नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूनंतर संतांमध्ये रोष, काय आहे प्रकरण?
मंगळवार, 21 सप्टेंबर 2021 (20:38 IST)
अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष आणि निरंजनी आखाड्याचे सचिव महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणात आणखी काही जणांना ताब्यात घेतलं आहे. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. सोमवारी (20 सप्टेंबर) रात्री उशिरा पोलिसांनी आनंद गिरी यांच्या चौकशीला सुरुवात केली.
प्रयागराजच्या जॉर्जटाउन पोलीस स्टेशनमधील बागंबरी मठाशी संलग्न असलेल्या मोठ्या हनुमान मंदिराचे प्रशासक आणि नरेंद्र गिरी यांचे आणखी एक शिष्य अमर गिरी यांनी आनंद गिरी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
एफआयआरमध्ये आनंद गिरी यांच्या नावाचा उल्लेख असून त्यांच्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नरेंद्र गिरी मानसिक तणावाखाली होते असा आरोप करण्यात आला आहे. तसंच यामुळेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप अमर गिरी यांनी केलाय. तर पोलिसांनी हत्या असल्याची शक्यताही नाकारली नाही.
आनंद गिरी यांच्याव्यतिरिक्त मोठ्या हनुमान मंदिराचे मुख्य पुजारी आद्या तिवारी आणि त्यांचा मुलगा संदीप तिवारी यांनाही पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. महंत नरेंद्र गिरी यांच्या कथित स्युसाईड नोटमध्येही या दोघांच्या नावाचा उल्लेख आहे.
योगी आदित्यनाथ काय म्हणाले?
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ महंत नरेंद्र गिरी यांच्या अंतिम दर्शनासाठी प्रयागराज येथे आले होते. नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूचं रहस्य लवकरच समोर येईल आणि दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असं आश्वासन योगींनी यावेळी दिलं.
पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, "नरेंद्र गिरी यांच्या मृत्यूच्या प्रकरणात अनेक पुरावे गोळा करण्यात आले असून अनेक वरिष्ठ अधिकारी यावर काम करत आहेत. प्रत्येक घटनेचा उलगडा होईल. तपास यंत्रणांनी नि:पक्षपणे काम सुरू ठेवावं. जो कोणी जबाबदार असेल त्याला कायद्यानुसार शिक्षा दिली जाईल."
या घटनेच्या तपासासाठी चार वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचं पथक तैनात करण्यात आलं आहे. यात प्रयागराजचे अतिरिक्त पोलीस संचालक प्रेमप्रकाश, पोलीस महानिरीक्षक केपी सिंग आणि श्रेष्ठ त्रिपाठी यांचा समावेश आहे, असंही यूपीच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
आखाडा परिषद सदस्यांचं मत लक्षात घेऊन नरेंद्र गिरी यांचं पार्थिव आज (21 सप्टेंबर) अंतिम दर्शनासाठी बागंबरी पीठात ठेवण्यात आलं आहे. त्यांच्या मृतदेहाचं शवविच्छेदन 22 सप्टेंबरला होणार असून त्यानंतर संतपरंपरेनुसार त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
'आत्महत्येवर विश्वास नाही'
महंत नरेंद्र गिरी यांच्या शेवटच्या दर्शनासाठी प्रयागराजयेथील बागंबरी मठात लोकांची गर्दी दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि कॅबिनेट मंत्री ब्रजेश पाठक यांच्यासह प्रयागराजबाहेरील राजकीय पक्षांचे आणि संत आदरांजली वाहण्यासाठी येत आहेत.
बीबीसीशी बोलताना जुना आखाडाचे प्रमुख महंत हरीजी महाराज म्हणाले, "संत समाजासाठी ही अत्यंत दुःखद घटना आहे. त्यांचा मृत्यू नेमका कसा झाला याचा तपास आवश्यक आहे. आम्हाला त्यांनी आत्महत्या केली यावर विश्वास नाही."
तपासाची मागणी
नरेंद्र गिरी यांच्या कथित स्यूसाईड नोटवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. नरेंद्र गिरी स्वत: कधीही काही लिहित नसत, ते कायम आपल्या शिष्यांकडून किंवा सेवकांकडून लिहून घेत असत असं बागंबरी मठातील आखाडा परिषदचे सेवक आणि त्यांच्या शिष्यांचं म्हणणं आहे.
नाव न सांगण्याच्या अटीवर त्यांच्या एका शिष्याने बीबीसीला सांगितले की, सात-आठ पानांची सुसाईड नोट लिहिण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, याचाही तपास गरजेचा आहे.
महंत नरेंद्र गिरी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रयागराज येथे पोहोचलेले उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव मौर्य यांनीही या आत्महत्येबाबत शंका उपस्थित केली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "आत्महत्या केली असेल यावर विश्वास बसत नाही. या प्रकरणाचे सर्व पैलू तपासले जातील. गरज भासल्यास सीबीआय या प्रकरणाची चौकशी करेल. सरकार सर्व प्रकारे तयार आहे."