इंडेक्स आर्ट गॅलरीकडून स्त्री शक्तीचा जागर

गुरूवार, 7 मार्च 2024 (08:42 IST)
नाशिक :कुठल्याही कलेच्या सादरीकरणासाठी हक्काचे ठिकाण मिळावे या उद्देशाने सुरु झालेली इंडेक्स आर्ट गॅलरी महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री शक्तीचा जागर करत आहे. या अंतर्गत ८ ते ३१ मार्च या कालावधीत दोन महिला चित्रकारांनी काढलेल्या चित्राचं प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. यानिमित्ताने महिला चित्रकारांनी सादर केलेली कला लोकांपर्यत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामध्ये अवकाशाची उत्पत्ती सांगणारा बिंदू, द्विमितीय अवकाशात ऊर्जा उत्पन्न करणारी रेषा आणि या अलौकिक ऊर्जेला नजकातीने सामावणारी परिपूर्ण रचना. या त्रिगुणात्मक कलाशैलीचा अनुभव देणारी ही चित्र प्रदर्शनी ‘आमोदिनी’ या नावाने साकारली जाणार आहे. यामध्ये पहिले प्रदर्शन हे नाशिकच्या प्रसिद्ध सुहास जोशी यांनी रेखाटलेल्या चित्रांचे आहे. तर दुसरे प्रदर्शन गेल्या ३० वर्षांपासून व्यावसायिक चित्रकार व लेखिका म्हणून प्रसिद्ध असलेल्या ज्योत्स्ना संभाजी कदम यांनी काढलेल्या चित्रांचे आहे.
 
या प्रदर्शनाबाबत माहिती देतांना प्रदर्शनाच्या कला प्रबंधक प्राध्यापिका, चित्रकार स्नेहल तांबुळवाडीकर – खेडकर सांगतात की, आपल्या देशात कुठल्याही कलेला व्यवसायिक दर्जा देण्यात आलेला नाही. त्यामुळे कुठल्याही कलेची जोपासना करणाऱ्या कलावंताला नेहमीच वेगवेगळ्या संकटाला तोंड द्यावे लागते. गेल्या काही वर्षात चित्र थोडेसे बदलले असले तर समाधानकारक बदल मुळीच झालेला नाही. अजूनही  कला लोकांपर्यत पोहोचवता येत नाही. सोबत कलेच्या माध्यमातून आर्थिक उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे उदरनिर्वाह आणि पुढे कलेचे जोपासना करण्यासाठी अडचणी येतात. महिलांसाठी तर हे काम अजून कठीण स्वरूपाचे असते. अनेक महिला उत्तम कलाकार असूनही अजूनही पुढे येत नाही. अशा आव्हानात्मक परीस्थितीमध्ये सुहास जोशी आणि ज्योत्स्ना संभाजी कदम यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या दोघांची ही कला साधना इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी अशीच आहे. ही गोष्ट ओळखूनच महिलांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. सोबतच नाशिकमध्ये अनेक वर्षांपासून चित्रकला महाविद्यालय सुरु असले तरी इथे घडलेल्या चित्रकारांची चित्रे नाशिककरांना कधीच पाहण्याची संधी मिळत नाही. शहरात चित्रकलाची प्रदर्शने होतांना दिसत नाही. प्रदर्शनातून या गोष्टीलाही चालना मिळणार आहे.          
 
प्रदर्शनाबाबत अधिक माहिती देतांना त्यांनी स्पष्ट केले की प्रदर्शनात मांडलेली चित्रे ही दोन्ही चित्रकारांच्या शैलीची ओळख करून देतात. चित्रकार म्हणून नाशिकमधून प्रवास सुरु करणाऱ्या सुहास जोशी यांची चित्रे ही भारतीय चित्र पद्धतीवर आधारीत आहेत. तर ज्योत्स्ना संभाजी कदम यांनी काढलेली चित्रे ही निसर्ग आणि अमूर्त स्वरूपाची आहे.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती