यंदा गणेशोत्सवात मिरवणुका नाही

गुरूवार, 11 जून 2020 (11:27 IST)
करोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत यंदा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना मिरवणुका काढता येणार नाहीये. यंदा अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. 
 
गणेशोत्सव काळात ध्वनिक्षेपकाचा वापर, आगमन आणि विसर्जन मिरवणुकांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे स्थानिक पोलीस ठाण्यांमध्ये मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत आयोजित करण्यात येत असलेल्या बैठकांमध्ये स्पष्ट करण्यात येत आहे. 
 
येत्या २२ ऑगस्ट रोजी गणरायाचं आगमन होत आहे. मुंबईमधील गणेश कार्यशाळांमध्ये गणेशमूर्ती घडविण्याचे काम मे महिन्यापासूनच सुरू होते. मुंबईत तब्बल १२ हजार ५०० सार्वजनिक मंडळे गणेशोत्सव साजरा करतात. गणेशोत्सवापूर्वी एक- दोन महिना आधी मंडळांची लगबग सुरू होते. पण यंदा चित्र वेगळंच आहे. अनेक मंडळ साधेपणाने उत्सव साजरा करायचा अश्या पक्षात आहे. 
 
मुंबईमध्ये दररोज करोनाचे रुग्ण वाढतच आहेत. अशात मूर्ती तयार करण्यासाठी लागणारे साहित्य मिळणे अवघड होतोय. त्यापलीकडे सुव्यवस्था राखणारे पोलिस आधीपासूनच कोरोना संसर्गामुळे तणावात आहे. या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव कसा साजरा करायचा असा प्रश्न गणेशोत्सव मंडळांसमोर आहे. 
 
मुंबईतील ठिकठिकाणच्या पोलीस ठाण्यांमध्ये सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचे आयोजन करण्यात येत आहे. त्यात प्रत्येक गणेशोत्सव मंडळाने अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा करावा. आगमन वा विसर्जन मिरवणुका काढू नये असे या बैठकांमध्ये गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना बजावण्यात येत आहे. त्याचबरोबर यंदा गणेश आगमन, विसर्जनाच्या मिरवणुकीस, तसेच ध्वनिक्षेपकाच्या वापरास परवानगी देण्यात येणार नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती