एअर इंडिया बिल्डिंग: मुंबईच्या मरीन ड्राईव्हची आयकॉनिक वास्तू महाराष्ट्र सरकारकडे जाणार?

मंगळवार, 14 मे 2019 (14:27 IST)
गेली अनेक दशकं मुंबईच्या मरीन ड्राइव्हवर दिमाखात उभ्या असलेल्या एअर इंडिया बिल्डिंगचा ताबा महाराष्ट्र सरकारकडे जाण्याची शक्यता आहे.
 
कर्जाच्या भाराने संकटात सापडलेल्या एअर इंडियाला ही इमारत विकण्याचा निर्णय घ्यावा लागला. 2013 साली कंपनीचं मुख्यालय दिल्लीला गेलं असलं तरी या इमारतीची ओळख 'एअर इंडिया बिल्डिंग' अशीच राहिली.
 
चार दशकांचा प्रवास
1974 साली नरिमन पॉइंटवर या इमारतीचं काम पूर्ण झालं. 23 मजल्यांच्या या इमारतीच्या प्रत्येक मजल्याचं क्षेत्रफळ सुमारे 10,800 चौरस फूट इतकं आहे. एअर इंडियाबरोबर अनेक कंपन्यांची कार्यालयं या इमारतीमध्ये होती.
 
समोर अरबी समुद्र, सतत धावणारा मरीन ड्राइव्ह आणि रात्रीच्या वेळेस चमचमणारा क्वीन्स नेकलेस, यामुळे इमारतीची एक वेगळी शान होती आणि आजही आहे.
 
एअर इंडियानं हळूहळू आपलं इथलं कामकाज कमी करत नेलं तरी या इमारतीचा आणि एअर इंडियाचा थेट संबंध अनेकदा येत राहिला.
 
2013 साली या इमारतीतलं एअर इंडिया कंपनीचं मुख्यालय दिल्लीला हलवण्यात आलं. आता कर्जाच्या ओझ्यामुळे ही इमारत विकण्यासाठी बोली लावण्यात आली.
 
यामध्ये जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्र्स्ट (JNPT) आणि आयुर्विमा महामंडळ (LIC) नेही ही इमारत घेण्यासाठी प्रयत्न केले. परंतु राज्य सरकारने सर्वाधिक म्हणजे 1,400 कोटी रुपयांची बोली लावण्यामुळे ही इमारत राज्य सरकारला मिळण्याची शक्यता अधिक आहे. या इमारतीचा ताबा राज्य सरकारकडे आल्यास अनेक सरकारी कार्यालयं इथं हलवण्यात येतील.
एअर इंडियाच्या जागेबद्दल सांगताना ज्येष्ठ पत्रकार रमेश झवर सांगतात, "वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना नरीमन पॉइंटचा भराव टाकण्यात आला. त्यावेळेस पहिले तीन प्लॉट्स एअर इंडिया, निर्मल बिल्डिंग, एक्स्प्रेस टॉवरला देण्यात आले.
 
"त्यातील निर्मल बिल्डिंगचं काम सर्वांत पहिले पूर्ण झालं. त्यानंतर एअर इंडिया आणि एक्स्प्रेस टॉवरची इमारत पूर्ण झाली. त्यावेळेस नरिमन पॉइंटचं काम खूप होतं. पण बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये कार्यालयं सुरू झाल्यावर या परिसरातील गर्दी थोडी कमी झाली."
 
बाळासाहेब ठाकरेंचा एअर इंडिया कार्यालयावर मोर्चा
एअर इंडिया आणि मुंबईकरांच्या आठवणींमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी काढलेल्या मोर्चाची एक महत्त्वाची आठवण आहे.
 
नोकरभरतीमध्ये मराठी माणसावर अन्याय होतो, असं सांगत शिवसेनेने एअर इंडिया, ओबेरॉय शेरेटन हॉटेल, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, फूड कार्पोरेशन मोर्चे काढायला सुरुवात केली होती. त्याकाळी या आस्थापनांचे प्रमुख अमराठी असायचे.
 
त्यापैकीच एअर इंडियाच्या मुख्यालयावर शिवसेनेने मोर्चा काढला होता. या मोर्चाचं नेतृत्व खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीच केलं होतं. या मोर्चात एअर इंडियाचे चीफ पर्सनेल ऑफिसर नंदा यांना मारहाण झाली.
 
शिवसेनेच्या इतिहासावर 'जय महाराष्ट्र, हा शिवसेना नावाचा इतिहास आहे' या पुस्तकाचे लेखक प्रकाश अकोलकर एअर इंडियावरील मोर्चाबाबत लिहितात, 'कोणाला अटक झाल्यास एअर इंडियाच्या बाहेर जमलेले शिवसैनिक चिडतील, असा इशारा ठाकरे यांनी मोर्चाच्या वेळी दिला होता.'
 
या मोर्चानंतर पोलिसांनी कोणतंही पाऊल उचललं नाही, असं सांगून हा मोर्चा शिवसेनेच्या इतिहासातील महत्त्वाचा टप्पा होता, असं अकोलकर लिहितात.
 
1993चा बॉम्बस्फोट
12 मार्च 1993 रोजी साखळी बॉम्बस्फोटांनी मुंबई हादरली. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी RDXचा वापर करून स्फोट घडवण्यात आले होते. त्यामध्ये एअर इंडीयाच्या इमारतीचाही समावेश होता.
 
अत्यंत वर्दळीच्या ठिकाणी आणि विविध कार्यालयांनी भरलेल्या इमारतीजवळ झालेल्या स्फोटामुळे नरिमन पॉईंटवर एकच गोंधळाचं वातावरण तयार झालं होतं. या इमारतीच्या स्फोटात 20 लोकांचे प्राण गेले होते.
 
या दिवशी स्फोटाचा आवाज ऐकल्यावर काही वेळातच तिथे पोहोचलेले प्रसिद्ध छायाचित्रकार सुधारक ओलवे यांनी बीबीसी मराठीकडे या प्रसंगाचं वर्णन केलं.
 
"जेव्हा स्फोटाचा हादरा बसला, तेव्हा आम्ही सगळे तिकडे पोहोचलो. एअर इंडिया इमारतीजवळ सगळी व्यवस्था बिघडून गेली होती. तिथले अनेक कर्मचारी जखमी झाले होते. जखमींची स्थिती पाहता येणार नाही, इतकी खराब झालेली होती. एअर इंडियाची ही इमारत सर्व फोटोग्राफर्सची आवडती इमारत होती. तिच्या वरच्या मजल्यांवर जाऊन संपूर्ण मरीन ड्राइव्हचा उत्तम फोटो काढता यायचे."
 
मुंबईतला पहिला एस्कलेटर
या इमारतीची रचना जागतिक ख्यातीचे स्थापत्यविशारद जॉन बर्गी यांच्या नेतृत्त्वाखाली झाली होती. नायग्रा फॉल्स कन्वेंन्शन सेंटर, ह्युस्टनमधील विल्यम्स टॉवर, मॅनहटनमधील सोनी बिल्डिंगची स्थापत्यरचना त्यांनी केली होती.
 
मुंबईत सर्वांत प्रथम एस्कलेटर (सरकते जिने) या इमारतीमध्ये लावण्यात आले, अशी माहिती नागरी इतिहासाचे अभ्यासक भरत गोठोसकर यांनी बीबीसी मराठीशी बोलताना दिली.
 
कलावस्तू, चित्रांचा खजिना
एकेकाळी सार्वजनिक क्षेत्रातील आस्थापने किंवा खासगी कंपन्याही चित्र, कलावस्तू विकत घेण्यासाठी विशेष निधी राखून ठेवत. एअर इंडियाने अशा वस्तू वर्ष 1956 पासून 2000 पर्यंत विकत घेतल्या.
 
बी. प्रभा यांची चित्रं सर्वात प्रथम एअर इंडियानं विकत घेतली. परदेशातील प्रवाशांना देण्यात येणाऱ्या मेन्यू कार्ड्सवर त्यांची छपाई करण्यात आली. त्यानंतर लंडनच्या बुकिंग ऑफिसच्या सजावटीसाठीही त्यांचा वापर करण्यात आला.
 
मारिया थॉमस यांनी क्वार्टझ इंडियासाठी लिहिलेल्या लेखामध्ये एअर इंडियाच्या या वैभवशाली संग्रहाबद्दल लिहिलं आहे. या संग्रहात व्ही. एस. गायतोंडे, एम.एफ हुसेन, के. एच. आरा, मारिओ मिरांडा यांचीही चित्र आहेत. त्याचप्रमाणे विविध कलावस्तूही एअर इंडियानं गोळा केल्याचं थॉमस लिहितात.
 
एअर इंडियाच्या कलावस्तूंच्या साठ्यामागे जे.आर.डी. टाटा यांचीच प्रेरणा होती, असं रमेश झवर सांगतात. "या इमारतीच्या प्रत्येक मजल्यावर अनेक प्रसिद्ध चित्रकारांची चित्रं त्यांनी लावली होती. तसंच जे.आर.डी. स्वतः चित्रं निवडायचे," असंही ते बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.
 
या सर्व वस्तूंची आज किंमत काही हजार कोटींमध्ये असावी. हा सर्व कलावस्तूंचा खजिना एअर इंडियाच्या इमारतीध्येच ठेवण्यात आला. गेल्या वर्षी हा सर्व कलावस्तूंचा खजिना भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडे सोपवण्याबाबत चर्चा सुरी झाली.
 
या वस्तू नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्टकडे ठेवली जावीत, अशी विनंती एअर इंडियानं मंत्रालयाकडे केली आहे.

ओंकार करंबेळकर

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती