट झालं आहे. यामुळे राज्यातलं भाजप सरकार 27 आमदारांसह मजबूत स्थितीत आलं असून विरोधी पक्षाची धार बोथट झाली आहे. आता काँग्रेसकडे फक्त पाच आमदार उरले आहेत.
गोव्याचे मुख्यंत्री प्रमोद सावंत यांनी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की "हे आमदार राज्याच्या आणि त्यांच्या मतदारसंघांच्या विकासासाठी आले आहेत. त्यांनी कुठलीही अट न ठेवता स्वेच्छेने भाजप प्रवेश केला आहे."
गोवा विधानसभेचे सभापती राजेंद्र पाटणेकर म्हणाले, "आज (बुधवारी) दोन निवेदनं माझ्याकडे आली. एक काँग्रेसच्या दहा आमदारांनी दिलं, ज्यात ते भाजपमध्ये विलीन होत आहेत असं सांगण्यात आलं आहे. दुसरं मुख्यमंत्री प्रमोद सावंत, जे विधानसभेत सत्ताधारी पक्षाचे नेते देखील आहेत, त्यांनी देखील निवेदन दिलं. यात भाजपचे संख्याबळ बदलून आता 27 वर गेलं आहे, असं नमूद केलं आहे. आणि मी ही दोन्ही निवेदनं स्वीकारली आहेत."
माजी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांच्यासह निळकंठ हळर्णकर, इजिदोर फर्नांडिस, टोनी फर्नांडिस, फिलीप नेरी रॉड्रिग्ज, फ्रान्सिस सिल्वेरा, बाबूश मोन्सेरात, विल्फ्रेड डिसा उर्फ बाबाशान, जेनिफर मोन्सेरात, क्लाफास डायस यांचा समावेश आहे.
काँग्रेसचे दहा आमदार भाजपच्या ब्लॅकमेलला आणि प्रलोभनांना बळी पडले आहेत, असं गोवा काँग्रेसचे प्रमुख गिरीश चोडणकर म्हणाले.
यावेळी ANIशी बोलताना भाजपमध्ये सामील झालेले माजी विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर म्हणाले, "मुख्यमंत्री सावंत चांगलं काम करत आहेत. आमच्याकडे सर्वाधिक आमदार असूनही आम्ही सरकार स्थापन करू शकलो नव्हतो."
"मी विरोधी पक्षनेता असूनही माझ्या मतदारसंघातली विकासकामं अडकून पडली होती. आम्ही कामं केली नाहीत तर जनता आम्हाला पुढच्या वेळी कसं निवडून देणार? काँग्रेसला त्यांची साधी आश्वासनं पाळता आली नाहीत. काही वरिष्ठ लोकांमध्ये समन्वय नव्हता, म्हणून इतक्या वेळा संधी मिळूनही सत्तास्थापन करता आलं नाही."
'भाजपची असुरक्षितता उघड झाली'
गोवा विधानसभेचं पावसाळी अधिवेशन 16 जुलै पासून सुरू होणार आहे. त्यामुळे त्याच्या ऐन काही दिवसांपूर्वी घडलेल्या या घडामोडीला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे.
"काँग्रेसच्या दहा आमदारांना पक्षात सामील करून भाजपने त्यांची युतीतील पक्षांप्रतिची असुरक्षिततेची भावना जगासमोर आणली आहे. पुरेसं संख्याबळ असताना मुख्यंमंत्री प्रमोद सावंत यांनी अशी खेळी करून ऐन विधानसभा अधिवेशनाच्या तोंडावर आपली भीती जगासमोर मांडली आहे," गोवा काँग्रेसचे प्रमुख गिरीश चोडणकर म्हणाले.
"भाजपने लोकसभा निवडणुकीत स्वप्नं दाखवली तो नवीन भारत हाच का? हा लोकांनी दिलेल्या कौलाचा अपमान आहे," असंही ते चोडणकर म्हणाले.
"भाजपचा हा उघड खेळ जनता पाहत आहेच आणि ते लोकशाहीचा गळा घोटणाऱ्यांना चांगलाच धडा शिकवतील. भाजपला एक देश एक निवडणूक नाही तर एक देश एक पक्ष हवाय. देवच या देशाचं रक्षण करो," असं ते म्हणाले आहेत.
'हे फोडाफोडीचे राजकारण कशासाठी?'
या घडामोडींनंतर गोव्याचं राजकारण परत एकदा एका वेगळ्या वळणावर येऊन ठेपलंय, असं 'लोकमत'च्या गोवा अवृत्तीचे संपादक राजू नायक यांना वाटतं.
बीबीसी मराठी प्रतिनिधी मनस्विनी प्रभुणे-नायक यांच्याशी बोलताना ते म्हणाले, "सध्याच्या घडीला गोव्याच्या सत्ताधारी पक्षाकडे पुरेसं संख्याबळ होतं. सरकार स्थिर असताना, शिवाय केंद्रातही भाजपचं सरकार असल्याने गोव्यातल्या सरकारला आणखी बळकटी मिळाली असताना हे फोडाफोडीचे राजकारण कशासाठी, हे समजत नाही. विधानसभेत विरोधीपक्षाचं अस्तित्वच उरणार नाही."
याआधी कर्नाटकमध्येही एच. डी. कुमारस्वामी यांच्या आघाडी सरकारच्या अनेक आमदारांनीही भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे सरकार संकटात सापडलं आहे. गेल्या काही दिवसांपासून हे बंडखोर आमदार मुंबईत असून त्यांना मनाजोगी मंत्रिपदं देता यावी म्हणून कुमारस्वामी सरकारच्या सर्व मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत.
बंडखोर मंत्र्यांची मनवळवणी करण्यासाठी मुंबईत दाखल झालेले कर्नाटक काँग्रेसचे नेते डी. के. शिवकुमार तसंच मुंबई काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांना पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतलं होतं.
त्यामुळे आता सरकारला 12 जुलैला विधानसभेत अग्निपरीक्षा द्यावी लागणार आहे.