अशाने देश कसा चालणार असा सवाल, शरद पवार यांचा सवाल

शनिवार, 30 डिसेंबर 2023 (21:00 IST)
देशातील शेतकरी संकटात असतानाही त्यांच्याकडे कुणी लक्ष द्यायला तयार नाही, अशाने देश कसा चालणार असा सवाल करत  राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी राज्य सरकारसह केंद्र सरकारवर हल्लाबोल केला. खासदार अमोल कोल्हे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काढलेल्या शेतकरी आक्रोश मोर्चाचा  शनिवारी समारोप झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शरद पवार होते.
 
यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, देशातील शेतकऱ्यांच्या सुख दुःखाचा आवाज दिल्लीपर्यंत पोहचावा या हेतून आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. आज देशातील शेतकरी अस्वस्थ आहे. मी अमरावतीमध्ये गेल्यानंतर बातमी वाचायला मिळाली की, दहा दिवसांमध्ये, अमरावती, वर्धा, नागपूर, यवतमाळ या जिल्ह्याकील 25 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. देशाची भूक भागविणारा शेतकरी आज आत्महत्या करतोय ही अवस्थ करणारी परिस्थिती असल्याचे शरद पवार यावेळी म्हणाले.
 
पुढे बोलताना शरद पवार म्हणाले की, माझ्याकडे जेव्हा कृषी खातं होतं तेव्हा शेतकरी आत्महत्येची माहिती मिळाली, तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग होते. मी त्यांच्याकडे जाऊन त्यांना सांगितलं की, शेतकरी आत्महत्या हा विषय लहान नाही, आपण तेथे जाऊ, त्यांनी दुसऱ्याच दिवशी दिल्लीतून विमान काढलं आणि नागपुरात लॅंड झालं. तेथून आम्ही यवतमाळमध्ये गेलो. त्या शेतकरी कुटुंबीयांना भेटलो.

आम्ही तेथे विचारलं तर कळालं की, आधीच डोक्यावर कर्ज, त्यात दुष्काळी परिस्थिती आली. अशातच शेतकऱ्यांवर सावकाराने कारवाई करत त्याच्या घराचा लिलाव काढला. या चौहुबाजुने आलेल्या संकटामुळे त्या शेतकऱ्यांनी वीष प्राशन करून आत्महत्या केली. शेतकऱ्यांचा सन्मान राहला नाही की ते जीव देतात, तीच परिस्थिती आजसुद्धा आली आहे. असाही हल्ला शरद पवारांनी केंद्र सरकारवर केला.
 
Edited by -Ratnadeep Ranshoor
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती