केंद्र-राज्य सरकारमधील वादामुळे देश एकसंध राहणार नाही - अजित पवार

गुरूवार, 7 फेब्रुवारी 2019 (08:54 IST)
बंगालमध्ये जे घडले ते चुकीचे आहे. केंद्र आणि राज्य सरकारमध्ये वाद निर्माण झाला तर देश एकसंध राहणार नाही, अशी चिंता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधिमंडळ पक्षनेते आ. अजित पवार यांनी व्यक्त केली. ते निर्धार परिवर्तन यात्रेनिमित्त आयोजित अमरावती शहर येथील सभेत बोलत होते.
 
या सभेत अजित पवार  यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर चोहो बाजूंनी टीका केली. ते म्हणाले की, सरकारला बजेट मांडण्याचा अधिकार नव्हता. पण सर्व नियम बासनात बांधण्याचे काम या सरकारने केले आहे. सध्या देशात स्वातंत्र्याची मुस्कटदाबी सुरू आहे. विशेष म्हणजे हे सरकारच्या माध्यमातून घडत आहे. सरकारविरोधी बोलले तर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. कन्हया कुमार, आनंद तेलतुंबडे यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला गेला. कोर्टाने या अटका चुकीच्या ठरवल्या, पण तरीही अटक केली गेली. हे संविधानविरोधी आहे.
 
राज्यातील वाढत्या बेरोजगारीवर बोलताना अजितदादा पुढे म्हणाले की, सरकार प्रत्येक वर्षे दोन कोटी रोजगार देणार होते. त्या हिशोबाने पाच वर्षात १० कोटी रोजगार मिळायला हवा होता. मग त्या रोजगारांचे काय झालं?
 
अमरावती जिल्ह्यातील प्रश्नांवर बोलताना ते म्हणाले की अमरावतीमध्ये एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे, राज्यकर्त्यांना पाण्याचे नीट नियोजन करता येत नाही का? सरकार काय करत आहे?
 
अमरावती येथे झालेल्या परिवर्तनयात्रेच्या सभेत आ. छगन भुजबळ यांनी सरकारवर टीका केली. १९७५ सालच्या आणीबाणीला लाजवेल अशी ही मोदी सरकारची आणीबाणी. या भाजपाच्या राजवटीने सर्व स्वायत्त संस्थावर ताबा मिळवला आहे. अगदी न्यायसंस्थासुद्धा ताब्यात घेण्याचे काम मोदी सरकारने केले. भारतीय जनता पक्ष हा पक्ष नाही तर तो पंथ असल्याची टीका छगन भुजबळ यांनी केली.
 
पश्चिम बंगालमध्ये घडलेल्या सीबीआय विरुद्ध पोलीस या घटनेवर बोलताना भुजबळ म्हणाले, पोलीस कमिशनरला अटक करण्यासाठी ४० सीबीआय अधिकारी कसे येतात? ही लढाई संविधान विरुद्ध मोदी आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना संविधान प्रिय आहे त्यांनी आता परिवर्तनाच्या चळवळीत सहभागी व्हायला हवं.
 
राफेल प्रकरणात काहीतरी काळंबेरं आहे, म्हणून पंतप्रधान तोंड उघडत नाहीत, अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या सभेत बोलून दाखवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी  यांनी कधी पत्रकार परिषद घेतली नाही, हा धोरणात्मक बदल देशात घडत आहे. याआधी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, राहुल गांधी, शरद पवार  यांनी सत्तेत असताना विविध विषयांवर पत्रकार परिषदा घेतल्या आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकारांना सामोरे जात नाही असेही ते म्हणाले. ७० टक्के इंग्रजी चॅनेल्सचा वेळ पंतप्रधान मोदी कसे बरोबर आहे ते दाखवण्यात जातो, नरेंद्र मोदींविरोधी बातमी दाखवली तर पत्रकारांना कामावरून काढले जात आहे. दोन्ही बाजूने मीडियाला नियंत्रित केले जात आहे. गेल्या पाच वर्षात व्यक्तिस्वातंत्र्य हिरावून घेतले आहे, असा आरोप जयंत पाटील यांनी केला.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती