अनंत अंबानींच्या लग्नाला येणाऱ्या व्हीव्हीआयपी वऱ्हाडावर बॅग्सची मर्यादा कारण...
शुक्रवार, 1 मार्च 2024 (18:01 IST)
झोया मतीन
जगभरातील अनेक प्रभावी व्यक्तीमत्त्वं आणि दिग्गजांचं भारतातील गुजरातमध्ये आगमन झालं आहे. आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानीच्या विवाहानिमित्त आयोजित प्री वेडिंग पार्टीसाठी हे दिग्गज उपस्थित आहेत.
रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी अनंत अंबानीच्या विवाहानिमित्त प्री वेडिंग गालाचं आयोजन केलं आहे. त्यासाठी आमंत्रित पाहुण्यांमध्ये मार्क झुकेरबर्ग, रिहाना आणि बिल गेट्स यांचा समावेश आहे.
अनंत अंबानी यांचा राधिका मर्चंट बरोबर जुलै महिन्यात विवाह होणार आहे.
त्यानिमित्ताने गुजराजच्या जामनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसांच्या या खास सोहळ्यासाठी शाहरूख खान आणि अमिताभ बच्चन अशा बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे.
मुकेश अंबानी हे जगातील 10 व्या क्रमांकाचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती आहेत. फोर्ब्सच्या यादीनुसार त्यांची एकूण संपत्ती 115 अब्ज डॉलर एवढी आहे.
मुकेश अंबानींच्या वडिलांनी 1966 मध्ये स्थापन केलेला रिलायन्स हा एक मोठा उद्योग समूह आहे. रिफायनरी, रिटेल आणि आर्थिक सेवांबरोबरच टेलिकॉमसारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांत त्यांचा व्यवसाय पसरलेला आहे.
अनंत अंबानी मुकेश अंबानींच्या तीन मुलांमध्ये सर्वांत लहान आहेत. त्यांची तिन्ही मुलं रिलायन्सच्या संचालकीय मंडळात आहेत. 28 वर्षीय अनंत अंबानी रिलायन्स एनर्जीच्या व्यवसायाशी संलग्न असून रिलायन्स फाऊंडेशनच्या संचालकीय मंडळावरही ते आहेत.
विवाह सोहळ्यापूर्वीच्या या इव्हेंटच्या माध्यमातून अंबानी कुटुंबानं विवाहाच्या भव्य पार्ट्यांचं आयोजन करण्याची परंपरा कायम राखली आहे.
2018 मध्ये अंबानी यांची मुलगी इशा अंबानीच्या विवाह सोहळ्यापूर्वी उदयपूरमध्ये झालेल्या अशाच सोहळ्यात पॉप स्टार बियॉन्सनं परफॉर्म केलं होतं. या कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांमध्ये अमेरिकेच्या माजी परराष्ट्र मंत्री हिलरी क्लिंटन आणि जॉन केरी यांचाही समावेश होता.
त्यावेळी ब्लूमबर्गनं सुत्रांच्या हवाल्यानं इशा अंबानींच्या विवाह सोहळ्यात 10 कोटी डॉलरचा खर्च झाल्याचा दावा केला होता. पण अंबानी कुटुंबाच्या नीकटवर्तीयानं हा दावा फेटाळला होता. हा खर्च दीड कोटी डॉलरच्या आसपास होता, असं त्यांनी म्हटलं होतं.
या आठवड्याच्या सुरुवातीला जामनगरमध्ये स्थानिक लोकांना मेजवानी देत, अनंत अंबानींच्या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित या कार्यक्रमांना सुरुवात झाली होती.
जामनगरमधील रिलायन्सच्या मुख्य ऑइल रिफायनरीजवळच्या एका टाऊनशिपमध्ये ही प्री वेडिंग पार्टी होत आहे. जवळपास 1200 पाहुणे या पार्टीत सहभागी होणार आहेत. जगभरातील 100 शेफ या सोहळ्यात पाहुण्यांसाठी 500 पदार्थ तयार करणार आहेत.
रॉयटर्सच्या वृत्तानुसार पाहुण्यांमध्ये गौतम अदाणी आणि कुमार मंगलम बिर्ला असा भारतीय अब्जाधीशांचाही समावेश असणार आहे. त्याचबरोबर डिस्नेचे सीईओ बॉब आयगर पार्टाला येण्याची शक्यता आहे. डिस्नेच्या भारतातील व्यवसायाचं नुकतंच रिलायन्सबरोबर मर्जर (विलिनीकरण) झालं आहे.
त्याचबरोबर आशियाच्या प्रवासावर निघालेले मेटाचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग हेदेखिल गुरुवारी जामनगरला पोहोचले. तसंच बिल गेट्स यांनी नुकताच एका चहावाल्याबरोबरचा व्हीडिओ पोस्ट केला होता तो प्रचंड व्हायरल झाला.
तसंच शुक्रवारी आणखी काही सेलिब्रिटी पाहायला मिळाले असून, त्यात क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी, ड्वेन ब्राव्हो आणि बीपीचे सीईओ मरे ऑकिन्क्लॉस यांचा समावेश आहे.
त्याचबरोबर ब्लॅकरॉकचे सहसंस्थापक लॅरी फिंक, अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई, कॅनडाचे माजी पंतप्रधान स्टिफन हार्पर, ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान केवीन रुड आणि इव्हांका ट्रंप हेदेखील सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
"2018 आणि 2019 मध्ये मुकेश अंबानी यांच्या दोन्ही मोठ्या मुलांचे विवाह सोहळे झाले आहेत. पण त्या तुलनेत यावेळी जागतिक कॉर्पोरेट क्षेत्रातले जास्तीत जास्त व्हीव्हीआयपी राहू शकतात.
त्यावरून जागतिक तंत्रज्ञान, माध्यम आणि ऊर्जा क्षेत्रातील दिग्गजांसमोर भारतीय अर्थव्यवस्थेतील प्रमुख घटक म्हणून रिलायन्सचा वाढता प्रभाव स्पष्टपणे पाहायला मिळतो," असंही ब्लूम्बर्गनं लिहिलं.
मनोरंजनाच्या कार्यक्रमात रिहानाचा परफॉर्मन्स आणि इल्यूजनिस्ट डेवीड ब्लेन यांच्या सादरीकरणाचा समावेश असेल.
उपस्थित पाहुणे जामनगरमधील प्राण्यांच्या रेस्क्यू सेंटरलाही भेट देण्याची शक्यता आहे. याठिकाणी 2000 पेक्षा अधिक प्राणी आहेत.
रॉयटर्सनं या नियोजित टूरबाबतचे अधिकृत डॉक्युमेंट पाहिल्याचा दावा केला असून, त्यानुसार या टूरसाठी जंगल फिव्हर असा ड्रेस कोड असणार आहे.
या ड्रेस कोडमध्ये पाहुण्यांना अॅनिमल प्रिंट असलेले कपडे परिधान करण्यास सांगण्यात आलं आहे.
रॉयटर्सनं पाहिलेल्या डॉक्युमेंटमध्ये पाहुण्यांना आधीच काही सूचना दिल्या आहेत. हेअर स्टायलिंग, मेकअप आर्टिस्ट आणि भारतीय पोशाख 'फर्स्ट कम फर्स्ट' तत्वानुसार मिळेल, असं सांगण्यात आलं आहे.
अंबानी कुटुंबाकडून पाहुण्यांना नवी दिल्ली आणि मुंबईहून चार्टर विमानाची सेवाही पुरवली जात आहे. पण त्यासाठी पाहुण्यांना एका दाम्पत्यानं दोन मोठ्या बॅग किंवा तीन सूटकेस एवढंच मर्यादीत सामान बाळगण्यास सांगितलं आहे.
जास्त सामान असेल तर ते पाहुण्यांबरोबर विमानात जाईलचं याची खात्री नसल्याचं या डॉक्युमेंटमध्ये म्हटलं आहे.