सत्यालाच खरे तत्व मानण्याचा उपदेश करून भगवान महावीर म्हणतात, की सत्याचे पालन करणारा मृत्यूसही सहजरित्या पार करू शकतो. असत्याचा त्याग करून खरे व हिताचेच बोलण्याचा ते उपदेश करतात.
ते म्हणतात की, आपल्या किवा दूसर्याच्या फायद्याकरीता खोटे बोलू नये. राग किवा भीतीच्या आहारी जाऊनही खोटे न बोलण्याचे ते आवाहन करतात. स्वतः तर खोटे बोलूच नये याशिवाय दूसर्यांनाही खोटे बोलण्यास प्रवृत्त करू नये.
सत्य जर हानीकारक असेल, दुसर्यांना दुःख पोहचत असेल, प्राण्यांची हिंसा होत असेल तर ती गोष्ट बोलणे टाळावे. भगवान महावीरांच्या मते चोरास चोर, नपुंसकास नपुंसक, रोग्यास रोगी म्हणून संबोधणे सत्य असले तरी तो योग्य नाही.
यामुळे संबंधित लोकांना दुःख पोहचते. महावीरांच्या मते पायात खिळा रूतला तर थोडा वेळच वेदना होतात. त्या खिळ्यास सहज काढणेही शक्य आहे. मात्र, टोचून बोलण्याने ह्रदयावर कायमच्या जखमा होतात.
वर्षानुवर्षे त्या मनात राहून दुःख देत असतात. यामुळे द्वेष, वैर पसरून भीती निर्माण होते. महावीरांनी सांगितल्याप्रमाणे विचारल्याशिवाय उत्तर देणे किवा दुसर्याच्या मध्ये बोलणे योग्य नाही.