हज यात्रेदरम्यान पाळल्या जाणाऱ्या 'या' 8 प्रथांचा इतिहास काय आहे? जाणून घ्या

मंगळवार, 18 जून 2024 (16:10 IST)
हज ही मुस्लिामांची सर्वात मोठी धार्मिक यात्रा आहे. इस्लामधील पाच मूलभूत गोष्टींपैकी ही एक आहे. शारीरिक आणि आर्थिक स्वरुपात सक्षम असलेल्या प्रत्येक मुस्लिमासाठी हे आवश्यक मानलं जातं किंवा त्यांचं कर्तव्य मानलं जातं.याच कारणामुळे दरवर्षी ठरलेल्या वेळी जगभरातील मुस्लिम देशांमधील लाखो पुरुष आणि महिला हज यात्रा करण्यासाठी सौदी अरेबियातील मक्का या शहरात एकत्र जमतात.
 
अरबी कॅलेंडरमधील शेवटचा महिना जिलहज असतो. त्यालाच हजचा महिना म्हटलं जातं. याच कारणामुळे त्या महिन्याच्या आठ ते बारा तारखेदरम्यान हजच्या मुख्य विधींचं पालन केलं जातं.
हज पूर्ण करण्यासाठी मुस्लिमांना अनेक चाली-रीतीचं पालन करावं लागतं.यामध्ये हजसाठी विशेष प्रकारचा पोशाख परिधान करून मक्केत प्रवेश करणं, काबाची परिक्रमा करणं, अराफात मैदानात राहणं, सफा आणि मरवा डोंगरांमध्ये धावणं, सैतानावर दगड फेकणं, प्राण्यांचा बळी देणं आणि डोक्याचं मुंडण करणं यासारख्या प्रथांचा समावेश आहे. मुस्लिम विद्वानांचं म्हणणं आहे की, इस्लाम धर्माच्या आचरणाआधी शेकडो वर्षांपासून मक्केमध्ये जवळपास याच प्रकारे हज साजरा केला जातो.मग हजच्या चाली-रीती केव्हा आणि कशा सुरू झाल्या होत्या? त्यामागची कथा काय? आणि त्यामागचा अर्थ काय आहे?
 
1. इहराममध्ये पांढरा पोशाख घालणं
हजमध्ये ज्या पहिल्या गोष्टीचं पालन करायचं असतं ते म्हणजे 'इहराम'.मक्केपासून दूर राहणाऱ्या लोकांना मक्केला जायच्या रस्त्यात एका निश्चित ठिकाणी पोहचून 'इहराम'चा विधी पूर्ण करावा लागतो.
इहराम हा अरबी शब्द आहे. याचा अर्थ, अशी स्थिती ज्यामध्ये एखादी व्यक्ती स्वत:ला सर्व प्रकारचे पाप आणि निषिद्ध मानण्यात आलेल्या कामांपासून दूर ठेवते.
 
ढाका विद्यापीठात इस्लामी इतिहास आणि संस्कृती विभागाचे प्राध्यापक असलेले डॉक्टर मोहम्मद उमर फारुख यांनी बीबीसीला सांगितलं की, सोप्या भाषेत सांगायचं तर हज पूर्ण करण्यासाठीचा निश्चय करणं आणि त्यासाठी ठरलेल्या पोशाख परिधान करणं म्हणजे इहराम.

या खास टप्प्याच्या प्रतीकाच्या रुपात पुरुषांना न शिवलेलं दोन तुकड्यांचा पांढरं कापड परिधान करावं लागतं.
कॅनाडाचे इस्लामिक माहिती केंद्राचे माजी अध्यक्ष डॉ. साबिर अली यांनी एका मुलाखतीत सांगितलं, दिसायला हे बऱ्याच अंशी कफनच्या कपड्यासारखंच दिसतं. सृष्टीनिर्मात्याच्या दर्शनासाठी आपण तयार आहोत, असा इहरामच्या वेळेस हे कपडे परिधान करण्यामागचा अर्थ आहे.
पुरुषांच्या बाबतीत पांढरे कपडे परिधान करण्याची पद्धत असली तरी महिलांवर या प्रकारचं कोणतंही बंधन नाही. त्या हव्या त्या रंगाचे सुटसुटीत कपडे परिधान करू शकतात.
 
मुस्लिम विद्वानांचं म्हणणं आहे की पैगंबर इब्राहिम हे अरबस्थानात हज करणारे पहिले व्यक्ती होते. ख्रिश्चन धर्माचं पालन करणारे त्यांना इब्राहिम नावानं ओळखतात.
 
ढाका विद्यापीठातील प्राध्यापक फारुख बीबीसीला म्हणाले की, "काबाच्या निर्मितीनंतर हजरत इब्राहिम यांनी अल्लाहच्या आदेशावर हज करण्यास सुरूवात केली आणि त्याच वेळेस पांढरे कपडे परिधान करण्याबरोबरच हज साठीच्या सर्व चाली-रीती सुरू करण्यात आल्या."
 
2. केस आणि नखं कापायची नाही
इहराम धारण केल्यानंतर हज संपण्यापूर्वी हज यात्रेकरूंना अनेक नियमांचं पालन करावं लागतं.
यामध्ये कोणाशीही भांडण किंवा वादविवाद न करणं, लैंगिक संबंध न ठेवणं, केस आणि दाढी न कापणं, हात आणि पायाची नखं न कापणं, जीवहत्या किंवा रक्तपात न करणं, चुगली न करणं, इतरांची निंदानालस्ती न करणं या गोष्टींचा समावेश आहे.
मुस्लीम विद्वानांना वाटतं की पांढरे कपडे परिधान करण्याप्रमाणेच या नियमांची सुरुवात देखील पैगंबर इब्राहिम यांच्याच काळात झाली होती.
कॅनडामधील इस्लामिक माहिती केंद्राचे माजी अध्यक्ष साबिर अली म्हणतात, "या नियमांचं पालन करून हे दाखवलं जातं की हजच्या काळात सृष्टीनिर्मात्याच्या जवळ जाण्याच्या आशेत आम्ही लोक एका अशा स्थितीत पोहोचतो, जिथं नटणं-थटणं यासारख्या संसारी बाबींवर लक्ष देण्याची देखील इच्छा राहत नाही."
 
3. 'काबा'ची परिक्रमा
इहरामनंतर हज यात्रेतील दुसरी चालरीत म्हणजे काबा या इस्लाममधील सर्वात पवित्र स्थळाची सातवेळा परिक्रमा करणं.
हज यात्रेकरू सर्वसाधारणपणे पायीच उलट्या दिशेत (घड्याळ्याचे काटे फिरण्याच्या विरुद्ध दिशेत) काबाची परिक्रमा करतात.
मुस्लीम विद्वानांना वाटतं की, ही प्रथा देखील इब्राहिम यांच्या काळातच सुरू झाली होती. मात्र, त्यांना वाटतं की, परिक्रमा उलट्या दिशेनं का केली जाते आणि सातवेळाच का केली जाते याबाबत स्पष्टता नाही.
मुस्लीम विद्वान डॉ. साबिर अली 'लेट द करोना स्पीक' या शोमध्ये म्हणतात, "यामागचं खरं कारण आणि रहस्य सृष्टीनिर्मात्यालाच सर्वात चांगल्या पद्धतीनं माहित आहे."
मात्र, इस्लामच्या काही जाणकारांना वाटतं की, स्वर्गात 'बैतुल मामूर' नावाच्या ज्या पवित्र घराच्या चारी बाजूंनी देवदूत परिक्रमा करतात त्यामध्ये आणि काबाच्या परिक्रमेमध्ये साम्य आहे.
अली म्हणतात, "याच कारणामुळं काबाला बैतुल्लाह किंवा अल्लाह चं घर म्हटलं जातं. आपण सृष्टीनिर्मात्याची वाट पाहत आहोत हे दाखवण्यासाठी हज यात्रेकरू या पवित्र घराची सात वेळा परिक्रमा करतात."
इस्लामी विचारवंतांचं म्हणणं आहे की, हज यात्रेसाठी या रीतीचं पालन इस्लाम-पूर्व काळात देखील केलं जात होतं.
ढाका विद्यापीठातील प्राध्यापक डॉ. मोहम्मद उमर फारुख म्हणतात, "ही गोष्ट हजरत इब्राहिम यांच्या काळापासूनच होती."
इस्लामी विचारवंतांचं म्हणणं आहे की इस्लामच्या प्रवर्तकांचा जन्म होईपर्यत काबा परिक्रमेच्या रीतीमध्ये किरकोळ बदल झाला होता.
 
फारुख बीबीसीला सांगतात, "अशी माहिती आहे की त्या काळी अरब लोक निर्वस्त्र होऊन काबाची परिक्रमा करत असत. नंतरच्या काळात इस्लामनं यावर बंदी आणली आणि इब्राहिमकडून सुरू करण्यात आलेली प्रथा मूळ स्वरुपात परतली."
 
4. सफा-मरवा डोंगरांदरम्यान धावणं
सफा आणि मरवा डोंगरांच्या मध्ये सात वेळा पळणं हज यात्रेचा एक महत्त्वपूर्ण भाग आहे.
 
इस्लामनुसार पैगंबर इब्राहिम यांनी अल्लाहच्या आदेशावर आपली पत्नी हाजिरा आणि नवजात मुलगा इस्माइल यांना मक्केतील सफा आणि मरवा या डोंगरांजवळ सोडलं होतं. जेव्हा तिथलं पाणी संपलं तेव्हा पाण्याच्या शोधात हाजिरा, सफा आणि मरवा या डोंगरांमधील जागेतून सात वेळा धावली होती.
त्यानंतर अल्लाहच्या आदेशानुसार तिथं एक विहिर तयार झाली आणि हाजिरा आणि तिचा नवजात पुत्र यांनी त्या विहिरीतून पाणी पिऊन आपली तहान भागवली होती. नंतर ती विहिर 'जमजम कुआँ' या नावानं प्रसिद्ध झाली.
 
कॅनडातील इस्लामिक माहिती केंद्राचे माजी अध्यक्ष साबिर अली म्हणतात, हज यात्रेसाठी गेल्यावर सफा आणि मरवा या डोंगरांमधील जागेतून सात वेळा धावून इस्माइल आणि त्यांची आई हाजिरा यांच्या बाबतीत घडलेल्या त्या घटनेची सांकेतिक पद्धतीनं आठवण केली जाते.
 
5. अराफात मैदानातील वास्तव्य
मीना इथं रात्र घालवल्यानंतर दुसऱ्या दिवशी हज यात्रेकरू अराफात मैदानाकडे रवाना होतात. त्यानंतर संपूर्ण दिवस तिथं राहून प्रार्थना करण्यास एक महत्त्वाचा धार्मिक विधी मानला जातो. नंतर संध्याकाळी हज यात्रेकरू मुजदलिफा साठी निघून तिथेच खुल्या आकाशाखाली रात्रीचा मुक्काम करतात.
मुस्लिम विद्वानांना वाटतं की, मीना पासून ते मुजदलिफा पर्यत केल्या जाणाऱ्या सर्व कर्मकांडांमध्ये पैगंबर इब्राहिम आणि त्यांची पत्नी आणि मुलांच्या इतिहासाचा सुद्धा समावेश आहे.
त्याचं हे देखील म्हणणं आहे की, उन्हाळ्यात संपूर्ण दिवस अराफात मैदानात राहिल्यानंतर मुजदलिफा मध्ये खुल्या आकाशाखाली राहण्याचं सुद्धा विशेष अध्यात्मिक महत्त्व आहे.
ढाका विद्यापीठात इस्लामी इतिहास आणि संस्कृती विभागाचे प्राध्यापक डॉ. मोहम्मद उमर फारुख बीबीसीला म्हणाले, "अराफात आणि मुजदलिफा मध्ये राहून यात्रेकरूंना या गोष्टीची जाणीव होऊ शकते की कर्माचा शेवटचा लेखाजोखा होत असताना चांगल्या कर्मांशिवाय पैसा, प्रसिद्धी आणि प्रभाव या गोष्टी आपल्या कामी येणार नाहीत."
 
तर अनेक लोकांचं हे सुद्धा म्हणणं आहे की हजच्या काळात अराफात आणि मुजदलिफा मध्ये होणारी लाखो लोकांची गर्दी, इस्लामिक 'हशर के क्षेत्र' किंवा न्यायाच्या दिवसाची आठवण करून देते.
 
6. सैतानाला दगड मारणं
सैतानाला दगड मारणं हा हज मधील सर्वात महत्त्वाच्या रीतीपैंकी एक आहे. मुजदलिफा हून येताना यात्रेकरू सात छोटे दगड किंवा खडे घेऊन मीना इथं येतात. तिथे सैतानाच्या नावावर एक प्रतीकात्मक भिंत तयार करण्यात आली आहे. या भिंतीला 'बडा जमरात' या नावानं ओळखलं जातं. आपल्या सोबत आणलेले सात दगड किंवा खडे हज यात्रेकरू त्या भिंतींवर फेकतात.
 
मीनामध्ये सैतानाच्या अशाच आणखी दोन भिंती आहेत. हज च्या शेवटच्या दोन दिवसांमध्ये त्यांच्यावर देखील सात-सात दगड मारले जातात.
 
मोहम्मद उमर फारुख यांनी बीबीसीला सांगितलं, "सैतानाच्या वाईट योजनांपासून बचाव करण्यासाठी हजरत इब्राहिम यांनी त्याला दगड मारले होते. सैतानाची भिंतीवर प्रतिकात्मक दगडफेक करण्यास तिथूनच सुरूवात झाली होती."
 
इस्लामनुसार, अल्लाहनं पैगंबर इब्राहिमला त्याच्या सर्वात प्रिय मालमत्तेचा त्याग करण्यास सांगितलं. त्यानंतर इब्राहिमनं आपला प्रिय पुत्र इस्माइलची कुर्बानी देण्याचा निर्णय घेतला. इस्माइलनं देखील वडिलांच्या निर्णयाचा स्वीकार केला. यानंतर इब्राहिम आपल्या मुलासोबत अराफातच्या खुल्या वाळवंटात गेले.
 
तिथे इस्माइलची कुर्बानी देण्यासाठी जात असलेल्या पैगंबर इब्राहिम यांना चुकीचा सल्ला देऊन सैतान त्यांच्या कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न करत होता. त्या परिस्थितीत इब्राहिम यांनी तीन ठिकाणी सैतानाला दगड मारले.
मुस्लीम विद्वानांच्या मते पुढे जाऊन त्या घटनेची आठवण म्हणून हज यात्रेत दगड मारण्याची रीत सुरू झाली.

7. पशुबळी
मीनामध्ये सैतानाला दगडं मारल्यानंतर प्राण्यांचा बळी किंवा कुर्बानी देण्याची पद्धत आहे. मुस्लीम मानतात की या प्रथेशी देखील पैगंबर इब्राहिम यांच्या इतिहासाचा संबंध आहे.
 
लोकांना वाटतं की अल्लाहच्या आदेशावर पैगंबर आपला नवजात मुलगा इस्माइल याची कुर्बानी देण्यासाठी अराफातच्या मैदानात नक्कीच गेले होते, मात्र शेवटी तिथं असं काही घडलं नव्हतं. म्हणजेच त्यांनी आपल्या मुलाची कुर्बानी दिली नव्हती.
 
इब्राहिम यांचा विश्वास आणि आज्ञाधारकपणा पाहून अल्लाह खूश झाला आणि इस्माइलच्या ऐवजी एका प्राण्याची कुर्बानी देण्यात आली.
इस्लामी विचारवंतांचं म्हणणं आहे की, त्या घटनेची आठवण म्हणून हज यात्रेच्या तिसऱ्या दिवशी गाय, बकरी, म्हैस किंवा उंट यांची कुर्बानी दिली जाते. त्यांना वाटतं की अल्लाहबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ही कुर्बानी दिली जाते.
त्याच दिवशी ईद-उल-अजहा किंवा कुर्बानीची ईद देखील असते. इस्लामपूर्व काळात सुद्धा प्राण्यांच्या कुर्बानीची ही प्रथा प्रचलित होती.
 
ढाका विद्यापीठात इस्लामी इतिहास आणि संस्कृती विभागाचे प्राध्यापक डॉ. मोहम्मद उमर फारुख बीबीसाला म्हणाले, "त्या काळी देवी-देवतांच्या नावावर कुर्बानी दिली जायची. पुढे जाऊन मक्केत इस्लामची स्थापना झाल्यानंतर पैगंबर इब्राहिम कडून सुरू करण्यात आलेल्या कुर्बानीच्या परंपरेला पुन्हा सुरू करण्यात आलं होतं."
 
8. मुंडण करणं
डोक्याचं मुंडण करणं हा सुद्धा हज यात्रेचा महत्त्वाचा भाग आहे. प्राण्यांची कुर्बानी दिल्यानंतर त्याच दिवशी डोक्याचं मुंडण केलं जातं.
डॉ. मोहम्मद उमर फारुख बीबीसीला म्हणाले, "डोक्याचं मुंडण करणं हे मुळात हज यात्रेच्या सुरुवातीला असणाऱ्या इहरामच्या स्थितीतून मुक्ती मिळण्या संदर्भातील प्रतिकात्मक कार्यांपैकी एक आहे."
मात्र महिला हज यात्रेकरूंना पूर्णपणे मुंडण करावं लागत नाही. त्या डोक्यावरील केसांचा पुढील काही भाग कापून फेकू शकतात.
इस्लामिक विचारवंतांनुसार, मुंडण करण्याची ही प्रथा पैगंबर इब्राहिम यांच्या काळापासून सुरू आहे. त्यांना असंदेखील वाटतं की हज यात्रा केल्यामुळे व्यक्तीमध्ये जो बदल घडतो, तो केस कापल्यामुळे प्रतिकात्मक स्वरुपात विकसित होतो.
मुस्लीम विद्वानांचं म्हणणं आहे की केस कापल्यामुळे हज यात्रेचा इहराम संपतो. याच कारणामुळे त्यानंतर दाढी करणं किंवा हाता-पायाची नखं कापण्यास कोणतीही मनाई नाही.

Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती