अनिल देशमुखः पालघर मॉब लिचिंगची घटना अफवा पसरवल्यामुळेच झाल्याचा सीआयडीचा निष्कर्ष

गुरूवार, 16 जुलै 2020 (16:19 IST)
पालघरमधल्या गडचिंचले या दुर्गम गावात चोर समजून तीन जणांना ठेचून मारल्याची 16 एप्रिल रोजी घडली होती. घटनेच्या दोन दिवसांनंतर बाहेर आलेल्या काही व्हीडिओंमुळे आता राजकीय वाद झाला होता. या घटनेची चौकशी सीआयडीकडे दिली होती. सीआयडीने त्याची चार्जशिट दाखल केली आहे. ही घटना अफवा पसरल्यामुळे झाली असा निष्कर्ष त्यामध्ये सीआयडीमे काढल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
 
या चौकशीसाठी सीआयटीने 808 जणांना ताब्यत घेतलं होतं. तर अनेकांना अटक झाली होती.
 
भाजप नेत्यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका करण्यास सुरुवात केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी थेट जनतेशी संवाद साधत यावर भूमिका मांडली.
 
"पालघरमधील घटना गैरसमजुतीतून झालीय. या घटनेत कुठलाही धर्माचा मुद्दा नाहीय, त्यामुळं कुणीही द्वेष पसरवू नये," असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
 
या घटनेतील सर्व आरोपींना अटक करण्यात आली असून, पोलीस कोठडीही देण्यात आली होती.
 
या प्रकरणी दोन पोलिसांना निलंबित करण्यात आलं आहे. हे प्रकरण सीआयडी क्राईम ब्रँचकडे देण्यात आलंय. पोलीस अधिकारी अतुल कुलकर्णी या शोध पथकाचं नेतृत्त्व करत आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिली आहे.
 
पालघर घटनेबद्दल उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
 
पालघर घटनेत मृत्युमुखी पडलेले जे दोन साधू होते, ते या दुर्गम भागातून जात होते. गैरसमजुतीने त्यांची हत्या झाली.
गडचिंचले या दुर्गम पाड्यात तिघांची हत्या, यामध्ये धार्मिक कारण नाही मॉब लिंचिंग घडलं ते गाव पालघरपासून 110 किमी अंतरावर आहे. दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाच्या सीमेजवळ हा प्रकार घडला. दोन साधू गुजरातला या दुर्गम भागातून जात होते. गैरसमजुतीने त्यांची हत्या झाली .
पालघर हिंसाचार प्रकरणात 110 आरोपींना अटक करण्यात आलीय. त्यातील 9 जण अल्पवयीन आहेत.या प्रकरणाची चौकशी राज्य गुन्हे अन्वेषण विभाग (सीआयडी) कडे सोपवण्यात आली आहे.
पोलीस महानिरीक्षक, कोकण यांना पोलिस कारवाईच्या चौकशीचे निर्देश दिले आहेत. तसंच, दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन झाले आहे.
या प्रकरणातील सर्व आरोपी तुरुंगात आहेत, 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडीही सुनावणी आलीय.
जे लोक या प्रकरणात आग लावण्याचा प्रयत्न करतायत, त्यांनी तसं करू नये, या प्रकरणात मी जात-पात-धर्म पाहत नाहीय.
आरोपींना शिक्षा केल्याशिवाय सरकार गप्प बसणार नाही. उगाच आदळआपट करण्याचं कारण नाही. हा हिंदू-मुस्लीम मुद्दा नाही. गैरसमजतीतून घडलेला प्रश्न आहे.
पालघरमधील घटना धार्मिक अंगानं झालेला नाहीय, गैरसमजातून हा हल्ला झालाय
 
ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता - काँग्रेस
"पालघरमधील हिंसाचाराची घटना घडलेल्या गडचिंचले या गावातील ग्रामपंचायतीवर गेली 10 वर्षं भाजपची सत्ता आहे. चित्रा चौधरी या भाजपच्या सरपंच आहेत. अटक झालेल्या आरोपींमध्येही बहुसंख्या भाजपचे सदस्य आहेत," असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विटरवरून केलाय.
पालघरच्या दुर्दैवी घटनेवरून भाजपला धार्मिक राजकारण करण्याचा प्रयत्न करताना भाजपला लाज वाटली पाहिजे, अशी टीकाही सावंत यांनी केलीय.
गुरुवारी घडलेल्या या घटनेचा व्हीडिओ रविवारी सोशल मीडियावर आल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे.
 
"पोलिसांच्या समोर जमाव लोकांना ठेचून मारतो, पोलिसांच्या हातातील साधनं हिसकावून घेऊन मारतो, ही सगळ्यांत मोठी लाजीरवाणी बाब आहे. महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे," असं ते म्हणाले.
 
दरम्यान, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. एका ट्वीटमध्ये त्यांनी असं सांगत इशाराही दिला की "कुणीही या घटनेचं विवाद करुन सामाजिक/जातीय तेढ निर्माण करत नाही यावरही सरकार लक्ष ठेऊन आहे."
 
तसंच त्यांनी हेही स्पष्ट केलं की "हल्ला करणारे व ज्यांच्यावर हल्ला झाला, यापैकी कुणीही वेगळे धर्मीय नाहीत. उगाचच समाजात/ समाज माध्यमांतून धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्यांवर पोलिस आणि सायबर पोलिसांना कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत."
 
पालघरमध्ये झालं काय?
PTIच्या वृत्तानुसार, लॉकडाऊनमध्ये कांदिवलीहून तिघेजण गुजरातमधल्या सुरतला जायला निघाले होते. मात्र चारोटी इथं त्यांना रोखण्यात आलं, त्यामुळे त्यांनी विक्रमगड-दाभाडी-खानवेलमार्गे जाण्याचा प्रयत्न केला.
 
परंतु पालघर जिल्ह्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गडचिंचले गावाजवळ एका जमावाने साडेनऊच्या सुमारास त्यांची गाडी अडवली. ही माणसं चोर असल्याचा संशय जमावाला होता. त्यामुळे जमावाने त्यांना मारहाण करायला सुरुवात केली.
 
पण, ही तिन्ही माणसं एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारात सहभाग घण्यासाठी सूरतला जात होते. तिन्ही पीडितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये 70 आणि 35 वर्षांचे दोन साधू, आणि 30 वर्षांच्या त्यांच्या ड्रायव्हरचा समावेश आहे.
 
याप्रकरणी 110 जणांना अटक केली असून त्यात 9 अल्पवयीनांचा समावेश आहे, असं पालघर पोलिसांनीही ट्वीट केलंय. "या 101 जणांना 30 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्यात येणार आहे. सध्या या प्ररकरणाची चौकशी सुरू आहे."
 
पालघरचे जिल्हाधिकारी कैलाश शिंदे यांनी शनिवारी ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं होतं की, "ही घटना अफवा आणि भीतीमुळे घडली. राज्यात लॉकडाऊन असताना चोर, दरोडेखोर आणि मूत्रपिंड काढण्यासाठी वेशांतर करून येत असल्याची अफवा पसरली होती. त्यातून हा प्रकार घडला."
 
अशाच प्रकारच्या अफवेमुळे जुलै 2018 मध्ये धुळ्यात पाच जणांची ठेचून हत्या करण्यात आली होती. आणि फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर आसाममध्येसुद्धा फिरायला गेलेल्या दोन संगीतकारांवर अशाच प्रकारचा हल्ला झाला होता. त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.
 
'लॉकडाऊनमध्ये लोक एकत्र कसे आले?'
गुरुवारी घडलेल्या या घटनेचा व्हीडिओ रविवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यात घटनास्थळी एक पोलीस अधिकारी उपस्थित असल्याचं दिसून येतंय.
 
अखिल भारतीय आखाडा परिषदेनं या घटनेवर टीका करत रविवारी म्हटलं की, जुना आखाड्याशी संबंधित दोन साधूंचा खून करण्यात आला आहे. याप्रकरणी आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी.
 
"यावेळी देशात कलम–144 लागू असताना इतक्या मोठ्या प्रमाणात लोक एकत्र कसे आले," असा प्रश्न जूना आखाड्याचे प्रवक्ते महंत नारायण गिरी यांनी उपस्थित केला आहे.
 
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्वीट करत म्हटलंय की, "महाराष्ट्रात दोन साधू आणि त्यांच्या एका ड्रायव्हरची लिंचिंग करून त्यांना मारून टाकण्यात आलं आहे. गुरुवारी ही घटना घडली आहे, पण आजपर्यंत सगळे उदारमतवादी चूप बसले आहेत. यापैकी कुणीच लोकशाही किंवा घटनेचा उल्लेख करत नाहीये."
 
यापद्धतीच्या गुन्ह्यांना महाराष्ट्र सरकार खपवून घेणार नाही, असं ट्वीट शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
 
त्यांनी लिहिलंय की, "पालघरमधील घटनेवर मुख्यमंत्र्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं आहे. साधूंवर हल्ला झाला त्याप्रकरणी आरोपींना आधीच अटक करण्यात आली आहे आणि त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली जाईल, असं मी राजकीय पक्षांना सांगू इच्छितो."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती