कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांत तीन दिवस अतिवृष्टीचा इशारा,वाचा पूर्ण अहवाल

शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019 (10:24 IST)
पुणे विभागातील कृष्णा आणि भीमा खोऱ्यापैकी भीमा खोऱ्यात पावसाचा जोर ओसरल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. मात्र कृष्णा खोऱ्यात पडणाऱ्या पावसाचा जोर अद्यापी कायम आहे.  सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यातील पूरस्थिती अजूनही गंभीर असली तरी मदत व बचाव कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. कर्नाटकमधील अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग 4 लाख क्युसेकपर्यंत वाढविण्यात आल्याने पूरस्थिती नियंत्रणात येईल. विभागातील 1 लाख 32 हजार 360 पूरबाधितांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून बचाव व मदत कार्यावर प्रशासनाने भर दिला असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज दिली. पुणे विभागातील पूरस्थिती आणि बचाव कार्याची माहिती देण्यासाठी येथील विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
डॉ.दीपक म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागातील 58 तालुक्यांपैकी 30 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. पुणे विभागात सरासरीच्या 137 टक्के पाऊस झाला आहे. विभागातील प्रमुख कृष्णा आणि भीमा खोऱ्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली असून भीमा खोऱ्यातील पावासाचा जोर कमी झाल्यामुळे या भागातील पूरस्थिती नियंत्रणात आहे. मात्र या खोऱ्यातील उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, माळशीरज, मंगळवेढा तालुक्यात पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. ही संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन सोलापूर जिल्ह्यातील 7 हजार लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. यामध्ये पंढरपूर शहरातील अडीच हजारहून अधिक नागरिकांचा समावेश आहे.
 
1 लाख 32 हजार 360 लोकांना सुरक्षित स्थळी हलवले
 
पुणे विभागातील कोल्हापूर जिल्ह्यातील 136 गावे पूरामुळे बाधित झाली असून जिल्ह्यातून 51 हजार 785 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यातील 6 गावे पूरामुळे बाधित झाली असून 6 हजार 262 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.  सांगली जिल्ह्यातील 18 गावे पुरामुळे बाधित झालीअसून 53 हजार 281 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. सोलापूर जिल्ह्यातील 7 हजार 749 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पुणे जिल्ह्यातील 13 हजार 336 लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. पूरामध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू असून सर्वच लोकांना बोटीने हलविणे शक्य नसल्याने महिला, गरोदर महिला, वृद्ध, रुग्णांना पहिल्यांदा हलविण्यात येत आहे, तर उर्वरित लोकांना गावातील उंच ठिकाणी नेण्यात येत आहे. स्थलांतरीत केलेल्या लोकांना तयार शिजवलेले अन्न पोहोचविण्यात येत आहे. त्याच बरोबर रॉकेल आणि मेणबत्ती व इतर जीवनाश्यक साहित्यही पोहोचविण्यात येत आहे.
 
पाणी पुरवठा योजनांना फटका
 
पूर स्थितीचा फटका विभागातील पिण्याच्या पाणी पुरवठा करण्याच्या योजनांना बसला असून कोल्हापूर जिल्ह्यातील 390 गावातील, सांगली जिल्ह्यातील 113 गावातील, सातारा जिल्ह्यातील 91 गावातील पिण्याच्या पाण्याच्या योजना बंद पडल्या आहेत. काही ठिकाणी वीज पुरवठा नसल्याने तर काही ठिकाणी पाणी पुरवठा योजनांच्या मोटारी पाण्यात गेल्याने या योजना बंद पडल्या आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून पुणे विभागातील 1 लाख 562 ट्रान्सफॉर्मर पैकी 10 हजार 882 ट्रान्सफॉर्मर बंद करण्यात आले आहेत. यामध्ये काही पूराच्या पाण्याने बाधीत झाले असून यामुळे अंदाजे 2 लाख 756 वीज वितरण कंपनीचे ग्राहक बाधित झाले आहेत.  
 
नियंत्रण कक्ष सज्ज
 
विभागात जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्ष कार्यान्वित करण्यात आले आहे. तसेच, पाटबंधारे विभाग, महानगरपालिका आणि पोलीस विभाग येथेही 24 तास नियंत्रण कक्ष सुरू आहे आपत्कालीन साहित्य, बोटी, लाईफ जॅकेटस्, लाईफ बॉयज्‌,फ्लोटिंग पंप, मेगा फोन, बी. ए. सेट, सेफ्टी हेल्मेटस्‌, टॉर्च इत्यादि साहित्य उपलब्ध करण्यात आले आहे. पुरेशा औषध साठ्याबाबत तसेच साथीचे रोग पसरू नये, यासाठी खबरदारी घेण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना देण्यात आल्या आहेत.
 
अफवांवर विश्वास ठेवू नये
 
पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन अत्यंत गांभीर्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून नागरिकांनी घाबरून जावू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच बचाव व पुनर्वसन कार्यात नागरिकांनी प्रशासनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी केले आहे. 
पुणे विभागात आज अखेर सरासरी 751 मि.मी, 137 टक्‍के  पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस सांगली जिल्ह्यात 213 टक्के झाला आहे. पुणे जिल्ह्यात 166 टक्के, कोल्हापूर जिल्ह्यात 116 टक्के तर सातारा जिल्ह्यात 173  टक्के तसेच सोलापूर जिल्ह्यात 78 टक्के पावसाची नोंद झाली आहे. पुणे विभागात 58 पैकी 30 तालुक्यात अतिवृष्टी झालेली आहे.  
 
पुणे विभागातील पूर परिस्थिती बाबतची माहिती  
 
1.      पुणे :-   मावळ ,मुळशी, भोर ,वेल्हा, जुन्नर ,आंबेगाव, शिरुर, खेड या 8 तालुक्यात अतिवृष्टी.
 
2.      सातारा :-  सातारा, कराड, पाटण, वाई या 4 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.
 
3.      सांगली :- मिरज, वाळवा, शिराळा, पलूस या 4 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे.
 
4.      कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्हयातील सर्व तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आहे.
 
धरणातील पाणीसाठा
 
Ø  पुणे, कोल्हापूर, सातारा व सांगली जिल्हयातील सर्व धरणे 100 % भरली आहेत.
 
Ø  स्थानांतरांची माहिती- पुणे विभागातील नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असुन नदीकाठच्या गावातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होणेबाबत सुचित करण्यात आले आहे. दि.07/08/2019 रोजी पर्यत.
स्थानांतरित केलेल्या कुटुंबांचा तपशिल
 
·  पुणे :-पुणे जिल्ह्यातील धरणातून होणारा पाण्याचा विसर्गामुळे ग्रामीण भागातील 103 मोठे पूल व 433 छोटेपूल यापैकी 34 पुले पाण्याखाली गेले आहेत. पुणे महानगर पालिका हद्दीतील 3, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील 2, पुणेकॅन्टोलमेंट हद्दीतील -1 असे एकूण पुणे जिल्ह्यातील 40 पुल पाण्याखाली गेले आहे.
 
·  सातारा :- सातारा जिल्हयामध्ये 8 पूल पाण्याखाली गेले असून पर्याची मार्ग उपलब्ध आहेत.
 
· सांगली :- सांगली जिल्ह्यामध्ये प्रमुख राज्यमार्ग 6 प्रमुख जिल्हामार्ग 15 व इतर जिल्हा मार्ग 6 पाण्याखाली गेलेले आहेत.
 
· कोल्हापूर :- कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 104 केटीवेअर 89 रस्ते पाण्याखाली गेले आहेत.
 
मदत व पुनर्वसन
 
· पुणे विभागातील पुरांमुळे स्थानांतरीत झालेल्या व्यक्तींना महानगरपालिका शाळा , जिल्हा परिषद व इतर सार्वजनिक इमारतीमध्ये अशा ठिकाणी स्थानांतरित करण्यात आलेले आहे.
 
· सांगली जिल्हयात जीवन ज्योत या संस्थेने ढवलीवाडी या गावातील 350 लोंकांच्या जेवणाच्या व्यवस्था केली आहे.
 
मदत व बचाव कार्य-
 
* कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 6 एनडीआरएफ पथके पोहोचली असून आणखी 6 एनडीआरएफ पथके रवाना होत आहेत.  1 नौदल पथक पोहोचले आहे.
 
* सांगली जिल्ह्यामध्ये 3 एनडीआरएफ पथके पोहोचली आहेत. आणखी 3 एनडीआरएफ पथके रवाना होत आहेत.
 
* सातारा जिल्ह्यामध्ये 1 एनडीआरएफ पथके पोहोचले आहे. तसेच टेरीटोरिअल आर्मीची कोल्हापूर मध्ये 4 व सांगलीमध्ये 1 पथके कार्यरत आहेत.
 
एनडीआरएफ व जिल्हा पातळीवरील जीवरक्षक बोटींचा वापर करण्यात येत आहे.

कोल्हापूर जिल्हयातील करवीर, हातकणंगले व शिरोळ या 3 तालुक्यामधील पुरामुळे 129 गांवे बाधित असून 11432 कुटूंब बाधित आहेत. त्यापैकी 51785 व्यक्तींना तात्काळ हालविणे आवश्यक आहे. कार्यवाही पूर्ण आहे.
 
कोल्हापूर जिल्ह्यातील कागल व गडहिंग्लज या तालुक्यातील रस्ते सुरु आहेत. इतर सर्व रस्ते बंद आहेत.· कोल्हापूर जिल्हयात 3 एनडीआरएफ  पथक व टेरीटोरिअल आर्मी 2  पथक, 10 बोटी व 140 जवान कार्यरत आहेत.· महावितरण- पुणे विभागातील एकुण 162515 वीज ट्रान्सफार्मर पैकी 10882 ट्रान्सफार्मर बाधित आहेत. व त्यामुळे एकूण 2 लाख 56 हजार 795 वीज ग्राहक बाधित झाले आहेत. · वैद्यकीय पथके –  सांगली जिल्ह्यात 72 व कोल्हापूर जिल्ह्यात 57 व सातारा जिल्ह्यात 72 अशी एकूण 201 पथके कार्यरत आहेत. · उपलब्ध  बोटी – सातारा जिल्ह्यात स्थानिक 7 व एनडीआरएफ 10 एकूण 17 सांगली जिल्ह्यात स्थानिक 30 व एनडीआरएफ 11, आर्मी 02 एकूण 43 तर कोल्हापूर जिल्ह्यात स्थानिक 14, एनडीआरएफ 7, आर्मी 4 व नेव्ही 4 अशा एकूण29 बोटी आहेत. · पुणे विभागात एकूण 89 बोटी बचाव कार्यात सहभागी आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती