आंबेडकरांचे 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे निधन झाले होते, याच्या दुसऱ्या दिवशी 7 डिसेंबर रोजी मुंबईतील चैत्यभूमी येथे त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिमसंस्कार करण्यात आले. निधनानंतर त्यांचे पार्थिव मुंबईला दादर येथील राजगृहावर आणण्यात आले. शिवाजी पार्क येथील समूद्रकिनारी असलेल्या हिंदू स्मशान भूमीमध्ये 7 डिसेंबर 1956 रोजी 12 लाख अनुयायांसमक्ष त्यांच्यावर बौद्ध पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आला. नंतर काही वर्षांनी आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आला.
निधनापूर्वी आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी लक्षावधी अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला होता, त्यांना बौद्ध लोक 'बोधिसत्व' मानतात. आंबेडकर हे बौद्ध गुरु होते, यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी 'महापरिनिर्वाण' हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे.
महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील त्यांचे समाधीस्थळ असलेल्या चैत्यभूमी येथे भारतभरातून लक्षावधी लोक येतात. सर्व चैत्यभूमी स्तूपात ठेवलेल्या आंबेडकरांच्या अस्थीकलश व प्रतिमेस अभिवादन करतात व बाबासाहेबांचे दर्शन घेतात. या दिवशी जगभरातील आंबेडकरवादी व्यक्ती आंबेडकरांची प्रतिमा व मुर्ती समोर ठेवून त्याच्या स्मृतीस अभिवादन करतात. स्थानिक बौद्ध विहारे, घरात, सार्वजनिक स्थळी, शाळा-महाविद्यालये, शासकिय कार्यालये इ. या ठिकाणी या दिवशी त्यांना अभिवादन करतात.