डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती : 'ज्ञान दिन'

शुक्रवार, 9 एप्रिल 2021 (13:15 IST)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती हा एक प्रमुख भारतीय उत्सव आहे. हा दिवस दरवर्षी १४ एप्रिल रोजी जगभरात साजरा केला जातो. महाराष्ट्रासह भारतातील अनेक राज्यांत या दिवशी सार्वजनिक सुट्टी असते. आंबेडकरवादी लोक या दिनाला 'समता दिन' म्हणून तर महाराष्ट्र शासन 'ज्ञान दिन' म्हणून साजरा करते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस - १४ एप्रिल हा २०१७ पासून पुढे ज्ञान दिवस म्हणून महाराष्ट्र राज्यात साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागाने घेतला आहे.
 
गेल्या अनेक दशकांपासून आंबेडकरवादी लोक आंबेडकर जयंतीला ‘ज्ञान दिवस’ म्हणून साजरा करीत होते. महाराष्ट्र सरकारने सुद्धा आंबेडकर जयंतीला ज्ञान दिवस म्हणून घोषित करावे ही मागणी वारंवार ते करत होते. शेवटी त्यांना यश आलं आणि ‘प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस ‘ज्ञान दिवस' म्हणून साजरी होऊ लागली.
 
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पहिली सार्वजनिक जयंती सदाशिव रणपिसे यांनी १४ एप्रिल १९२८ रोजी पुण्यात साजरी केली. २०१६ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५ वी जयंती जगातल्या १०२ देशांत साजरी करण्यात आली होती. संयुक्त राष्ट्राने सुद्धा पहिल्यांदा बाबासाहेबांची १२५ वी जयंती साजरी केली, ज्यात १५६ देशांच्या प्रतिनिधींचा सहभाग होता. संयुक्त राष्ट्राने आंबेडकरांना "विश्वाचा प्रणेता" म्हणून संबोधले. संयुक्त राष्ट्राच्या ७० वर्षाच्या इतिहासात तिथे पहिल्यांदा एक भारतीय व्यक्ती आंबेडकरांची जयंती साजरी केली. याशिवाय जगात केवळ मार्टिन ल्यूथर किंग, जुनियर आणि नेल्सन मंडेला या दोन व्यक्तींची जयंती संयुक्त राष्ट्राने साजरी केली.
 
हा सामाजिक, सांस्कृतिक तसेच धार्मिक स्वरूपाचा सण आहे. या दिवशी त्यांचे अनुयायी त्यांचे जन्मस्थळ भीम जन्मभूमी स्मारक तसेच दीक्षाभूमी, चैत्यभूमी, इतर संबंधित स्थळे, सार्वजनिक ठिकाणे, शहरे, गावे, शाळा-महाविद्यालये, विद्यापीठे तसेच भारतासह जगभरातील अनेक बौद्ध विहारात त्यांना अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. 
 
बाबासाहेबांच्या पुतळ्याला दरवर्षी भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती प्रधानमंत्री, केंद्रीय मंत्री, लोकसभापती, राज्यपाल, इतर मंत्री व सर्व राजकिय पक्षाचे राजकारणी आणि आंबेडकरवादी जनता अभिवादन करून त्यांना आदरांजली देतात. 
 
भारतीय बौद्ध धर्मीय बुद्ध विहार तसेच आपल्या घरातील आंबेडकरांच्या प्रतिमेला वा पुतळ्याला समोर ठेवून त्रिवार वंदन करतात. विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते, लोक संचालन करतात, ढोल वाजवून नृत्य करून आनंद व्यक्त करत मिरवणूक काढतात. दलितेतर लोकही आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या उत्साहाने त्यांची जयंती साजरी करतात.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती