ख्रिसमस2023 : येशू ख्रिस्त प्रत्यक्षात कसे दिसायचे?
रविवार, 25 डिसेंबर 2022 (10:08 IST)
येशू ख्रिस्त कसे दिसतात? हे सगळ्यांनाच माहित असतं. पाश्चात्त्य कलेमध्ये सर्वाधिक चित्रं येशूंचीच काढली गेली आहेत. लांब केस, लांब दाढी, लांब हात असलेला पायघोळ झगा (बहुतेकदा पांढऱ्या रंगाचा) आणि त्यावर बहुतेकदा निळं बाह्यवस्त्र- असं येशूंचं रूप सर्वत्र परिचित आहे. येशूंची ही प्रतिमा इतकी परिचित आहे की पॅनकेक किंवा टोस्टच्या तुकड्यांवरही ती दिसते.
पण येशू ख्रिस्त खरोखरच असे दिसत होते का?
बहुधा, नाही.
किंबहुना, येशूंची ही सर्वपरिचित प्रतिमा मुळात बायझन्टाइन काळापासून, चौथ्या शतकापासून, रुळली. येशूंचं बायझन्टाइन काळातलं चित्रण प्रतीकात्मक होतं- त्यात ऐतिहासिक अचूकतेला महत्त्व नव्हतं, तर अर्थपूर्णत्वाला महत्त्व होतं.
ही चित्रं मुकुटधारी सम्राटाच्या प्रतिमेवर आधारलेली होती. रोममधील सान्ता पुदेन्झिआना चर्चमध्ये उच्चासनावरील नक्षीदार संगमरवरी प्रतिमेमध्येही हे दिसतं.
या प्रतिमेत येशू सोनेरी टोगा (कफनीसारखं वस्त्र) घातलेले आहेत. सर्व जगाचे ते स्वर्गस्थ सत्ताधीश आहेत. लांब केस व दाढी असलेल्या सिंहासनाधिष्ठित ऑलम्पियन झेउसच्या पुतळ्याशी साधर्म्य सांगणारी ही प्रतिमा होती. हा पुतळा पूर्वीपासून इतका विख्यात होता की रोमन सम्राट ऑगस्टसने त्याच शैलीत (फक्त ईश्वरासमान लांब केस व दाढी नसलेला) स्वतःचा पुतळा बनवून घेतला.
ख्रिस्ताची स्वर्गस्थ सत्ता वैश्विक राजाच्या रूपात दाखवू पाहणाऱ्या बायझन्टाइन कलाकारांनी झेउसच्या तरूण आवृत्तीद्वारे येशूंची प्रतिमा निर्माण केली. स्वर्गस्थ येशूंचं हे चित्र कालांतराने तरुण येशूंची प्रमाण प्रतिमा ठरलं. आजकाल काही वेळा हिप्पी शैलीमध्येही ते रंगवलं जातं.
तर, येशू खरोखरचे कसे दिसत होते?
मस्तकापासून पायाच्या बोटांपर्यंत विचार करत जाऊ.
1. केस आणि दाढी
प्रारंभिक काळातील ख्रिस्ती लोक येशूंना स्वर्गस्थ सत्ताधीशाच्या रूपात दाखवत नव्हते, तेव्हा इतर कोणत्याही प्रत्यक्षातील माणसासारखा, दाढी नसलेला आणि छोट्या केसांचा येशू काढले जात असत.
पण भटक्या साधूच्या रूपातल्या येशूंना बहुधा दाढी असावी. ते न्हाव्यांकडे जात नव्हते, हे यामागचं साधं-सोपं कारण होतं.
एकंदर अस्ताव्यस्तपणा आणि दाढी ही तत्त्वज्ञाला (तो उच्चस्तरीय गोष्टींचा विचार करत असतो म्हणून) इतर सर्वांपेक्षा वेगळं ठरवणारी वैशिष्ट्यं मानली जात होती. स्टोइक तत्त्वज्ञ एपिक्सेटसला ही वैशिष्ट्य "निसर्गानुरूप" वाटत होती.
खरं म्हणजे पहिल्या शतकातील ग्रीको-रोमन युगामध्ये तुकतुकीत केलेली दाढी आणि छोटे केस अत्यंत आवश्यक मानलं जात होतं. मानेवर रुळणारे लांबलचक केस आणि दाढी, हे ईश्वरी वैशिष्ट्य मानलं जात होतं, त्यामुळे पुरुषांनी त्याचं अनुकरण करायचं नसे. तत्त्वज्ञ मंडळीदेखील त्यांचे केस तुलनेने छोटेच ठेवत असत.
पुरातन काळामध्ये दाढी असणं ज्यू लोकांचंही वैशिष्ट्य नव्हतं. किंबहुना, ज्यू इतर सर्वांसारखेच दिसत असल्यामुळे त्यांना ओळखायचं कसं, ही ज्यूंची दडपणूक करू पाहणाऱ्यांसमोरची एक समस्या होती (मकाबीजच्या पुस्तकामध्ये हा मुद्दा मांडलेला आहे). परंतु, इसवीसन 70मध्ये जेरुसलेम ताब्यात घेतल्यानंतर रोमन सत्ताधीशांनी चलनात आणलेल्या जुदिआ काप्ता नाण्यांवरच्या प्रतिमांमध्ये बंदिवान ज्यू पुरुषांना दाढी दाखवलेली आहे.
तर, तत्त्वज्ञ म्हणून 'निसर्गानुरूप' रूपानुसार, जुदिआ काप्ता नाण्यांवरच्या पुरुषांप्रमाणे, येशूंना छोटीशी दाढी असणं शक्य आहे. पण त्याचे केस मात्र फारसे लांब नसावेत.
त्याचे केस थोडे जरी लांब होते असतील, तरी त्यावर काही प्रतिक्रिया अपेक्षित होती. ज्यूंमधील ज्या पुरुषांनी अस्ताव्यस्त दाढी वाढवलेली असेल आणि थोडे लांब केस ठेवलेले असतील, ते कट्टर धर्माचरणाची प्रतिज्ञा केलेल्या व्यक्तींपैकी असल्याची ओळख तत्काळ पटत असे.
ते काही कालावधीसाठी स्वतःला ईश्वरापाशी समर्पित करत, वाइन पीत नसत, स्वतःचे केस कापत नसत. आणि समर्पणाचा हा कालावधी संपल्यानंतर ते जेरूसलेममधील मंदिरात एका विशेष समारंभामध्ये डोक्यावरचे केस कापून घेत (याचं वर्णन अॅक्ट्स प्रकरण 21, वेचा 24मध्ये आलं आहे).
पण येशूंनी अशा धर्माचरणाची प्रतिज्ञा घेतलेली नव्हती. ते अनेकदा वाइन पिताना दिसतात. किंबहुना त्यांचे टीकाकार त्यांच्यावर खूप जास्त मद्यपान केल्याचा आरोपही करतात (मॅथ्यू, प्रकरण 11, वेचा 19).
त्यांचे केस लांब असतात आणि ते धर्माचरणाची प्रतिज्ञा केलेल्या ज्यूंसारखे दिसत असते, तर त्याचा पोशाख आणि त्याचं वर्तन यांच्यातील तफावतीबद्दल काही टिप्पणी कुठेतरी सापडली असती- ते सतत वाइन पितात, ही तक्रार अधिक ठळकपणे या संदर्भात आली असती.
2. पेहराव
येशूंच्या काळी श्रीमंत पुरुष विशेष प्रसंगी लांब झगे घालत असत. लोकांसमोर स्वतःचा उच्च दर्जा दाखवण्यासाठी हे केलं जात असे. एकदा शिकवण देताना येशू म्हणतात, "लेखनिकांपासून सावध राहा, त्यांना लांब झगे (स्टोलाय) घालून फिरायची इच्छा असते आणि बाजारपेठांमध्ये अभिवादन स्वीकारायचं असतं, आणि सिनेगॉगमध्ये सर्वांत महत्त्वाची जागा बसायला मिळावी आणि समूहभोजनावेळी मानसन्मानाचं स्थान मिळावं असं त्यांना वाटत असतं" (मार्क, प्रकरण 12, वेचे 38-39).
सर्वसाधारणतः येशूंची वचनं हा गॉस्पेलमधला सर्वांत अचूक भाग मानला जातो, त्यामुळे येशू अशा प्रकारचा पायघोळ झगा घालत नव्हता, असं वरच्या वचनांवर आपल्याला म्हणता येतं.
सर्वसाधारणतः येशूंच्या काळातला पुरुष गुढग्यापर्यंतचा अंगरखा (चितोन) घालत असे आणि स्त्रिया पावलाच्या सांध्यापर्यंत जाणारा अंगरखा घालत असत. यात अदलाबदल केली, तर ते एक निश्चित विधान मानलं जात असे. त्यामुळे दुसऱ्या शतकात पॉल व थेस्ला यांच्या अॅक्स्टमध्ये एक स्त्री छोटा (पुरुषांचा) अंगरखा परिधान करते तेव्हा ते काहीसं धक्कादायक मानलं जातं. या अंगरख्यांवर बहुतेकदा खांद्यापासून खालच्या शिवणीपर्यंत रंगीत पट्ट्या असत आणि एकसंध पेहराव म्हणून हा अंगरखा शिवला जात असे.
या अंगरख्यावर एखादं बाह्यवस्त्र (हिमॅटिऑन) घालता येत असे आणि येशू यातील काहीतरी परिधान करत होते, असं आपल्याला म्हणता येतं, कारण एका स्त्रीला त्यांच्याकडून उपचार हवे होते, तेव्हा तिने अशाच पोशाखाला स्पर्श केल्याचा उल्लेख सापडतो (उदाहरणार्थ पाहा- मार्क, प्रकरण 5, वेचा 27). या पोशाखामध्ये बाह्यवस्त्र लांब असायचं आणि ते लोकरीपासून तयार केलेलं असे, पण ते जास्त जाड नव्हतं, त्यामुळे उब हवी असेल तर अशी दोन बाह्यवस्त्रं घ्यावी लागत.
हिमॅटिऑन विविध प्रकारे परिधान करता येत असे, अंगाला गुंडाळून गुढग्यापर्यंत येईल असं ते घेतलं, तर त्याने अंगरखा पूर्ण झाकला जात असे. (काही वैरागी तत्त्वज्ञ अंगरखा न घालता लांब हिमॅटिऑन वस्त्रच परिधान करत असत, धडाचा वरचा भाग मोकळाच ठेवत. पण तो वेगळा विषय झाला).
या बाह्यवस्त्रांची गुणवत्ता, आकार व रंग यांवरून सत्ता व प्रतिष्ठा यांचं सूचन होत असे. गुलाबी आणि विशिष्ट प्रकारचा निळा रंग भव्यदिव्यता व प्रतिष्ठा यांचे संकेत देत असत. हे राजेशाही रंग होते, कारण त्यासाठी वापरली जाणारी भुकटी अतिशय दुर्मिळ व महागडी होती.
पण रंगांमधून आणखीही काही संकेत मिळत असत. झेलिअट लोकांचं (रोमनांना जुदिआमधून बाहेर काढू पाहणारा एक ज्यू गट) वर्णन करताना इतिहासकार जोसेफस यांनी म्हटलं आहे की, हे लोक विकृतपणे स्त्रियांसारखा पोशाख करत असत, 'रंगीत बाह्यवस्त्रं' (क्लानिदिआ) परिधान करत असत. म्हणजे वास्तवातील पुरुष, उच्च दर्जाचे नसतील तोवर रंगीत नसलेले कपडे घालत, हे यातून सूचित होतं.
परंतु, येशू पांढरा पोशाख घालत नव्हते. त्यासाठी खास ब्लिचिंग किंवा चॉकिंग करावं लागायचं आणि जुदिआमध्ये याचा संबंध एसेनस या गटाशी जोडला जात होता- या गटातील लोक ज्यू कायद्याच्या काटेकोर अर्थाचं अनुसरण करत असत. येशूंचा पोशाख आणि शुभ्र पांढरे कपडे यांच्यातील फरक मार्कच्या संहितेतील नवव्या प्रकरणामध्ये नोंदवलेला आहे. यामध्ये तीन अनुयायी येशूंसोबत प्रार्थनेसाठी एका पर्वतावर जातात आणि येशूंमधून प्रकाशकिरण बाहेर पडायला लागतात. मार्क नमूद करतो त्यानुसार, येशूंचा हिमॅटिआ (हा शब्द अनेकवचनात- म्हणजे हिमॅटिऑनऐवजी हिमॅटिआ असा वापरला- तर त्याचा अर्थ केवळ "बाह्यवस्त्रं" असा न होता "कपडे" असाही होऊ शकतो) "चकाकायला लागला, तीव्र शुभ्र झाला, पृथ्वीवरच्या कोणत्याही विरंजकाला इतकी शुभ्रता आणता आली नसती." त्यामुळे या रूपांतरापूर्वी येशू सर्वसामान्य माणसासारखाच दिसत असल्याचे मार्कने नमूद केले आहे. सर्वसामान्य कपडे घालणारा, म्हणजेच इथे रंग न दिलेला लोकरीचा अंगरखा घालणारा पुरुष अभिप्रेत आहे.
येशूंच्या देहदंडावेळच्या पोशाखाबद्दल आपल्याला अधिक माहिती मिळते. त्या वेळी रोमन सैनिक त्यांचा हिमॅटिआ (इथे विशेषनाम वापरलं असलं, तरी ते दोन बाह्यवस्त्रांसाठी असावं) चार हिश्श्यांमध्ये फाडतात (पाहा- जॉन, प्रकरण 19, वेचा 23). यातील एक बहुथा तलिथ, किंवा ज्यू प्रार्थनेवेळी घालायची शाल असावी. या झुबके लावलेल्या बाह्यवस्त्राचा (tzitzith) विशेष उल्लेख येशूने केला आहे (मॅथ्यू, प्रकरण 23, वेचा 5). हा हलक्या वजनाचा हिमॅटिऑ अंगरखा होता, पारंपरिकरित्या कृत्रिम रंग न दिलेल्या मूळच्या क्रिमी रंगाच्या लोकरी सामग्रीपासून हे वस्त्र तयार केलं जात असे. त्यात बहुधा निळीच्या काही पट्ट्या किंवा दोऱ्यांची वीण असावी.
3. पाय
येशू पायात सँडलसारखी पादत्राणं घालत असावा. सर्व जण सँडल घालत असत. मृत समुद्राच्या आणि मसाडाच्या जवळ असणाऱ्या वैराण गुहांमध्ये येशूच्या काळातील सँडल सापडल्या आहेत, त्यामुळे त्या नक्की कशा होत्या हे आपल्याला पाहायला मिळतं. एकत्र शिवलेल्या चामड्याचे तळवे, आणि वरच्या बाजूला बोटांमधून घालता येतील अशा चामडी पट्ट्या- अशी या पादत्राणांची साधीच रचना होती.
4. वैशिष्ट्यं
येशूंच्या चेहरेपट्टीची वैशिष्ट्यं कशी होती? त्याची चेहरेपट्टी ज्यू होती. येशू ज्यू होते, हे निश्चितपणे सांगता येतं आणि पॉलच्या पत्रांसह विविध वाङ्मयात याचे पुरावे सापडतात. हिब्रूंना लिहिलेल्या पत्रात म्हटल्याप्रमाणे: "आपला भगवान जुदाहच्या वंशात जन्मला, हे स्पष्ट आहे." "सुरुवातीला सुमारे 30 वर्षांचा असलेला" एक माणूस, असा ल्यूकच्या संहितेतील तिसऱ्या प्रकरणात उल्लेख आहे. तर या काळातील कोणताही ज्यू पुरुष कसा होता, याचा अंदाज आपण कसा बांधायचा?
न्यायवैद्यक मानवशास्त्रज्ञ रिचर्ड नीव्ह यांनी 2001 साली 'सन ऑफ गॉड' या बीबीसीच्या माहितीपटाकरिता गॅलिलीवासी पुरुषाचं एक प्रारूप तयार केलं होतं. गॅलिली प्रदेशात प्रत्यक्ष सापडलेल्या कवटीच्या आधारे त्यांनी हे प्रारूप घडवलं.
हा येशूंचा चेहरा असल्याचा दावा त्यांनी केला नव्हता. येशू इतरांहून भिन्न दिसत असल्याचा उल्लेख आपल्याला कुठे सापडत नाही, त्यामुळे ते त्यांच्या काळाची आणि स्थळाची उपज असलेले व्यक्ती होते, असं लोकांनी मानावं यासाठी उद्युक्त करण्यासाठी ते प्रारूप तयार केलं होतं.
प्राचीन सांगाड्यांनुसार प्रारूपं तयार करण्याचा भाग बाजूला ठेवू. येशू खरोखरचे कसा दिसत होते, याचं सर्वांत निकटचं चित्रण तिसऱ्या शतकातल्या ड्युरा-युरोपॉस सिनेगॉगच्या भिंतींवर मोझेसच्या प्रतिमेद्वारे पाहायला मिळतं, असं मला वाटतं.
कारण, ग्रीको-रोमन युगात एखाद्या ज्यू साधूची प्रतिमा कशी मानली जात होती, हे त्यातून दाखवलेलं आहे. या प्रतिमेतला मोझेस रंग न दिलेल्या पोशाखात आहे, किंबहुना त्याचं एक बाह्यवस्त्र टॅलिथ प्रकारचं आहे, कारण मोझेस लाल समुद्राचं विभाजन करताना दाखवणाऱ्या ड्युरामधील प्रतिमेत त्याच्या पोशाखाला कोपऱ्यांमध्ये झुबके असल्याचं दिसतं.
बाकी काहीही असलं तरी, सध्या प्रमाण मानल्या जाणाऱ्या बायझन्टाइन रूपातील येशूंपेक्षा मोझेसच्या उपरोक्त प्रतिमेच्या रूपातील ऐतिहासिक येशूंचं रूप जास्त अचूक आहे, एवढं निश्चित: त्याचे केस छोटे आहेत आणि हलकीशी दाढी आहे, आणि त्यांनी आखूड अंगरखा घातला आहे, हात तोकडे आहेत आणि त्याने हिमॅटिऑन परिधान केला आहे.