आषाढी वारी रद्द झाली ही केवळ अफवाच

मंगळवार, 7 एप्रिल 2020 (12:55 IST)
कोरोना विषाणूमुळे पंढरीची आषाढी वारी रद्द झाल्याच्या बातम्या येत असल्या तरी याबाबत आप अधिकृत निर्णय झाला नसून ही अफवा असल्याचे वारकरी पाईक संघाचे प्रवक्ते रामकृष्ण महाराज वीर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

मागील दोन दिवसांपासून प्रसिध्दी माध्यमाद्वारे आषाढी वारी रद्द झाली, पालखी सोहळे निघणार नाहीत या आशयाच्या बातम्या प्रसिध्द करण्यात येत आहेत यावर वारकरी पाईक संघाने सोमवारी खुलासा केला आहे. कोरोनामुळे यंदाची चैत्री वारी रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला. याला लाखो वारकर्‍यांनी देखील पाठिंबा दर्शवित घरातूनच विठुरायाला नमन केले. हाच धागा पकडून मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंढरीची वारी रद्द झाल्याचे वक्तव्य केले. यामुळे राज्यभरात आषाढी वारी रद्द झाल्याचा चर्चेला उधाण आले. तसेच विविध वृत्तवाहिनंवर पालखी सोहळे रद्द झाल्याचे देखील जाहीर करण्यात आले. तर काही दैनिकांमध्ये देखील याविषयी बातम्या प्रसारित करण्यात आल्या होत्यायामुळे राज्यभरातील लाखो भाविकांना मोठा धक्का बसला. आषाढी वारीसदहा लाखांहून अधिक भाविक हजेरी लावतात. तर विविध राज्यातून शेकडो दिंड्या पंढरीत येतात. हा निर्णय अचानक कसा घेण्यात आला असा प्रश्न भाविकांना पडला होता.

दरम्यान, यावर आता वारकरी पाईक संघाने खुलासा केला असून आषाढी रद्द झाल्याची बामती सद्यस्थितीत पूर्णपणे अफवा असल्याचे जाहीर केले आहे. आषाढी एकादशी 1 जुलै रोजी असून संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळे देखील 12 व 13 जून रोजी प्रस्थान करणार आहेत. यास जवळपास अडीच महिन्याचा कालावधी आहे. तसेच याबाबत शासनाने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती तसेच संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान आळंदी यांना देखील कल्पना दिली नाही. याबाबत माउलींच्या पालखी सोहळ्यात मोठा मान असणार राणा महाराज वासकर यांनी आळंदीमध्ये संपर्क साधला असता अद्याप असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे वीर महाराज यांनी आषाढी वारी रद्द झाली ही अफवा असल्याचे सांगून यावर भाविकांना विश्वास ठेवू नये,  असे आवाहन केले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती