कोरोना गोंधळ : अंत्यसंस्कार झाल्यानंतर हॉस्पिटलनं सांगितलं, 'तुमचा पेशंट जिवंत आहे '

मंगळवार, 2 जून 2020 (14:48 IST)
भार्गव परीख
गुजरातमधील अहमदाबाद शहरात रविवारी (31 मे) एक विचित्र घटना घडली. शहरातल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलेल्या एका रुग्णाच्या कुटुंबीयांना तुमच्या पेशंटचं कोरोना संसर्गामुळे निधन झालं असं सांगण्यात आलं.
 
त्याच्या दुसऱ्याच दिवशी कुटुंबीयांना हॉस्पिटलमधून फोन आला की, तुमच्या पेशंटची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे आणि त्यांची प्रकृती सुधारत आहे. त्यांना तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता.
 
या फोनमुळे रुग्णाच्या घरचे त्यांना आणण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचले. तिथे त्यांना सांगण्यात आलं की, तुमच्या पेशंटचं निधन झालं आहे.
 
निकोल परिसरात राहणाऱ्या 71 वर्षीय देवराम यांना श्वास घ्यायला त्रास जाणवू लागल्याने 28 मे रोजी अहमदाबाद शहरातल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. देवराम यांना डायबेटिसचा त्रास होता.
 
हॉस्पिटल प्रशासनाने देवराम यांचे जावई नीलेश निकते यांच्याकडून कन्सेंट लेटरवर स्वाक्षरी घेतली. उपचारादरम्यान रुग्णाची तब्येत ढासळली तर हॉस्पिटल प्रशासन जबाबदार राहणार नाही, अशा आशयाचं ते पत्र होतं.
 
"माझ्या सासऱ्यांना आम्ही हॉस्पिटलमध्ये भरती केलं. तिथे कोरोना रुग्णांवर उपचार सुरू होते. त्यावेळी सासऱ्यांची शुगर 575 पेक्षा अधिक होती. सामान्य पातळीपेक्षा हा आकडा जास्त आहे. हॉस्पिटलने कन्सेंट लेटरवर स्वाक्षरी घेण्यासाठी आग्रह केला. त्यावेळी मला सासऱ्यांना पाहायचं असं सांगितलं. नंतर हॉस्पिटलच्या स्टाफने व्हीडिओ कॉल केला. त्यावेळी ते ठीक वाटले. ते व्यवस्थित आहेत पाहिल्यावरच मी स्वाक्षरी केली," असं निकते यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं.
 
अंत्यसंस्कारानंतर म्हणाले, 'रुग्णाची स्थिती सुधारते आहे'
"व्हीडिओमध्ये सासऱ्यांना पाहिल्यानंतर मला बरं वाटलं. सासऱ्यांची तब्येत सुधारेल अशी आशा होती," असं नीलेश यांनी सांगितलं.
 
"हॉस्पिटलमधील औपचारिकता पूर्ण करून आम्ही घरी परतलो. दुसऱ्याच दिवशी आम्हाला फोन आला की कोरोनामुळे सासऱ्यांचं निधन झालं आहे. आम्ही सगळे घरचे हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. त्यावेळी निळ्या रंगाच्या पीपीई किटमधला एक मृतदेह सोपवण्यात आला. तोपर्यंत सासरे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचा रिपोर्ट आम्हाला देण्यात आला नव्हता. हॉस्पिटलच्या स्टाफने आम्हाला त्यांचे कपडे दाखवले त्यावेळी सासरे गेले यावर आमचा विश्वास बसला. त्यावेळी मी त्यांचा चेहरा पाहिला नव्हता. त्यानंतर आम्ही अंत्यसंस्काराच्या तयारीला लागलो," असं नीलेश यांनी सांगितलं.
 
प्रकरण इथेच थांबलं नाही. दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमधून नीलेश यांना पुन्हा फोन आला.
 
फोनवर पलीकडची व्यक्ती म्हणाली, की तुमच्या सासऱ्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. त्यांना जनरल वॉर्डात शिफ्ट करण्यात येत आहे. त्यांना तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता.
 
हॉस्पिटलच्या या फोनने नीलेश आणि घरचे घाबरले. देवराम यांच्याऐवजी आपण कुणावर अंत्यसंस्कार केले या विचाराने ते अस्वस्थ झाले.
 
घाबरलेल्या स्थितीत नीलेश आणि त्यांच्या घरचे पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये पोहोचले. मात्र तिथल्या स्टाफने देवराम यांचा मृत्यू झाल्याचं सांगितलं. असं झाल्याचा पुरावाही असल्याचं त्यांनी सांगितलं. नीलेश आणि कुटुंबीयांना वाटलं की, काहीतरी गडबड झाली आहे. ते सगळे घरी परतले.आणखी एक नाट्य
यादरम्यान नीलेश यांना हॉस्पिटलमधून फोन आला. नीलेश सांगतात, की हॉस्पिटलमधून आलेला हा तिसरा कॉल होता.
 
"त्यावेळी त्यांनी सांगितलं, की तुमच्या सासऱ्यांची तब्येत सुधारत आहे. काळजी करण्याचं कारण नाही. आधीच्या दोन कॉल्सविषयी मी सांगितलं. सासऱ्यांच्या स्थितीविषयी नक्की काय ते सांगा असं विचारलं, तर ते म्हणाले हेल्थ अपडेट दोन तासांपूर्वीच आलं आहे. एकाक्षणी ते म्हणत होते की माझ्या सासऱ्यांचा मृत्यू झाला आहे. पुढच्याच क्षणी सासऱ्यांची प्रकृती स्थिर असून, काळजीचं कारण नाही असं ते सांगत होते."
 
हॉस्पिटलच्या डीनने याप्रकरणाला दुजोरा दिला आहे. गैरसमजतीतून हा प्रकार घडल्याचं डॉ. शशांक पंड्या यांनी बीबीसी गुजरातीशी बोलताना सांगितलं.
 
कशी झाली गडबड?
देवराम यांना 28 मे रोजी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. त्यांची लक्षणं पाहून त्यांना गुजरात कॅन्सर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या कोव्हिड-19 वॉर्डात भरती करण्यात आलं. त्याठिकाणी त्यांचे सँपल्स टेस्टिंगसाठी देण्यात आले.
 
29 मे रोजी देवराम यांचा मृत्यू झाला आणि त्यांचा मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आला. कोव्हिड-19 मुळे किंवा कोरोनाचा संसर्ग असल्याच्या संशयातून मृत्यू झाल्यानंतर मृतदेह पीपीई किटमधूनच सोपवण्यात येतो. देवराज यांच्या कुटुंबीयांनाही अशाच पद्धतीने त्यांचा मृतदेह सोपवण्यात आला.
 
मग हॉस्पिटलमधून आलेल्या फोन कॉल्सचं काय? यासंदर्भात डॉ. पंड्या यांना विचारलं असता त्यांनी म्हटलं, "मृत्यू होईपर्यंत देवराम यांचा कोरोनाचा रिपोर्ट आला नव्हता. मृत्यूनंतर त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट आला तो निगेटिव्ह होता. हॉस्पिटल स्टाफने रिपोर्ट आल्यानंतर देवराम यांच्या कुटुंबीयांना फोन करून सांगितलं. त्यांना जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात येईल असंही सांगितलं. त्यांना देवराम यांच्या मृत्यूबद्दल कल्पना नव्हती."
 
मृतदेहाची अदलाबदल झाल्याच्या वृत्ताचं डॉ.पंड्या यांनी खंडन केलं. हा दुर्देवी प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलं. नीलेश आणि देवराम यांच्या कुटुंबीयांची माफी मागितल्याचं डॉ.पंड्या यांनी सांगितलं.
 
"हॉस्पिटल आणि डॉ.पंड्या यांनी आमची माफी मागितली आहे. आम्ही हे प्रकरण वाढवू इच्छित नाही. मात्र गैरसमजुतीमुळे आम्हाला सगळ्यांनाच प्रचंड मानसिक त्रासाला सामोरं जावं लागलं. असा दुर्देवी प्रकार कोणाबाबतही घडायला नको एवढीच आमची प्रार्थना आहे," असं नीलेश यांनी सांगितलं.
 
देवराम यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन जावई आणि एक नात असे कुटुंबीय आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती