दिलासा, राज्यातील आपत्तीग्रस्तांना मोफत शिधावाटप करणार

मंगळवार, 20 ऑक्टोबर 2020 (08:16 IST)
राज्यात विविध भागात पावसाने थैमान घातले असून यात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. यातल्या अनेक भागांमध्ये स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि खासदार शरद पवार हे भेटी देत आहेत. त्याचप्रमाणे नाशिकच्या इगतपुरी तालुक्यात आज मी सुद्धा नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे. महाराष्ट्रात अशी परिस्थिती असताना ज्यांचे घर पाण्याखाली बुडाले, काही ठिकाणी घरे वाहून गेलेली आहेत, अनेकांची शेती वाहून गेली आहे. अशा निराधार कुटुंबाना मोफत अन्न धान्य पुरवठा करणार असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. 
 
महाराष्ट्रातील विविध भागात की ज्यात सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड या भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेती, रस्ते वाहून गेलेले आहेत. काही घरे देखील दोन-दोन दिवस पाण्याखाली आहेत. अशा पूरग्रस्तांना मदत म्हणून महाराष्ट्र शासनाकडून प्रती कुटुंब १० किलो गहू,१० किलो तांदूळ आणि ५ लिटर केरोसिनचा मोफत पुरवठा केला जाणार आहे. राज्यातील अतिवृष्टी व पूर यामुळे बाधित झालेल्या आपद्ग्रस्तांना अन्न धान्य वाटप करण्याबाबतच्या ०८ मार्च २०१९ च्या (सीएलएस-२०१८/प्र.क्र.२२५/म-३) शासन निर्णयानुसार ही मदत देणार असल्याची माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती