महावीरासन करा आणि कंबर सडपातळ ठेवा

बुधवार, 10 एप्रिल 2019 (15:54 IST)
दंडस्थितीतील एक आसन आहे. या आसनात शरीराची अवस्था वीर हनुमानाप्रमाणे होते म्हणूनच याला महावीरासन म्हटले आहे. हे करायला अतिशय सोपे आहे. प्रथम दंड स्थितीत उभे रहावे, भरपूर श्‍वास घ्यावा, मग श्‍वास रोखून डावा किंवा उजवा पाय जेवढा जास्ती जास्त लांब टाकता येईल तेवढा टाकावा. साधारण अंदाजे तीन फूट पुढे नेला तरी चालेल. मग दोन्ही हातांच्या मुठी बंद कराव्या आणि हात कोपरामध्ये दुमडून वर हवेत न्यावेत, जणुकाही फार मोठे वजन उचलत आहोत अशी अवस्था हातांची करावी. हे आसन एकदा डावा पाय पुढे घेऊन करावे व एकदा उजवा पाय पुढे घेऊन करावे. आसन सोडताना सावकाश श्‍वास सोडावा, हळूहळू पुढे घेतलेला पाय माघे घ्यावा.
 
जर हे आसन भरभर केले तर त्याचा फायदा अधिक होईल. पाय पुढे मागे उजवीकडून आणि डावीकडृून जलद करावे. या आसनाचे फायदे अनेक आहेत. या आसनामुळे उंची वाढायला मदत होते. हात पाय बळकट होतात. पोट साफ आणि हलके होते. छाती भरदार होते. शरीर तेजस्वी आणि मजबूत बनते. महावीरासनामुळे कंबरेला ताण बसतो आणि कंबरेभोवतीचे सर्व स्नायू लवचिक बनतात. त्यांची कार्यक्षमता वाढते. आपली प्रकृती उत्तम राखण्यासाठी महावीरासन नियमित करावे. स्त्रियांनीसुद्धा हे आसन नियमित करावे. यामुळे पोटाचे विकार बरे होते. मासिक पाळीतील आरोग्य सुधारते. हाता-पायातील रक्‍ताभिसरण चांगल्याप्रकारे होऊन हाता-पायांची हाडे मजबूत होतात. या आसनाचा कालावधी हवा तेवढा ठेवता येतो. कारण हे करायला सोपे आसन आहे.
 
हाताच्या पंजांच्या मुठी आवळल्यामुळे बोटांचे कार्य सुधारते. तेथील स्नायू आणि हाडांना बळकटी येते. आसनस्थिती घेतल्यानंतर श्‍वास घेऊ नये आणि सोडूही नये म्हणजेच श्‍वास रोखून कुंभक करावे. आसन सोडताना श्‍वास सोडत नेहमीचे संथ श्‍वसन करावे. हे आसन करताना मागचा पाय थोडासा उचलला जातो. या आसनामुळे पुरुषांची संभोगशक्‍ती वाढते, स्त्रियांचा योनीमार्ग खुला होतो तसेच ज्या स्त्रियांची मासिक पाळी काही कारणामुळे वयात असताना बंद झाली असेल त्यांची मासिक पाळी या आसनामुळे सुरु होते. हे आसन नियमित केले असता बुटक्‍या लोकांची उंची वाढण्यास मदत होते.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती