भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशात सामाजिक न्याय प्रस्थापित व्हावा, यादृष्टीने 'स्वातंत्र्य, समता व बंधुता' या त्रिसूत्रीचा पुरस्कार केला. गरीब-श्रीमंत, सवर्ण-मागसवर्गींय, कामगार-मालक हे भेदाभेद मिटवून सर्वधर्मीय लोक हे कायद्यापुढे समान आहेत, ही संकल्पना त्यांनी जनमानसात दृढ करुन देशातल्या प्रत्येक नागरिकाला राज्यघटनेच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बहाल केला. आज (ता.14) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. त्यानिमित्त त्यांच्या गौरवपूर्ण व महान कार्यावर टाकलेल्या हा दृष्टीक्षेप ....
सामाजिक न्यायचे प्रणेते भीमराव रामजी आंबेडकर ऊर्फ डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू गावी झाला आणि जणू काय, एका सामाजिक क्रांतीचा उदय झाला. खरं तर, शालेय जीवनात बाबासाहेबांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत त्यांचे वडील रामजी सुभेदारांनी शिकवलं. बाबासाहेब अवघे 5 वर्षांचे असताना त्यांच्या मातोश्रींचे आकस्मिक निधन झालं आणि बाबासाहेबांच्या शिरावरची जणू मायेची सावलीच विरुन गेली. एकूण आर्थिक स्थिती बेताची असल्याचे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडे नोकरी करुन पुढे त्यांच्या मदतीने डॉ. बाबासाहेबांनी उच्च शिक्षण घेतले आणि पुढे समाजातील जातीभेदाचे उच्चाटन करुन, सामाजिक न्याय प्रस्थापित केला.
डॉ.आंबेडकर हे तळागाळातील लोकांना बौद्धिक व सामाजिक गुलामगिरीतून मुक्त करुन समानतेचा मंत्र देणारे दीपस्तंभ होते. गरीबी व निरक्षरता ही गुलामगिरीची मूळ कारणे असल्याने त्यांनी शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र रयतेला दिला. शिकल्याशिवाय आपल्यावर अन्याय होतोय हे कळत नाही आणि आपले हक्क मिळत नाहीत, हा विचार पददलितांना देऊन बाबासाहेबांनी सामाजिक क्रांतीचे रणशिंग फुंकले आणि पाच हजार वर्षांपासून अमानुष व लाचारीचे जीवन जगणार्या जनमानसात आत्मसन्मानाची व अस्मितेची ज्योत पेटवली.
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे आयुध असून, त्यातूनच खर्या अर्थाने माणसाला आपल्या घटनादत्त अधिकार व कर्तव्याची जाणीव होऊन तो विवेकी व विचारी होतो. स्त्रियांना शिक्षण दिले तर त्या मुलांवर चांगले संस्कार घडवू शकतील, असा मोलाचा उपदेश बाबासाहेबांनी पददलितांना दिला. वंचित-उपेक्षित वर्गाच्या पाल्यांसाठी त्यांनी सोलापूर, पनवेल, ठाणे, पुणे, नाशिक, बेळगाव आदी ठिकाणी वसतिगृहे सुरु करुन विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी शिष्यवृत्तीचीही व्यवस्था केली. इतकेच नव्हे तर डॉ. बाबासाहेबांनी औरंगाबाद येथे मिलिंद कॉलेज, मुंबईत सिद्धार्थ कॉलेज व लॉ कॉलेज स्थापन केले. याशिवाय मुंबई, औरंगाबाद, पंढरपूर, दापोली, नांदेड आदी ठिकाणी शैक्षणिक संस्थांचं जाळंही निर्माण केलं.