आसाम पूर: एकेकाळी माझी 12 एकर जमीन होती आता आम्ही रस्त्यावर आलोय

सोमवार, 15 जुलै 2019 (15:55 IST)
दिलीप कुमार शर्मा
 
"एक वेळ अशी होती की आमच्याकडे सुमारे 12 एकर जमीन होती. पण पूर आणि भूस्खलन झाल्यामुळे सगळं उद्ध्वस्त झालं," अशी प्रतिक्रिया एका पूरग्रस्ताने दिली आहे.
 
आसाममध्ये पुराचं संकट हे फक्त यावर्षीच आलं आहे असं नाही तर या भागातल्या लोकांना सातत्याने या परिस्थितीशी झगडावं लागतं. दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे शेतातल्या जमिनीची धूप होते आणि आमच्या हक्काचं रोजगाराचं साधन हिरावलं जातं, अशी तक्रार पूरग्रस्त करत आहेत.
 
यावर्षी पुरामुळे 3181 गावं पाण्यात बुडाली आहेत. पुरामुळे निर्माण झालेली बिकट परिस्थिती लक्षात घेऊन बचाव पथकाला पाचारण करण्यात आलं आहे.
 
आसाममध्ये आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सध्या 28 जिल्हे पुराच्या कचाट्यात सापडले असून 26 लाख 45 हजार 533 जण प्रभावित झाले आहेत. अनेक ठिकाणी पुराचं पाणी घुसल्यामुळे पूरग्रस्त नागरिकांच्या संख्येत वाढ झाली आहे.
 
रविवारी, पुराच्या पाण्यात बुडून चार जणांचा मृत्यू झाला. याच प्रकारे मागच्या पाच दिवसांत पूर आणि भूस्खलनामुळे जवळपास 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
 
आपत्ती व्यवस्थापन विभागाचे अधिकारी अरूणा राजोरिया यांच्याशी बीबीसीने संवाद साधला. त्या म्हणाल्या, "पूरस्थितीपासून बचावासाठी विविध प्रकारचे उपाय करण्यात येत आहेत. पुरामुळे या कार्यात प्रचंड अडचणी निर्माण होत आहेत. केंद्र सरकारकडून अद्याप कोणत्याही प्रकारची मदत मागितलेली नाही."
 
सर्व जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांना बचाव आणि मदतकार्यासाठी साधनसामुग्री पुरेशा प्रमाणात देण्याचे निर्देश दिले आहेत. अनेक मदत केंद्रं उघडण्यात आली आहेत. तसंच औषध-पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या राज्यातल्या 327 केंद्रांमध्ये 16 हजार 596 नागरिकांनी आश्रय घेतला आहे.
 
तर मदतकार्यासाठी दाखल झालेली एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथके लोकांना सुरक्षित स्थळी पाठवण्यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. उत्तर आसामच्या जोरहाट निमाती घाटात ब्रह्मपुत्रा नदीचं पाणी धोक्याच्या पातळीच्या वरून वाहत आहे.
 
जिल्हा प्रशासनाने सध्या निमाती घाटावरून माजुलीच्या वेगवेगळ्या घाटांपर्यंत चालणाऱ्या नाव सेवा रद्द केल्या आहेत.
 
अनेक ठिकाणी बांधआणि पूल वाहून गेले
 
पुरामुळे अनेक ठिकाणी प्रशासनाने बांधलेले बांध आणि पूल वाहून गेल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली आहे. दरम्यान मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन करून राज्यातील स्थितीबाबत माहिती दिली.
 
केंद्र सरकार या संकटाच्या काळात शक्य त्या प्रकारे राज्याची मदत करणार असल्याचं मुख्यमंत्री सोनोवाल यांनी एक ट्वीट करून सांगितलं आहे.
 
बाक्सा जिल्ह्याच्या बालीपूर चर गावात बचाव कार्यासाठी सैन्याची मदत घेण्यात येत आहे.
 
"बाक्सा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी पूर प्रभावित परिसरात मदतकार्यासाठी सैन्याची मदत मागितली होती. मदतीसाठी दाखल होऊन जवानांनी पाण्यात अडकलेल्या सुमारे दीडशे जणांना सुरक्षितपणे बाहेर काढलं आहे," असं गुवाहाटीमध्ये तैनात असलेले सैन्याचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल पी. खोंगसाई यांनी सांगितलं.
 
ते पुढे सांगतात, "आम्ही सैन्याला सज्ज करून ठेवलं आहे. जर राज्य सरकार इतर कोणत्याही प्रकारे आमची मदत मागितली तर आम्ही पूर्णपणे तयार आहोत."
 
आसामच्या एकूण 33 जिल्ह्यांपैकी 28 जिल्हे पूरग्रस्त आहेत. राज्यात गोलाघाट जिल्ह्यात मीठाम चापोरी गावात मागच्या वर्षी पूर आला होता. त्याठिकाणी अद्याप तसं काही घडलं नसलं तरी नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे.
 
पुरामुळे भीतीचं वातावरण
40 वर्षीय मंटू मंडल यांचं घर धनश्री नदीच्या किनाऱ्याजवळ आहे. नदी आणि मंटूच्या घरातील अंतर कोणाच्याही मनात भीती निर्माण करू शकेल. आसामात पूर आल्याच्या बातमीमुळे मंटूचं संपूर्ण कुटुंब चिंताग्रस्त आहे.
 
ते सांगतात, "रोज पुरामुळे होत असलेल्या नुकसानीच्या बातम्यांमुळे भीती वाटत राहते. राज्यात सर्वच नद्यांचं पाणी वाढू लागलं आहे. पण धनश्री नदीत अजून पाणी वाढलं नाही. मी रोज सकाळी लवकर उठून पाण्याची पातळी तपासतो. नदीत अचानक कधी पाणी वाढेल, सांगू शकत नाही."
 
मंटूच्या घरासमोरून पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून बनलेला एक पक्का रस्ता जातो. तिथून पुढेच 30 मीटर अंतरावर धनश्री नदीचा किनारा आहे. ब्रह्मपुत्रा नदीच्या प्रमुख उपनद्यांमध्ये धनश्री नदीचा समावेश आहे. याठिकाणी सध्या फक्त पाच कुटुंब राहतात. बहुतांश लोक ही जागा सोडून निघून गेले आहेत. मात्र या पाच कुटुंबांकडे स्वतःच्या मालकीची कोणतीच दुसरी जमीन नसल्यामुळे त्यांना नाईलाजाने इथंच राहावं लागतं.
 
1986 नंतरचा सर्वांत मोठा पूर
 
खरंतर, आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातल्या मीठाम चापोरी नामक गावात मागच्या वर्षी पुरामुळे हाहाकार माजला होता. 1986 च्या नंतर इतका मोठा कधीच आला नव्हता, असं गावातली ज्येष्ठ मंडळी सांगतात.
 
आपली 72 वर्षांच्या आईजवळ अंगणात थांबलेले मंटू सांगतात, "आमचं कुटुंब मीठाम चापोरी गावात 60 वर्षांपासून राहतं. एक वेळ अशी होती की आमच्याकडे सुमारे 12 एकर जमीन होती. पण पूर आणि भूस्खलन झाल्यामुळे सगळं उद्ध्वस्त झालं."
 
आपल्या मुलाला असं बोलताना पाहून लखी रडू लागतात. काही वेळानंतर आपले अश्रू पुसत सावकाश बोलतात, "आमच्या घरामागची नदी पूर्वी कितीतरी किलोमीटर दूर होती. आमच्याकडे गावात सर्वांत जास्त जमीन होती.
 
फक्त शेतीनं आमचं कुटुंब चालायचं. पण आता आमची गत रस्त्यावरच्या भिकाऱ्यासारखी झाली आहे. माझी तीन मुलं ही जागा सोडून गेले. सरकारने जमिनीची झीज थांबवण्यासाठी नदीच्या किनाऱ्यावर बांध बांधला असता तर आज आमचे हे हाल झाले नसते."
 
आसामात पूर आणि भूस्खलन झाल्यामुळे मंटूसारख्या अनेक कुटुंबांना त्याची झळ पोहोचली आहे. शेकडो कुटुंबांनी आपल्या जमिनी गमावल्या आहेत. 1950 पासून आतापर्यंत 25 महापूर आले आहेत.
 
जलवायू परिवर्तनामुळे इथं पूर, भूस्खलन आणि भूकंपाचा धोका नेहमीच असतो. अशात जे पूर्वीपासून शेती करत आहेत ते भूस्खलनामुळे बेघर होत आहेत.
 
अनंत आपली वृद्ध आई, पत्नी, बहिण आणि दोन मुलांसोबत मीठाम चापोरी गावात राहतो. त्यांच्या घरामागून धनश्री नदी वाहते.
 
सरकारच्या मदतीबद्दल बोलल्यानंतर अनंत सांगतात, "सरकारची माणसं पूर आल्यानंतर मदतीच्या नावाने तांदूळ, पीठ, मीठ वगैरे देण्यासाठी येतात आणि त्यानंतर विचारपूस करत नाहीत. आमचं पक्क घर आणि शेत भूस्खलनात निघून गेलं आहे."
 
"आमची नुकसानभरपाई कोण करेल? आम्ही सरकारी जमिनीसाठी अर्ज केला आहे. पण कोणतीच सुनावणी झाली नाही. जिल्हा प्रशासनाचे कर्मचारी सांगतात की नदीने आमचं घर तोडलं नाही. याचा काय अर्थ होतो? आमचं संपूर्ण कुटुंब पाण्यात वाहून गेल्यावर कारवाई करणार आहे का?" अनंत विचारतात.
 
खरंतर, आसाममध्ये दरवर्षी पुरामुळे प्रचंड नुकसान होतं. तरीसुद्धा सरकारच्या वतीने आवश्यक प्रमाणात मदत मिळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर वाईट परिस्थिती ओढवते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती