अरविंद केजरीवाल: दिल्लीचे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री ते ईडीकडून अटकेपर्यंतचा प्रवास

गुरूवार, 21 मार्च 2024 (22:12 IST)
(दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक झाल्याची माहिती केजरीवाल यांच्या मंत्रिमंडळातील नेत्या आतिशी यांनी दिली आहे. अरविंद केजरीवाल यांचा आजवरचा राजकीय प्रवास कसा झाला आहे हे सांगणारा हा लेख आम्ही प्रकाशित करत आहोत.)
 
2 ऑक्टोबर 2012 : हाफ शर्ट, ढगळ पँट आणि डोक्यावर 'मैं हूं आम आदमी' लिहिलेली टोपी घातलेले अरविंद केजरीवाल काँस्टिट्यूशन क्लबमधल्या व्यासपीठावर आले.
 
त्यांच्यामागे मनीष सिसोदिया, प्रशांत भूषण, योगेंद्र यादव, कुमार विश्वास, गोपाल राय आणि भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातले त्यांचे इतर साथीदार बसले होते.
 
राजकारणात येण्याची घोषणा करत केजरीवालांनी म्हटलं, "आज या व्यासपीठावरून मी घोषणा करतो, की आता आम्ही निवडणूक लढवू. आजपासून देशातली जनता निवडणुकीच्या राजकारणात उतरत आहे. आता तुम्ही तुमचे उरलेले दिवस मोजायला सुरुवात करा."
 
त्यांनी पुढे म्हटलं, "आमची परिस्थिती कुरूक्षेत्राच्या मैदानात उभ्या असलेल्या अर्जुनासारखी आहे. त्याच्यासमोर हरण्याची भीती आणि आपल्याच लोकांचा सामना करणं, असं दुहेरी संकट होतं. तेव्हा कृष्णाने अर्जुनाला सांगितलं होतं, जय-पराजयाची चिंता न करता लढ."
 
भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचं राजकीय पक्षात रूपांतर केल्यानंतर केजरीवाल फक्त निवडणूक लढलेच नाहीत तर जिंकलेही. केजरीवालांकडे मोदी मॅजिकवरचा उतारा असल्याचं तिसऱ्यांदा दिल्लीची निवडणूक जिंकत त्यांनी दाखवून दिलंय.
 
इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस (IRS) मधले अधिकारी आणि IIT चे माजी विद्यार्थी असणाऱ्या केजरीवाल यांनी आपला राजकीय पाया 2011च्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनादरम्यान तयार केला होता. पण त्यांनी यापूर्वीच एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती.
 
परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून सामाजिक कार्य
2002 च्या सुरुवातीच्या महिन्यांत अरविंद केजरीवाल भारतीय महसूल सेवेतून सुटी घेऊन दिल्लीतल्या सुंदरनगरी भागामध्ये सामाजिक चळवळीमध्ये गुंतले होते.
 
त्यांनी एका NGO ची स्थापना केली. या NGO चं नाव होतं- परिवर्तन. आपल्या मित्रांच्या सोबतीने केजरीवाल या भागात मूलभूत गोष्टींमध्ये बदल घडवून आणण्याच्या प्रयत्नात होते.
 
काही महिन्यांनी, डिसेंबर 2002 मध्ये केजरीवाल यांच्या 'परिवर्तन' संस्थेने शहरी भागातल्या विकासाच्या मुद्द्यासंबंधी पहिल्या जनसुनावणीचं आयोजन केलं. त्यावेळी पॅनलमध्ये होते जस्टिस पी. बी. सावंत, मानवी हक्क कार्यकर्ते हर्ष मंदर, लेखिका अरुंधती रॉय आणि माहिती अधिकार कार्यकर्त्या अरूणा राय.
 
पुढची अनेक वर्षं मग केजरीवाल पूर्व दिल्लीतल्या या भागात वीज, पाणी आणि रेशन यासारख्या मूलभूत मुद्द्यांवर काम करत होते. 2006 मध्ये त्यांना 'उदयोन्मुख नेतृत्त्व' म्हणून रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला आणि पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणावर ओळखही मिळाली.
 
तेव्हापासून आजवर अरविंद केजरीवाल यांच्यासोबत काम करणारे अमित मिश्र सांगतात, "अरविंद एकदम स्ट्रेट फॉरवर्ड होते. जे काम करून घ्यायचं असेल त्याविषयी स्पष्ट बोलायचे."
 
"त्यावेळी आम्ही परिवर्तनच्या माध्यमातून मोहल्ला सभांचं आयोजन करायचो. या सभांद्वारे आम्ही लोकल गव्हर्नन्सवर चर्चा करायचो. लोकांच्या सभेला अधिकाऱ्यांना बोलवून त्यांना प्रश्न विचारायचो," असं अमित मिश्र यांनी सांगितलं.
 
"अरविंद केजरीवाल त्यावेळी लहान-लहान धोरणं तयार करायचे आणि त्यासाठी अधिकारी आणि नेत्यांची भेट घ्यायचे, वादही घालायचे. वेळ काढून ते नेत्यांना भेटत. त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांवरून संसेदत प्रश्न विचारला जावा यासाठी त्यांचे प्रयत्न असत."
 
पुढची अनेक वर्षं केजरीवाल सुंदरनगरीतल्या मूलभूत मुद्द्यांवर काम करत होते. माहिती अधिकारासाठीच्या आंदोलनामध्येही त्यांचा सक्रीय सहभाग होता.
 
अमित सांगतात, "सुंदरनगरीचे लोक आणि त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी अरविंद केजरीवाल एक झोपडी भाड्याने घेऊन राहिले. त्यांनी लोकांच्या मूलभूत गरजा समजून घेतल्या. लोकांच्या गरजा सरकारच्या धोरणांमध्ये आणण्याचा त्यांचा प्रयत्न असे."
 
भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातली भूमिका
2010 साली दिल्लीत झालेल्या कॉमनवेल्थ गेम्सच्या आयोजनात झालेल्या कथित घोटाळ्यांच्या बातम्या मीडियात आल्यानंतर लोकांमधला भ्रष्टाचाराच्या विरोधातला संताप वाढत होता.
 
त्यातून 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' या मोहिमेला सोशल मीडियावरून सुरुवात झाली आणि केजरीवाल त्याचा चेहरा बनले. दिल्ली आणि देशातल्या अनेक भागांमध्ये भ्रष्टाचाराच्या विरोधात लोकांच्या सभा व्हायला लागल्या.
 
गांधीवादी कार्यकर्ते असणाऱ्या अण्णा हजारेंनी एप्रिल 2011मध्ये दिल्लीच्या जंतरमंतरवर भ्रष्टाराच्या विरोधात जनलोकपालाची मागणी करत धरणं आंदोलन सुरू केलं.
 
व्यासपीठावर अण्णा होते आणि त्यांच्यामागे केजरीवाल. देशातल्या विविध कानाकोपऱ्यांतून आलेले तरूण या आंदोलनात सहभागी झाले. उलटणाऱ्या प्रत्येक दिवसासोबत आंदोलनाची गर्दी आणि भ्रष्टाचाराच्या विरोधातला लोकांमधला संताप वाढत होता.
 
पण 9 एप्रिलला अण्णांनी अचानकच आपलं आमरण उपोषण मागे घेतलं. जोशातल्या तरुणांच्या गर्दीने एका काळ्या मिशा असणाऱ्या हाफ शर्ट घातलेल्या लहान चणीच्या माणसाला घेरलं. ते केजरीवालच होते.
 
हे तरूण 'भारत माता की जय' आणि 'इन्कलाब झिंदाबाद'च्या घोषणा देत होते. अण्णांनी उपोषण मागे घेऊ नये असं हे तरूण केजरीवाल यांना सांगत होते आणि केजरीवाल शांत होते.
 
तोपर्यंत अरविंद केजरीवाल हे भ्रष्टाचार विरोधी आंदोलनाचे शिल्पकार झाले होते. पुढच्या काही महिन्यांत त्यांनी 'टीम अण्णा'चा विस्तार केला. समाजातल्या सगळ्या वर्गांना या आंदोलनाशी जोडलं, त्यांच्या सूचना मागितल्या आणि एका मोठ्या जनआंदोलनाची आखणी केली.
 
त्यानंतर ऑगस्ट 2011मध्ये दिल्लीतल्या रामलीला मैदानावर अण्णा हजारेंचं जनलोकपालसाठीचं मोठं आंदोलन सुरू झालं. 'मै अण्णा हूँ' लिहिलेली टोपी घातलेल्या लोकांची गर्दी रामलीला मैदानावर लोटली.
 
मीडियाने याला 'अण्णा क्रांती' असं नाव दिलं. केजरीवाल या क्रांतीचा चेहरा झाले. त्यांना पत्रकारांचा गराडा पडत होता. टीव्हीवर त्यांच्या मुलाखती झळकत होत्या.
 
पण केजरीवाल यांना जे अपेक्षित होतं, ते या आंदोलनातून साध्य झालं नाही. आता केजरीवालांनी दिल्लीतल्या विविध भागांमध्ये मोठ्या सभा घ्यायला सुरुवात केली.
 
तरुणांमधली अँग्री यंग मॅनची प्रतिमा
केजरीवाल व्यासपीठावर येऊन नेत्यांवर टीका करायचे. त्यांचा भ्रष्टाचार उघड करायचे. व्यवस्थेमुळे हताश झालेला आणि बदल घडवू इच्छिणारा 'अँग्री यंग मॅन' अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली. देशातले हजारो तरूण येऊन त्यांना सामील होत होते.
 
त्यानंतर मग जुलै 2012मध्ये अण्णा हजारेंच्या मार्गदर्शनाखाली केजरीवाल यांनी आपलं पहिलं मोठं धरणंआंदोलन जंतर-मंतरवर सुरू केलं. तोपर्यंत त्यांच्या आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावरही 'मै अण्णा हूँ'ची टोपी होती. आणि मुद्दादेखील भ्रष्टाचार आणि जनलोकपालचाच होता.
 
लोकांनी रस्त्यावर उतरावं असं आवाहन करत केजरीवाल म्हणाले, "जेव्हा या देशाची जनता जागी होत रस्त्यांवर उतरेल तेव्हा मोठ्यात मोठी सत्ता उखडून फेकण्याची शक्ती तिच्यात असेल."
 
केजरीवाल यांना प्रोत्साहन देण्यासाठी यावेळी अण्णा हजारेही जंतर-मंतरला पोहोचलेले होते.
 
उपोषण करणाऱ्या अरविंद केजरीवाल यांचं वजन एकीकडे कमी होत असताना दुसरीकडे देशातली त्यांची लोकप्रियता वाढत होती. केजरीवाल राजकारणात उतरणार हे उपोषण संपेपर्यंत जवळपास स्षष्ट झालं होतं.
 
पण आपण कधीही निवडणुकीच्या राजकारणात उतरणार नाही असं स्वतः केजरीवाल वारंवार म्हणत आले होते.
 
दहा दिवसांचं आपलं उपोषण मागे घेताना केजरीवाल म्हणाले, "लहान लढायांकडून आता आम्ही मोठ्या युद्धांच्या दिशेने पुढे जात आहोत. संसदेचं शुद्धीकरण आपल्याला करायचं आहे. आता आंदोलन रस्त्यावरही होईल आणि संसदेतही. दिल्लीतली सत्ता संपुष्टात आणत ती देशातल्या प्रत्येक गावापर्यंत पोहोचवायची आहे."
 
आता आपण पक्ष स्थापन करून निवडणुकीच्या राजकारणात उतरणात हे अरविंद केजरीवाल यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, "हा पक्ष नसेल, हे आंदोलन असेल. इथे कोणी हाय कमांड नसेल."
 
राजकारणात येण्याची घोषणा केजरीवाल करत असतानाच या आंदोलनात सहभागी झालेल्या भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव बदलत होते. अनेक कार्यकर्ते हा निर्णय स्वीकारत पुढच्या लढाईसाठी सज्ज झाले तर अनेकांनी यावर आक्षेपही घेतला.
 
राजकारणात उतरण्याचा निर्णय का?
राजकारणात उतरण्याच्या केजरीवाल यांच्या निर्णयाविषयी अमित सांगतात, "आपला राजकारणात यायचा विचार नसल्याचं सुरुवातीला अरविंद नेहमी म्हणायचे. ते म्हणायचे, हॉस्पिटलमध्ये डॉक्टर उपचार करत नाहीत म्हणून आपण डॉक्टर व्हायचं नसतं. पण जनलोकपाल आंदोलनाच्या वेळी सगळीकडून निराशा झाल्यानंतर अरविंद यांनी राजकारणात येण्याचा हा निर्णय घेतला."
 
पण राजकारणात येण्याचं केजरीवाल यांचं ध्येय नव्हतंच. आयआयटीत त्यांच्या सोबत असणारे त्यांचे मित्र राजीव सराफ सांगतात, "कॉलेजमध्ये असताना आम्ही कधी राजकारणावर बोललोही नाही. चार वर्षांत राजकारणावर चर्चा केल्याचं मला आठवत नाही. त्यामुळेच अरविंदला राजकारणात पाहून मी आश्चर्यचकित झालो होतो."
 
सराफ सांगतात, "त्याचीही एक कहाणी आहे. कॉलेजनंतर ते कोलकात्यात नोकरी करत होते. तिथे ते मदर तेरेसांच्या संपर्कात आले. त्यानंतर ते आयआरएसमध्ये गेले आणि तिथ त्यांना भरपूर भ्रष्टाचार असल्याचं आढळलं. मला वाटतं त्यांचं राजकारणाबाबत त्याचं एक ठाम मत होतं. पण त्यांनी राजकारणात यायचं कधीही ठरवलं नव्हतं."
 
भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातून अँग्री यंग मॅन अशी प्रतिमा तयार झालेले केजरीवाल कॉलेजच्या दिवसांत मात्र शांत, अबोल स्वभावाचे होते.
 
सराफ सांगतात, "आम्ही कॉलेजमध्ये असताना अरविंद अतिशय शांत आणि लाजाळू होते. आम्ही एकत्र भटकायचो. पण त्यांना भरपूर बोलताना कधी पाहिलं नाही. अण्णांच्या आंदोलनानंतरच आम्ही त्याचं अँग्री यंग मॅन रूप पाहिलं. आणि हे त्यांच्या कॉलेजच्या दिवसांच्या अगदी उलट आहे. त्यावेळी ते शांत असायचे, पण लोक काळानुसार बदलतात. केजरीवाल यांच्यातही बदल झालाय."
 
26 नोव्हेंबर 2012 रोजी अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पक्षाच्या स्थापनेची अधिकृत घोषणा केली. आपल्या पक्षात कोणीही हाय कमांड नसेल आणि आपण जनतेच्या मुद्द्यांवर जनतेच्या पैशांनी निवडणूक लढवणार असल्याचं केजरीवाल यांनी सांगितलं.
 
केजरीवाल यांनी राजकारणाचा मार्ग निवडल्यानंतर ते सत्तेच्या मार्गाने जात असल्याचं त्यांचे गुरू अण्णा हजारेंनीही म्हटलं.
 
सुरुवातीच्या काळात केजरीवाल सगळ्यांनाच पक्षात सामावून घेत होते. त्यांच्या वॅगन आर कारमध्ये एका मुलाखतीनंतर मी रेकॉर्डर बंद केल्याबरोबर ते मला म्हणाले होते, पत्रकारिता सोड, आमच्या पक्षात ये. हा निष्पक्ष राहण्याचा नाही तर भ्रष्टाचाराच्या विरुद्ध उभं राहण्याचा काळ आहे. असं आमंत्रण केजरीवाल यांनी फक्त मलाच दिलं नव्हतं. मला तर ते नीट ओळखतही नव्हते. तेव्हा त्यांना भेटणाऱ्या सगळ्यांनाच ते आपल्या पक्षात यायचं आमंत्रण देत होते.
 
त्यांची ही संघटन क्षमताच पुढे त्यांची सगळ्यांत मोठी ताकद झाली. केजरीवालांनी असे स्वयंसेवक जोडले जे उपाशी पोटीही त्यांच्यासाठी काम करायला तयार होते, दंडुके झेलायला तयार होते.
 
या कार्यकर्त्यांच्या जोरावर केजरीवाल यांनी 2013मध्ये दिल्ली विधानसभा निवडणूक लढवली. राजकीय पदार्पण करणाऱ्या त्यांच्या पक्षाने 28 जागा जिंकल्या. खुद्द अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून तेव्हाच्या मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना 50,000 मतांनी हरवत जिंकून आले. पण याच शीला दीक्षितांच्या काँग्रेस पक्षासोबत मिळून त्यांनी सरकार स्थापन केलं.
 
मुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी केजरीवाल दिल्ली मेट्रोने प्रवास करत रामलीला मैदानात दाखल झाले. ज्या रामलीला मैदानात ते अण्णांच्या सोबत उपोषणाला बसले होते तेच त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या शपथेचं साक्षीदार झालं.
 
शपथ घेतल्यानंतर केजरीवाल यांनी भारत माता की जय, इन्किलाब झिंदाबाद आणि वंदे मातरमच्या घोषणा दिल्या आणि म्हणाले, "आज अरविंद केजरीवालने शपथ घेतलेली नाही. आज दिल्लीतल्या प्रत्येक नागरिकाने मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतलीय. ही लढाई अरविंद केजरीवालला मुख्यमंत्री बनवण्यासाठीची नव्हती. ही लढाई सत्ता जनतेच्या हातात देण्यासाठीही होती."
 
आपला विजय हा निसर्गाचा चमत्कार असल्याचं सांगत अरविंद केजरीवाल यांनी ईश्वर, अल्लाह आणि देवाचे आभार मानले.
 
शपथ घेतल्याच्या काही दिवसांनंतरच केजरीवाल दिल्ली पोलिसांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात रेलभवनाबाहेर आंदोलनाला बसले. दिल्लीच्या थंडीत रजई गुंडाळलेले केजरीवाल भ्रष्टाचाराच्या विरुद्ध जेव्हा बोलले तेव्हा ते आपल्याच मनातल्या गोष्टी बोलत असल्याचं लोकांना वाटलं.
 
केजरीवाल यांचं हे सरकार फक्त 49 दिवस टिकलं. पण या 49 दिवसांमध्ये दिल्लीच्या राजकारणाने एक नवीन युग पाहिलं. भ्रष्ट अधिकाऱ्यांचा व्हीडिओ रेकॉर्ड करण्याचं आवाहन केजरीवाल आपल्या भाषणादरम्यान करत. भ्रष्ट अधिकारी त्यांचं भाषण ऐकून घाबरत.
 
केजरीवाल यांना जनलोकपाल विधेयक लवकरात लवकर मंजूर करायचं होतं. पण आघाडीच्या या सरकारमधला सोबती असणारा काँग्रेस पक्ष यासाठी तयार नव्हता. शेवटी 14 फेब्रुवारी 2014ला अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि ते पुन्हा एकदा रस्त्यावर उतरले.
 
केजरीवाल म्हणाले, "जर मला सत्तेचा लोभ असता तर मी मुख्यमंत्रिपद सोडलं नसतं. मी माझ्या तत्त्वांसाठी मुख्यमंत्री पद सोडलंय."
 
याच्या काही महिन्यांनीच लोकसभा निवडणुका होणार होत्या. नरेंद्र मोदींना आव्हान देण्यासाठी केजरीवाल वाराणसीला पोहोचले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी केलेल्या भाषणात ते म्हणाले, "मित्रांनो, माझ्याकडे काहीच नाही. मी तुमच्यातलाच एक आहे. ही लढाई माझी नाही, ही लढाई त्या सगळ्यांची आहे ज्यांनी भ्रष्टाचार मुक्त भारताचं स्वप्न पाहिलंय."
 
वाराणसीतून केजरीवाल तीन लाख सत्तर हजारांपेक्षा जास्त मतांनी हरले. राजकारणात मोठी उडी मारण्याआधी लहान मैदानात सराव करणं गरजेचं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी पुन्हा दिल्लीकडे आपलं लक्ष वळवलं.
 
निराश झालेल्या पक्ष कार्यकर्त्यांसाठी एक निवेदन प्रसिद्ध करत केजरीवाल यांनी म्हटलं, "आपला पक्ष अजून नवीन आहे. अनेक गोष्टी अजून खिळखिळीत आहेत. आपल्या सर्वांना मिळून ही संघटना तयार करायची आहे. येत्या काळात आपण सर्वजण मिळून संघटना मजबूत करू. हा पक्ष या देशाला पुन्हा स्वतंत्र करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावेल यावर माझा विश्वास आहे."
 
केजरीवाल यांनी अगदी 'आम आदमी'ची राहणी अवलंबली. साधे कपडे घालून ते वॅगन आरने प्रवास करत. आंदोलन करताना लोकांच्या दरम्यान झोपी जात.
 
यादरम्यान एका व्हिडिओद्वारे केजरीवाल यांनी म्हटलं होतं, "मी तुमच्यातलाच एक आहे, आणि माझं कुटुंब तुमच्यासारखंच आहे. तुमच्यासारखंच राहतं. मी आणि माझं कुटुंब तुमच्याप्रमाणे या सिस्टीममध्ये जगण्याचा प्रयत्न करत आहोत."
 
मफलर गुंडाळून खोकत असणाऱ्या केजरीवाल यांचं 'मफलरमॅन' रूप याच काळातलं. डोक्याभोवती मफलर गुंडाळलेले केजरीवाल दिल्लीत जागा मिळेल तिथे सभा घेत.
 
दिल्लीत झालेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान केजरीवाल यांनी दिल्लीच्या जनतेकडे पूर्ण बहुमत मागितलं आणि लोकांनी त्यांना ऐतिहासिक विजय मिळवून दिला.
 
70 पैकी 67 जागा जिंकत केजरीवाल यांनी 14 फेब्रुवारी 2015ला पुन्हा एकदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
 
यावेळी त्यांच्याकडे गरजेपेक्षा जास्त बहुमत होतं. आश्वासनं पूर्ण करण्यासाठी आख्खी पाच वर्षं होती. जे जनलोकपाल विधेयक आणण्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं, ते येऊ शकलं नाही.
 
पाच वर्षांच्या काळात त्यांनी दिल्लीच्या आरोग्य, शिक्षण आणि इतर सार्वजनिक सेवांवर काम केलं. केंद्र सरकार साथ देत नसल्याचे आरोप ते मध्येमध्ये करत राहिले.
 
मोफत वीज - पाण्यासारख्या लोकांना खुश करणाऱ्या योजना त्यांनी अंमलात आणल्या. पुन्हा पुन्हा त्यांनी स्वतःलाच प्रामाणिकपणाचं प्रशस्तीपत्रक दिलं.
 
पण या सगळ्यामध्ये भ्रष्टाचार आणि जनलोकपालचा मुद्दा कुठेतरी हरवला. दिल्लीतला भ्रष्टाचार किती कमी झाला हे दिल्लीतल्या लोकांना माहीत आहे. आणि जनलोकपालचं तर नावंही बहुतेकांच्या लक्षात नाही.
 
आपण राजकारणात येणार नाही असं म्हणणारे केजरीवाल आता तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होत आहेत. आपण 'आम आदमी'सारखे राहू, लाल दिवा वापरणार नाही, असं त्यांनी म्हटलं होतं. आता ते दिल्लीतल्या अलिशान मुख्यमंत्री निवासात राहतात. वॅगन आरची जागा लक्झरी कारने घेतली आहे.
 
या पक्षात हाय कमांड नसेल असं सांगत केजरीवाल यांनी ज्या पक्षाची स्थापना केली होती, त्याच पक्षाचे आता ते एकमेव हाय कमांड आहेत. पक्षात त्यांच्या बरोबरीचे असू शकणारे नेते एक-एक करून सोडून गेले.
 
केजरीवाल आता 51 वर्षांचे आहेत. देशाच्या राजकारणात मोठी उडी घेण्यासाठी आता त्यांच्याकडे अनुभवही आहे आणि भरपूर कालावधीही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती