अजित पवार - देवेंद्र फडणवीस एकाच दिवशी वाढदिवस असलेल्या नेत्यांमधलं नातं नेमकं कसं आहे?
बुधवार, 22 जुलै 2020 (10:40 IST)
नीलेश धोत्रे
महाराष्ट्राच्या राजकारणात दोन प्रतिस्पर्धी नेत्यांचे एकाच दिवशी वाढदिवस असण्याचा योगायोग तसा नवा नाही. राज्याच्या राजकारणातील 2 मोठी नावं शरद पवार आणि गोपिनाथ मुंडे यांचा वाढदिवस एकाच दिवशी म्हणजेच 12 डिसेंबरला येतो. योगायोगाने देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचाही वाढदिवस एकाच दिवशी म्हणजे 22 जुलै रोजी येतो.
शरद पवार आणि गोपिनाथ मुंडे हे एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी होते, गोपिनाथ मुंडे हे अनेकदा शरद पवार यांच्यावर जहरी टीका करायचे. त्यांच्यातल्या या राजकीय स्पर्धेचं रूपांतर काहीअंशी वैरामध्ये झालेलंसुद्धा दिसून आलं आहे.
पण अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात राजकीय स्पर्धा आहे का? की दोघांमध्ये राजकीय वैर आहे की मैत्री? की पहाटेच्या शपथविधीनंतर दोघांचं नातं its complicated पर्यंत आलंय?
या दोन्ही नेत्यांच्या एकाच दिवशी आलेल्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या 'रिलेशनशीपच्या स्टेटस'चा घेतलेला हा आढावा. तसं या या दोन्ही नेत्यांमध्ये अनेक साम्य आणि विरोधाभास दोन्ही आहे या विषयी अधिक तुम्ही इथं वाचू शकता - देवेंद्र फडणवीस-अजित पवारः जन्मतारीख एकच, वेगवेगळ्या विचारसरणी आणि एक सरकार
पण या दोन्ही नेत्यांच्या नात्यात काही महत्त्वाचे टप्पे आले, जेव्हा ते एकमेकांच्या समोरासमोर उभे ठाकले गेले, कधी एकमेकांना साथ दिली तर कधी एकमेकांपासून दूर गेले.
पहिला टप्पा - सिंगल
अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या वयात साधारण 10 वर्षांचा फरक आहे. अजित पवार यांनी 1991 ला राजकारणात प्रवेश केला. सुरुवातीला ते बारामतीचे खासदार म्हणून निवडून आले. पण त्याचवेळी केंद्रात संरक्षण मंत्री झालेल्या काका शरद पवार यांच्यासाठी त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि बारामती विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवून ते आमदार झाले. देवेंद्र फडणवीस त्याच दरम्यान म्हणजे 1992 मध्ये कायद्याची डिग्री घेऊन कॉलेजातून बाहेर पडले होते. त्याचवर्षी ते नागपूरमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आले. पुढे ते नागपूरचे महापौरही झाले.
एकअर्थी थोड्याबहुत फरकानं दोघांची राजकाणातली एन्ट्री एकाच कालावधीमध्ये झाली.
"तेव्हा अजितदादांना शरद पवार याचं पाठबळ लाभलं, देवेंद्र फडणवीसांना तसं कुणाचं पाठबळ लाभलं नाही. असं असलं तरी अजित पवार यांनी त्यांच्या कामाचा ठसा उमटवला आहे त्यामुळे त्यांच्यावर नेपोटिझमचा आरोप करता येणार नाही,"असं नागपूरस्थित ज्येष्ठ पत्रकार गजानन जानभोर सांगतात.
तसंच दोन्ही नेत्यांच्या स्वभावात फरक आहे पण त्यांच्या कामाचा उरक मात्र भरपूर आहे, असं जानभोर यांना वाटतं.
दुसरा टप्पा - डेटिंग
1999 पासून खऱ्या अर्थानं अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा संबंध यायला सुरुवात झाली. 1999मध्ये देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. तोपर्यंत राज्यमंत्रिपदाचा अनुभव असलेल्या अजित पवारांना पहिल्यांदा सत्तेत आलेल्या आघाडी सरकारमध्ये कॅबिनेट मंत्रिपद मिळालं आणि त्यांच्याकडे जलसंपदा खात्याचा कारभार आला.
अल्पावधीतच देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यासू, तरुण आणि तडफदार आमदार म्हणून नावलौकिक कमावला. विधानसभेतली वेगवेगळी आयुधं वापरून सरकारला धारेवर धरणारे विरोधीपक्षातले एक महत्त्वाचे नेते म्हणून ते उदयाला यायला लागले.
अर्थसंकल्पावरील सोप्या आणि सुटसुटीत मांडणीमुळे देवेंद्र फडणवीसांनी सत्ताधाऱ्यांच्या मनातसुद्धा मानाचं स्थान मिळवलं.
त्याच दरम्यान अजित पवार काही काळ राज्याचे अर्थमंत्री होते. अर्थसंकल्पानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणांसाठी ते कायम आवर्जून उपस्थित राहत.
अर्थसंकल्पाच्या मुद्द्यावर राज्याच्या हितासाठी अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलं ट्युनिंग होतं, असं राजकीय निरिक्षक आणि अभ्यासक संजय मिस्किन सांगतात.
"त्यावेळी विदर्भ आणि मराठवाड्याच्या अनुशेषाच्या मुद्द्यावरून फडणवीस हे अजितदादांना टार्गेट करायचे, पण अजित पवारांनी त्या आरोपांना कधीही व्यक्तिगत पातळीवर घेतलं नाही, राज्यपालांच्या निकषांचा खुलासा करून ते उत्तर द्यायचे. त्यांचं सभागृहातलं रिलेशन चांगलं होतं," अशी आठवण मिस्किन सांगतात.
अजित पवार हे देवेंद्र फडणवीस यांना कायमच गांभिर्यानं घेत असत असं '36 डेज ए पॉलिटिकल क्रॉनिकल ऑफ अॅम्बिशन, डिसेप्शन, ट्रस्ट ऍन्ड बिट्रेयल' या पुस्तकाचे लेखक पत्रकार कमलेश सुतार सांगतात.
ते सांगतात, "राजकारणात तुम्हाला कायमच विरोधीपक्षात एक चांगला मित्र लागतो. विलासराव आणि गोपीनाथ मुंडे यांची मैत्री सर्वांना माहिती आहे. दोघांमध्ये चांगलं पॉलिटिकल अंडरस्टॅडिंग होतं. तसंच राजकीय अंडरस्टॅडिंग अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातही होतं. अजित पवार विरोधीपक्षातल्या नेत्यांना किंवा नव्या आमदारांना फारसे गांभिर्यानं घेण्यासाठी ओळखले जात नाहीत. पण ते देवेंद्र फडणवीस यांना मात्र गांभिर्यानं घेत."
पुढे 2012 मध्ये अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याविरोधात आघाडी उघडली. त्यानंतर 2013ला भाजपचं प्रदेशाध्यक्षपद मिळालेल्या फडणवीसांनी राज्यभर दौरे सुरू केले. अजित पवार यांच्याविरोधात आपल्याकडे बैलगाडीभर पुरावे असल्याचा दावाही त्यांनी त्यावेळी केला होता. सत्तेत आलो तर अजित पवार तुरुंगात जातील असं भाजपच्या नेत्यांनी म्हणायला सुरुवात केली.
"सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून सर्व पक्षांकडून त्यावेळी अजित पवार यांच्यावर एकमुखी टीका होत होती. श्वेतपत्रिका आणि या संदर्भातले सर्व पुरावे आणि माहिती पटलावर मांडल्यानंतरही अजित पवार यांच्यावर आरोप होत होते. सर्व माहिती समोर मांडूनही राजकीय आरोप थांबत नसल्याने अजित पवार यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिली. तेव्हा मात्र त्यांच्यात राजकीय दुरावा निर्माण झाला होता," असं संजय मिस्किन सांगतात.
पण अजित पवार यांच्या राजीनाम्यामुळे मात्र भाजपची आक्रमकता यशस्वी ठरली होती. ज्याचा त्यांना येणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये फायदा होणार होता.
तिसरा टप्पा - इन-अ-रिलेशनशिप
आघाडी सरकारवर झालेले वेगवेगळ्या भ्रष्टाचाराचे आरोप आणि त्यानंतर 2014ला आलेल्या भाजपच्या लाटेत महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या. 2 दशकांपेक्षा जास्त कालावधीनंतर पहिल्यांदा स्वबळावर निवडणूक लढवलेल्या भाजपला या निवडणुकीत चांगलं यश आलं.
122 आमदारांच्या जोरावर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. आतापर्यंत सलग तीन टर्म सत्तेत राहिलेले अजित पवार आता विरोधी पक्षाचे आवाज झाले होते. सरकारच्या चुका आणि धोरणांवर अजित पवार यांनी टीकाटिप्पणी केली.
'सत्तेत आल्यानंतर सिंचन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून अजित पवार यांना अटक करू,' या भाजपच्या घोषणेचं पुढे काहीच झालं नाही.
"2014 च्या आधी सिंचनाच्या मुद्द्यावरून जे राकारण झालं ते 2014 ते 2019 च्या दरम्यान दिसलं नाही. विरोधीपक्षातल्या आमदारांनी सुद्धा आता तुमच्याकडे सत्ता आहे, याची चौकशी करा अशी मागणी भाजपकडे केली. पण भाजपचं टोकाचं आक्रमण फारसं दिसलं नाही," असं संजय मिस्किन सांगता.
देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या सत्तेच्या काळात अजित पवार यांना सांभाळून घेतल्याचं दिसून आलं. याबाबत कमलेश सुतार सांगतात,
"अजित पवार यांना चौकशीच्या नोटिसा गेल्या पण त्यांच्या चौकशीची फारशी चर्चा झाली नाही, त्यांची चौकशी कधी व्हायची हे मीडियालासुद्धा फारसं कळायचं नाही. शिवाय भुजबळांच्या चौकशीमुळे अजित पवारांच्या चौकशीचं प्रकरण एक प्रकारे दुर्लक्षित राहिलं. त्यात फडणवीससुद्धा अजित पवारांच्या चौकशीबद्दल फारसे बोलताना दिसले नाहीत. एकप्रकारे अजित पवार यांना फडणवीसांच्या काळात फारसा त्रास झाला नाही असं बोलायला वाव आहे."
शिवाय धनंजय मुंडे हे दोन्ही नेत्यांमध्ये दुआ आहेत, त्यांचाही अजित पवार यांना फायदा झाला, असं सुतार यांना वाटतं.
चौथा टप्पा - एंगेज्ड
आतापर्यंत कायम एकमेकांच्या विरोधात राजकारण करणारे एकमेकांवर टीकाटिप्पणी करणार हे दोन्ही नेते अचानक एकत्र आले. नुसते एकत्र आले नाही तर सर्वांच्या नकळत पहाटेच्या वेळेत राजभवनावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथही घेतली.
22 ते 27 नोव्हेंबर 2019 या दरम्यानचे 80 तास महाराष्ट्राच्या राजकारणात अत्यंत वेगळं आणि राजकीय भूकंप आणणारं ठरलं. त्या 80 तासांमध्ये नेमकं कसं राजकीय नाट्य घडलं होतं ते तुम्ही इथं वाचू शकता. देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांनी आपली साथ सोडल्याचं कधी लक्षात आलं?
त्या 80 तासांनी दोन्ही नेत्यांच्या राजकारणाला मोठं वळण दिलं. इथून पुढे दोन्ही नेत्यांच्या राजकारणाकडे पाहाण्यासाठी किंवा त्याचा अर्थ लावण्यासाठी त्या 80 तासांचा मपदंड म्हणून उपयोग केला जात आहे.
पाचवा टप्पा - इट्स कॉम्प्लिकेटेड
त्या 80 तासांच्या घटनेनंतर अजित पवार पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाले तर देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा विरोधी पक्षनेते झाले. गेल्या सहा-सात महिन्यांमध्ये ते अनेकवेळा एकमेकांच्या समोरासमोर आलेत.
पण या फसलेल्या प्रयोगानंतर दोन्ही नेत्यांना आवघडल्या सारखं वाटलं. नंतर देवेंद्र फडणवीसांनी तर तो निर्णय चुकला होता असं सुद्धा म्हटलं.
"आज मागे वळून पाहिलं तर मला वाटतं की तो निर्णय चुकला होता, पण त्यावेळी मी कनव्हिन्स होतो," असं पहाटे शपथ घेतलेल्या सरकारबाबत बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी राजू परुळेकर यांना दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे.
ते म्हणाले "आज मी मागे वळून पाहातो तेव्हा नसतं केलं तरी चाललं असतं, असं आज वाटतं. पण त्या क्षणी नाही वाटलं. याकरिता नाही वाटलं की ज्यावेळी तुमच्याशी सगळे धोका करत आहेत. तुमच्या पाठित प्रत्येकजण खंजीर खूपसतोय त्यावेळी जगावं लगतं राजकारणात. राजकारणात मरून चालत नाही. आणि मग अशा स्थितीमध्ये या महाराष्ट्राचा इतिहास आहे की कधीतरी गनिमी कावा करावा लागतो. आपल्या मनाविरुद्ध जाऊन करावा लागतो. म्हणून तो आमचा गनिमीकावा होता. म्हणून रात्री ठरलं सकाळी केलं."
एकिकडे फडणवीसांनी हे मान्य केलं तर अजित पवारांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानसभेत एका भाषणादरम्यान त्यांच्या या कृतीवर स्पष्टीकरण दिलं.
विषय होता ज्योतिरादित्य शिंदे यांचा. अजित पवार यांचं भाषण सुरू असताना सुधीर मुनगंटीवार यांनी पलिकडच्या बाकांवरून 'राज्यातही कुणीतरी ज्योतिरादित्य शिंदे निर्माण होईलच' असं वक्तव्य केलं. हाच धाका पकडून अजित पवार यांनी संधी साधली आणि स्पष्टीकरण देऊन टाकलं.
ते म्हणाले "इकडे (महाविकास आघाडी) तर कुणी ज्योतिरादित्य सिंधिया होणार नाही, तिकडंच कुणीतरी होईल तेवढं लक्षात ठेवा. कारण काही काही गैरहजर आहेत जरा त्यांच्यावर लक्ष ठेवा.
जे केलं ते मान्यच आहे, मी लपूनछपून करत नाही समोर करतो. आणि तिथंही (पहाटेचं सरकार) केलं नंतर तिथंही सोडलं आणि इकडं(महाविकास आघाडी) आलो इथंही मजबूत बसलेलो आहे."
पण मग आता अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातलं नातं नेमकं काय आहे. दोन्ही नेते एकमेकांपासून दुरावले आहेत का? तर त्याचं उत्तर एका घटानेच्या आधारे सध्या तरी 'नाही' असं देता येऊ शकतं. ती घटना आहे राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यातली. यावेळी अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी करत फडणवीसांचं कौतुकही केलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात नेत्यांमध्ये व्यक्तिगत पातळीवर संबंध असणं नवं नाही, या दोन नेत्यांमध्येसुद्धा ते आहेत, म्हणून पुढच्या काळात ते पुन्हा राजकीय कारणांसाठी एकत्र येतील अशी शक्यता नाही, असं राजकीय विश्लेषक संजय मिस्किन यांना वाटतं.
'पुन्हा एकत्र येतील पण...'
राजकारणात कधी काय घडू शकतं हे आपण सांगू शकत नाही, पण शरद पवार राजकारणात सक्रिय असेपर्यंत दोघं एकत्र येण्याची शक्यता कमी आहे, असं ज्येष्ठ पत्रकार गजानन जानभोर यांना वाटतं.
"भविष्यातला संवादाचा प्रवाह खुला ठेवण्याचा प्रयत्न दोन्ही नेत्यांकडून होताना दिसतो. दोघांमध्ये आतून अंडरस्टँडिंग आहे असं मला वाटतं. दोन्ही नेते एकमेकांवर टीका करताना दिसत नाहीत. पण दोन्ही नेत्यांचा स्वभाव आक्रमक आहे, दोघांना स्वंतंत्र निर्णय घेण्याची सवय आहे, त्यामुळे ते पुन्हा एकत्र जरी आले तरी दोघांमध्ये वाद निर्माण होण्याची शक्यता मला जास्त वाटते," असं जानभोर यांना वाटतं.
एकत्र येणं अजित पवारांसाठी धोक्याची घंटा?
पण भविष्यातलं हे एकत्र येण्याचं संभाव्य राजकारण अजित पवार यांच्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकतं असं महाराष्ट्राच्या राजकारणाचा अभ्यास करणारे प्राध्यापक प्रकाश पवार यांना वाटतं.
"देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्रातल्या मराठा घराण्यांचं संघटन करत आहेत तर अजित पवार ओबीसी नेत्यांचं संघटन करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे ते मराठा ग्राउंडवर फडणवीसांकडून क्लिन बोल्ड होऊ शकतात. पण त्याचवेळी ते ओबीसी ग्राउंडवर चागलं खेळू शकतील. सध्याच्या घडीला देवेंद्र फडणवीसांसाठी मराठा ग्राउंड पॉझिटिव्ह आहे. दोन्ही नेत्यांच्या भविष्यातल्या राजकारणाकडे या नजरेतूही पाहाणं गरजेचं आहे," असं प्रकाश पवार सांगतात.
पवार पुढे सांगतात, "शरद पवार यांच्याविरोधात बंड केल्यानंतर अजित पवार यांच्या ताकदीला आता मर्यादा आहेत. पक्षात ते एकटे पडलेत. त्या तुलनेत फडणवीसांची ताकद मात्र मोकळी आणि खुली आहे. अशा स्थितीत दोन्ही नेत्यांच्या एकत्र येण्यामुळे आपलं राजकारण संपू शकेल हे जर अजित पवार यांच्या लक्षात आलं नाही तरच दोन्ही नेते एकत्र येतील आणि जर त्यांना हे समजलं तर ते एकत्र येणार नाहीत."
पण दोन्ही नेत्यांचं पुन्हा एकत्र येणं हे सध्या सुरू असलेल्या राजकारणावरसुद्धा बहुतांशी अवलंबून आहे, असं जानभोर यांना वाटतं.
त्यांच्या मते "शरद पवार यांचा त्यांच्या मुलीच्या राजकारणाकडे जास्त कल आहे, त्यामुळे दोन्ही नेत्यांच्या भविष्यातल्या एकत्र येण्याकडे त्या नजरेतूनही पाहिलं पाहिजे."
अशात नुकत्याच घडलेल्या पारनेर प्रकरणाच्या माध्यमातून शरद पवार यांनी अजित पवार यांना पक्षाच्याबाबत तुम्ही फार काही पाहायचं नाही असा थेट मेसेज दिल्याची चर्चा आहे.
तसंच राज्य सरकारमध्ये समन्वय राखण्याचं काम शरद पवार स्वतः करत आहेत, जे की अजित पवार यांच्याकडे देता येऊ शकतं. पक्षात अजित पवार यांना थोडं दाबलं जात असल्याची भावना अनेकांच्या मनात आहे, असं कमलेश सुतार यांना वाटतं.
ते सागंतात, "भाजप कच्च्या दुव्याच्या शोधात असते. मध्य प्रदेशात त्यांना तो ज्योतिरादित्य शिंदेच्या रुपात सापडला. राजस्थानात तो ते सचिन पायलट यांच्या रुपात शोधत आहेत. अजित पवार महाराष्ट्रात ट्राईड आणि टेस्टेड आहेत, त्यामुळे सर्वांच्याच त्यांच्याकडे नजरा आहेत."
पण मग हे रिलेशनशिप नेमकं आहे तरी कसं असा प्रश्न तरीही तुम्हाला पडला असेलचं.
तर कमलेश सुतार यांच्या शब्दात सांगायचं झालं तर "हे रिलेशनशिप टीन एजर्स सारखं आहे, ज्यात कधीकधी जोडीदार पुन्हा फिरून त्यांच्या जुन्या ट्राईड अॅंड टेस्टेड जोडिदाराकडेच येतो."