बजरंग पुनिया : कुस्तीसाठी शाळेतून पळून जाण्यापासून ते ऑलिम्पिकमध्ये पदक पटकावण्यापर्यंतचा प्रवास
शनिवार, 7 ऑगस्ट 2021 (17:26 IST)
- प्रदीप कुमार
बजरंग पुनियाने 65 किलो फ्रीस्टाईल वजनी गटात कझाकिस्तानच्या दौऊलेत नियाझबेकोव्हचा 6-0 असा धुव्वा उडवत कांस्यपदकावर नाव कोरलं.
बजरंग पुनिया गेल्या 7-8 वर्षांपासून सातत्याने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवणारा खेळाडू आहे आणि म्हणूनच टोकियो ऑलिम्पिकमध्येही त्यांच्याकडून पदकाची आशा होती. बजरंगने अपेक्षांना न्याय देत पदकाची कमाई केली.
मात्र, दबावात त्याचा खेळ आणखी बहरतो, हे त्याने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे.
बजरंग पुनियाने ऑलिम्पिकमध्ये पदक निश्चित करून एकप्रकारे बालपणीचं स्वप्न पूर्ण केलं आहे.
एपिक चॅनलवरच्या 'उम्मीद इंडिया' नावाच्या एका कार्यक्रमात वीरेंद्र सहवाग यांनी बजरंग पुनियाला कुस्तीचं आकर्षण कसं निर्माण झालं, हा प्रश्न विचारला होता. त्याचं उत्तर देताना बजरंग पुनियाने सांगितलं होतं, "हरियाणातील गावांमध्ये प्रत्येक घरात तुम्हाला लंगोट दिसेल. त्यामुळे फक्त लंगोट घालून उतरायचं. आखाड्यात जिंकल्यावर काहीतरी मिळतच. माझी सुरुवातही अशीच झाली. पण, खरं सांगायचं तर शाळेत जावं लागू नये, म्हणून मी आखाड्यात जायचो."
हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील कुडन गावातील मातीच्या आखाड्यांमध्ये बजरंग पुनियाने वयाच्या सातव्या-आठव्या वर्षापासूनच तालमीला जायला सुरुवात केली. त्याचे वडीलही पहलवान होते. त्यामुळे घरूनही विरोध नव्हता.
मात्र, मातीच्या आखाड्यांमध्ये मातीमुळे कुस्तीपटूंना बरीच मदत होत असली तरी मॅटवरची कुस्ती शिकावीच लागते. त्यामुळे वयाच्या 12 व्या वर्षी बजरंग पुनियाने मॅटवरची कुस्ती शिकण्यासाठी दिल्लीतील छत्रसाल स्टेडियम गाठलं. इथे कोच सतपाल यांच्या मार्गदर्शनाखाली मॅटवरच्या कुस्तीचे धडे गिरवायला सुरुवात झाली.
तिथेच योगेश्वर दत्तची ओळख झाली आणि कुस्तीबद्दल प्रेम आणखीन वाढलं. या भेटीविषयी एपिक चॅनलवरच्या 'उम्मीद इंडिया' कार्यक्रमात बोलताना योगेश्वर दत्त म्हणाले होते, "2008 साली कुडन गावातल्या माझ्या एका मित्राने त्याला मला भेटायला आणलं. तेव्हापासूनच त्याच्यात चिकाटी होती. तो आमच्यापेक्षा 12-13 वर्षांनी लहान होता. पण, मेहनत आमच्यासारखीच करायचा."
योगेश्वर दत्त बजरंग पुनियासाठी मॉडल, गाईड, मित्र सर्वच होते. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये योगेश्वर दत्तच्या विजयाने बजरंग पुनियानेही ऑलिम्पिक पदकाचं स्वप्न उरी बाळगलं.
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार राजेश राय सांगतात, "मी बजरंग पुनियाला पहिल्यांदा भेटलो ते सोनीपतमध्ये. त्यावेळी योगेश्वर दत्तही त्याच्यासोबत होते. त्यांच्यावर योगेश्वर दत्तचा खूप पगडा होता."
हा पगडा इतका होता की बजरंग पुनियाने 2014 साली योगेश्वर अकॅडमीत प्रवेश घेतला आणि मग मागे वळून बघितलं नाही. गेल्या सात वर्षात बजरंग पुनियाने ज्या-ज्या स्पर्धांमध्ये यश मिळवलं ते अभूतपूर्व असं आहे.
2017 आणि 2019 सालच्या एशियन चॅम्पियनशीप, 2018 साली एशियन गेम्स आणि आणि 2018 सालच्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये बजरंग पुनियाने गोल्ड मेडलची कमाई केली.
त्याच वर्षी झालेल्या एशियन चॅम्पियनशीपमध्ये त्याला सिल्व्हर मेडलवर समाधान मानावं लागलं होतं. ऑलिम्पिकपूर्वी वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पुनियाने 6 गोल्ड, 7 सिल्व्हर आणि 4 ब्रॉन्झ मेडल पटकावले आहेत. या सर्व यशामध्ये योगेश्वर दत्त यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलं.
ज्येष्ठ क्रीडा पत्रकार राजेश राय सांगतात, "एका उत्तम खेळाडूचं मार्गदर्शन काय कमाल करू शकतं हे एका उदाहरणावरून समजून घेता येईल. 2018 सालच्या राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारचं नामांकन बजरंग पुनियालाही होतं. मात्र, त्यांना तो पुरस्कार मिळाला नाही."
"त्यावेळी ते बंगळुरूमध्ये प्रशिक्षण घेत होते. दुःखी होते. फोनवर म्हणाले कॅनॉट प्लेसवर पत्रकार परिषद घेईल आणि पुरस्कार मिळाला नाही, या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करेन."
राजेश राय यांच्या मते हे सगळं खूप घाईत घडलं आणि योगेश्वर दत्त यांना उशिरा कळलं. त्यांनी बजरंग पुनियाला समजावलं की तू फक्त खेळत रहा. पुरस्कार आज नाही तर उद्या मिळेलच. कोर्टाचे खेटे घालू नको. त्याने काहीच फायदा होणार नाही.
या सल्ल्याचा फायदा असा झाला की बजरंग पुनियाला 2019 सालचा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कारही मिळाला आणि कुस्तीच्या खेळात नावही चमकलं.
दरम्यानच्या काळात आपल्या खेळाविषयी त्याच्या एका वक्तव्याची बरीच चर्चा झाली. पुनियाने गमतीत म्हटलं होतं, "ये ढाई किलो का हाथ जब किसी पर पडता है तो गोल्ड मेडल आ ही जाता है."
यावरून पुनियावर सिनेमाचा प्रभाव आहे, असं कुणीही म्हणेल. मात्र, पुनियाने गेल्या दहा वर्षात एकदाही चित्रपटगृहात जाऊन सिनेमा बघितलेला नाही. एवढंच नाही तर 7 वर्ष त्यांच्याकडे मोबाईल फोनही नव्हता.
पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या एका मुलाखतीत बजरंग पुनियाने सांगितलं होतं, "2010 साली मी आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळायला सुरुवात केली. त्यावेळी योगी भाई (योगेश्वर दत्त) मला म्हणाले होते की या लक्ष विचलित करणाऱ्या गोष्टी आहेत. आज माझ्याकडे मोबाईल आहे. पण योगी भाईंसमोर मी तो वापरत नाही. ते 10 तास माझ्या सोबत असतील तर मी 10 तास फोनविनाच असतो."
योगेश्वर दत्त यांच्या सल्ल्याचाच परिणाम आहे की वेगवेगळ्या स्पर्धांसाठी जगभरातले 30 देश फिरूनही बजरंग पुनियाने एकाही देशातील एकही पर्यटन स्थळ बघितलेलं नाही. संघातले इतर खेळाडू फिरायला जात. पण, बजरंग पुनियाने सगळं लक्ष फक्त आणि फक्त कुस्ती आणि सरावावर केंद्रीत ठेवलं.
बजरंग पुनियाचं ट्वीटर अकाऊंट आहे आणि तो ट्वीटही करायचा. पण टोकियो ऑलिम्पिकची तयारी सुरू केल्यापासून 2018 सालापासून त्याने एकही ट्वीट केलेलं नाही. त्याच्या ट्वीटवरूनही बजरंग पुनियाच्या विनम्र स्वभावाची झलक बघायला मिळते.
एका ट्वीटमध्ये तो लिहितो, "वाईट काळ सर्वात मोठा जादूगार आहे. एका क्षणात सर्व चाहत्यांच्या चेहऱ्यावरचा पडदा काढून टाकतो."
आणखी एका ट्वीटमध्ये तो लिहितो, "मी श्रेष्ठ आहे, हा आत्मविश्वास आहे. मात्र, केवळ 'मीच' श्रेष्ठ आहे, हा अहंकार आहे."
शाकोची साथ
टोकियो ऑलिम्पिकमध्ये बजरंग पुनियाकडून आशा असण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे त्याचे पर्सनल कोच शाको बेंटिनीडीस. ते गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पुनियाचा खेळ सुधारण्यावर काम करत आहेत.
जॉर्जियाचे कोच शाको यांनी स्वतः तीन ऑलिम्पिक मेडल पटकावले आहेत. ऑलिम्पिक खेळांची अधिकृत वेबसाईट ऑलिम्पिक्स डॉट कॉमवरच्या एका लेखानुसार बजरंग पुनिया आणि कोच शाको बेंटिनीडीस यांच्यात वडील आणि मुलाचं नातं बनलं आहे.
बेंटिनीडीस यांनी पुनियाच्या शारीरिक फिटनेसोबतच त्याच्या मानसिक फिटनेसवरही लक्ष दिलं. गेल्या वर्षी बजरंग पुनियाच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. मात्र, टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याने जोरदार पुनरागमन केलं.
कोव्हिड काळात बेंटिनीडीस लॉकडाऊनमुळे जॉर्जियात आपल्या घरी अडकले होते. त्यावेळी मोबाईल व्हिडियो कॉल आणि व्हिडियो क्लिप्सच्या माध्यमातून त्यांनी पुनियाला ऑनलाईन धडे दिले.
बजरंग पुनिया आपल्या जबरदस्त 'स्टॅमिना'साठी प्रसिद्ध आहे. या स्टॅमिनाच्या जोरावरच तो 6 मिनिटात आक्रमक खेळ दाखवत प्रतिस्पर्ध्याला चितपट करतो.
मात्र, त्याच्या खेळातली एक त्रुटी म्हणजे त्याचा लेग डिफेंस म्हणावा तितका स्ट्राँग नाही. त्यामुळे प्रतिस्पर्धी याच त्रुटीचा फायदा उचलत गुण पटकावतो.
माजी युरोपीयन चॅम्पियन शाकोने बजरंग पुनियाला प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली त्यावेळी त्यांनी पुनियाची बलस्थानं आणि त्रुटी यांचा अभ्यास केला. त्यावेळी त्याचा लेग डिफेंस कमजोर असल्याचं त्यांच्या ध्यानात आलं. यावर लक्ष देण्यासाठी टोकियो ऑलिम्पिकच्या आधी त्यांनी रशियामध्ये पुनियाच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली.
पीटीआयचे क्रीडा पत्रकार अमनप्रीत सिंह यांच्या मते, "करियरच्या सुरुवातीला मातीत कुस्ती खेळणे, फार वाकून न खेळणे, यामुळे त्यात ही त्रुटी आहे. मात्र, जॉर्जियाच्या शाकोंनी पुनियाचा लेग डिफेंस सुधारण्यात बरीच मदत केली."
ते पुढे सांगतात, "शाकोंनी पुनियासाठी जगातले श्रेष्ठ ट्रेनिंग पार्टनर शोधले आणि त्याला युरोप, अमेरिकेत वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षणासाठी घेऊन गेले. भारतात बजरंगसाठी जागतिक पातळीवरचा ट्रेनिंग पार्टनर शोधणं शक्य नव्हतं आणि म्हणूनच बजरंगच्या सरावात शाकोंचं मोलाचं योगदान आहे.