अजित पवार यांना सिंचन गैरव्यवहारप्रकरणी क्लीन चिट?

सोमवार, 25 नोव्हेंबर 2019 (18:16 IST)
सिंचन गैरव्यवहाराशी संबंधित 9 फाईल्स लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं बंद केल्याचं वृत्त विविध माध्यमांनी प्रसिद्ध केलं आहे. त्याचं नोटीफिकेशनही सध्य व्हायरल झालं आहे.
 
विदर्भातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यांमधल्या 9 प्रकरणांच्या फाईल्स बंद केल्याचं सांगण्यात आलं आहे. यापैकी काही फाईल्स या दोन दिवसांपूर्वी शपथ घेणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित असल्याचं वृत्तही देण्यात आल्याने राजकारण लगेचच सुरू झालं.
 
पण बीबीसीशी बोलताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक परमबीर सिंग यांनी हे वृत्त फेटाळलं आहे.
 
"या बंद करण्यात आलेल्या फाईल्सचा अजित पवार यांच्याशी कुठलाही संबंध नाही, तसंच 28 नोव्हेंबरला यासंबंधी कोर्टात सुनावणी आहे. त्यामुळे काही फाईल्स बंद करण्यात आल्या आहेत. आमच्याकडे 3000 टेंडर्सच्या फाईल्स आहेत. त्यापैकी ज्या केसमध्ये काही आढळत नाही, त्या बंद करतो. हे वेळोवेळी सुरू असतं," असं त्यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं आहे.
 
दरम्यान, अजित पवार यांना सिंचन घोटाळ्याप्रकरणी कुठलीही क्लीनचिट दिली नाही, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे, असं भाजप नेते रावाहेब दानवे यांनी स्पष्ट केलं आहे.
 
तर काँग्रेसनं मात्र या निर्णयावर टीका केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती